Thursday, October 31, 2024
Homeशब्दगंधउष:काल दूर नाही...

उष:काल दूर नाही…

निराशेने झाकोळून गेलो असताना आपण उत्तुंग व्यक्तिमत्त्वांकडे, त्यांच्या प्रवासाकडे पाहायला हवे. अडचणी आहेत पण अडचणींवर तोडगेही आहेत याची जाण ठेवायला हवी. हा विचारही आपल्याला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढणारा ठरेल. म्हणूनच अशा सकारात्मक विचारांचे हार गुंफू या आणि तो येणार्‍या काळाला अर्पण करून सर्व काही शुभ घडण्याची कामना व्यक्त करूया. कारण आता उष:काल फार दूर नाही…

स्वाती पेशवे

सुरुवात आणि शेवट हे चक्र एका गतीने फिरत असते. सुरुवात होते त्या प्रत्येकाचा कधी ना कधी शेवट होत असतो आणि शेवटाच्या गर्भातच नवा कोंब अंकुरत असतो. मात्र युगानुयुगाचे हे चक्र परिचित असूनही कोणत्याही गोष्टीची अखेर आपल्याला व्यथित अथवा भावूक करून जाते, तर कोणतीही सुरुवात उल्हसीत करून जाते. नववर्ष उंबर्‍यावर येऊन ठेपले की, येणारा काळ आनंदपर्व घेऊन येईल असे म्हणत त्याचे जल्लोशात स्वागत करताना ही उल्हसीत अवस्था आपण प्रत्येकजण अनुभवतो. आताही या सार्वत्रिक मानसिकतेने रमणीय झालेले वातावरण आपण पाहत आहोत. बहुतेकांचे नववर्षाच्या स्वागताचे बेत ठरले आहेत. सलग काही महिन्यांचा काळ प्रचंड दडपणाखाली काढल्यानंतर मिळालेला हा निवांत आणि काहीसा निर्धास्तपणा सगळ्यांना सुखावून जात आहे. म्हणूनच सगळ्यांनी येणार्‍या वर्षाच्या सहर्ष स्वागताला सज्ज राहूया. येणारे वर्ष मंगलमय असेल, अशी आशा व्यक्त करूया.

- Advertisement -

अर्थात, हे करत असताना गेली जवळपास दोन वर्षे करोनाच्या संक्रमणकाळाने हिरावून घेतल्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकजण धास्तावलेला असणे स्वाभाविक आहे. प्रत्येकाचे काही ना काही हरवलेले असताना मनाचा एक कोपरा कातर झालेले अनेकजण आपण आजूबाजूला पाहत आहोत. त्यातच करोनाच्या विषाणूचा नवा अवतार जगभर धुडगूस घालत असल्यामुळे भविष्यकाळात नेमके काय वाढून आहे, याची धास्ती मनामनांत आहे. मुलांच्या शिक्षणापासून तरुणांच्या कारकीर्दीपर्यंत आणि छोट्या गृहोद्योगापासून मोठ्या व्यावसायिकांपर्यंत प्रत्येकाला जाणवलेले करोनाचे चटके अजूनही जळजळत असल्यामुळे भविष्यात आणखी एका दुष्टचक्राला सामोरे जाण्याची मानसिकता आता कोणामध्येही उरलेली नाही. म्हणूनच आता येणारे वर्ष या सर्व नष्टचर्यातून आपली सुटका करणारे असो ही सार्वत्रिक प्रार्थना करूनच नव्या उमेदीने नववर्षाच्या स्वागताला सज्ज होऊया.

जुने जाऊ द्या मरणालागुनी… असे म्हणत नवी उमेद धारण करण्यासाठी थोडी सकारात्मकता अंगी बाणवणे गरजेचे आहे. काजळी दूर केल्याखेरीज दिवा तेजोमय दिसत नाही. त्याचप्रमाणे मनातली धास्ती अथवा भीती दूर केल्याखेरीज परिस्थितीतली सकारात्मकता आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणूनच सर्वप्रथम इतक्या घातक आणि जीवघेण्या स्थितीतही आपण धडधाकट असल्याबद्दल संतोष व्यक्त करणे हेच पहिले सकारात्मक पाऊल म्हणावे लागेल. काळरात्रीच्या उदरात गडप झालेल्या स्नेहीजनांच्या आठवणी व्याकूळ करत आहेत.पण शो मस्ट गो ऑन म्हणत भविष्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हायला हवे. अनेकांच्या अकाली मृत्यूने जगण्याची नेमकी परिभाषा आपल्याला समजली आहे. त्यामुळे आता बहुतेकांचे संकल्प स्पष्ट आहेत. नेमके कोणासाठी, कशासाठी आणि किती पळायचे हे अधोरेखित झाल्याने अनेक चेहरे आज डोळ्यांवरची झापडे काढून येणार्‍या वर्षाच्या स्वागताला अधिक डोळसपणे सज्ज आहेत. त्यामुळेच आता स्वत:ला आणि परिस्थितीला गृहीत न धरणार्‍या समाजाचा नवा चेहरा बघायला मिळणे ही मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. नव्याने स्वत:ची, जगण्याची आणि जगाची ओळख पटलेले समाजमन यापुढे कोणताही धोका पत्करणार नाही. ही सजगता आणि विस्तारीत दृष्टिकोन वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यास पूरक ठरेल यात शंका नाही.

ही सजगता पर्यावरणाचा ढासळता समतोल सावरण्यास कारक ठरेल, आरोग्याप्रती अधिक सुजाण होण्यास कारक ठरेल, शिक्षणाच्या योग्य वाटेची निवड करण्यास गतकाळाने दिलेले काही धडे कामी येतील तर काळाची जोरदार चपराक बसल्यामुळे अनेक दुभंगलेली नाती आता जवळ येतील. याचा प्रारंभ झालाच आहे. आगामी काळात तो अधिक स्पष्टतेने दिसून येईल. माणसाला माणसाचे नेमके महत्त्व पटण्यास आणि समस्त मनुष्यजातीला ‘निसर्ग’ नामक किमयागाराची खरी ताकद समजावून सांगण्यास गतकाळाने मोठी मजल मारल्यामुळे हे शहाणपण घेऊनच पुढे सरकणारा हा समाज पृथ्वीतलावरच्या, चराचरातल्या प्रत्येक सजीव-निर्जीव घटकाची दखल घेणारा आणि त्याची जपणूक करणारा असेल, अशी आशा वाटते. सगळ्या नाही तरी काही सुबुद्ध नागरिकांकडून आपण ही अपेक्षा नक्कीच व्यक्त करू शकतो. म्हणूनच येणारे वर्ष यादृष्टीने आशेचा एक किरण देऊन जाईल ही सकारात्मक भावना सुखावून जाते. गेली दोन वर्षे अर्थव्यवस्थेची अवस्था चिंतेत भर टाकणारी असली तरी आता देश या गर्तेतून बाहेर येत आहे. पर्यटनाला वाढती चालना, रियल इस्टेट क्षेत्रातला बहर, दुचाकी आणि चारचाकी वाहनांना वाढती मागणी, देशात वाहतूक सुकर होईल या हेतूने कार्यपथावर असणारी रस्ते आणि महामार्ग बांधणीची कामे, नव्या पर्यायी इंधनांची चाचपणी, त्यानुसार वाहनांच्या निर्मितीमध्ये बघायला मिळणारे सकारात्मक बदल हे विषय देशाला एका नव्या दिशेकडे घेऊन जात आहेत. म्हणूनच ही सकारात्मकता भविष्याचे कुतूहल वाढवून जाते.

एकीकडे हे सगळे सुरू असताना चळवळीतले सामर्थ्यही वाढत आहे. चळवळी उभ्या करताना जीवाचीही पर्वा न करणे हे भाग वगळले तर चुकणार्‍या सरकारवर दबाव ठेवण्यासाठी, तुम्ही म्हणता ते सगळेच ऐकून घेतले जाणार नाही याची तजवीज करण्यासाठी या चळवळींनी बजावलेली मोलाची भूमिका आपण पाहिली. आगामी काळात राजकीय लाभापोटी नव्हे तर न्याय्य मागण्यांसाठी अशा चळवळी उभ्या राहतील, अशी अपेक्षा करूया. कारण सरलेल्या दोन वर्षांनी आपल्याला जवळपास प्रत्येक क्षेत्रातल्या उणिवा, कच्चे दुवे आणि आवश्यक असणारे बदल ठळकपणे दाखवून दिले आहेत. हे बदल समाजव्यवस्थेपासून कुटुंबव्यवस्थेपर्यंतच्या प्रत्येक घटकाने अनुसरावेत असेच आहेत. हे अनुसरण आता अधिक नेमकेपणाने होण्याची गरज आहे. म्हणूनच आता समाज सार्वजनिक स्वच्छतेच्या पुढे जाऊन आणखी चार पावले टाकेल आणि कुटुंबातले सदस्य घरकामात महिलांना हातभार लावण्याप्रती थोडी अधिक महत्त्वाची भूमिका बजावतील, अशी आशा करायला हरकत नाही. शेवटी कोणत्याही कारणाने का होईना, चांगली सुरुवात होणे गरजेचे असते. करोनासारख्या आपत्तीने का होईना आता ती सुरुवात झाली आहे. गरज आहे ती या सकारात्मक बदलाचा वेग कायम राखण्याची. नववर्षात सर्वांना ही प्रेरणा मिळावी एवढीच अपेक्षा…

अलीकडे समाजाने दीर्घकाळ कमालीचा ताण अनुभवला. अजूनही हा ताण पूर्णपणे निवळलेला नाही. असे असताना सकारात्मकता कुठून आणायची हा अनेकांचा प्रश्न असेल. मात्र या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आपण गतकाळातच डोकावणे गरजेचे आहे. कारण ताणतणाव ही नेहमीच नाण्याची अविभाज्य बाजू राहिली आहे. अगदी दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असणारी अनेक कुटुंबे या समाजाने पाहिली आहेत. अठरा विश्व दारिद्य्र आणि सर्व प्रकारची प्रतिकूलता हेच काहींचे प्राक्तन असते. नियतीने नेमलेल्या संघर्षाचा सामना करण्यातच काहींची हयात खर्ची पडते. पण तरी देखील त्यांच्या सहनशीलतेचा कडेलोट होत नाही. कारण त्यांची जीवनेच्छा प्रबळ असते. आजचा दिवस उदास, दु:खी, कठीण आणि अडचणीत गेला तरी उद्याचा दिवस चांगला असेल या आशेवर ते जगत राहतात. भविष्याला आकार देण्याचा प्रयत्न करत राहतात. अशी दुर्दम्य इच्छाशक्ती असते म्हणूनच त्यातल्या काही जणांची स्वप्ने प्रत्यक्षात उतरू शकतात. प्रतिकूलतेचे आक्रमण तीव्र असूनही त्याविरुद्ध लढण्याची उमेद त्यांना दहा हत्तींचे बळ प्रदान करते. प्रामाणिकता, परिश्रम, हुशारी, समयसुचकता या बळावर ते उत्तुंग झेप घेतात. म्हणूनच निराशेने झाकोळून गेलो असताना आपण अशा व्यक्तिमत्त्वांकडे, त्यांच्या प्रवासाकडे पाहायला हवे. अडचणी आहेत पण अडचणींवर तोडगेही आहेत याची जाण ठेवायला हवी. हा विचारही आपल्यातल्या निराशेवर फुंकर घालणारा ठरेल. गर्तेतून बाहेर काढणारा ठरेल. म्हणूनच अशा सकारात्मक विचारांचे हार गुंफूया आणि तो येणार्‍या काळाला अर्पण करून सर्व काही शुभ घडण्याची कामना व्यक्त करूया. कारण आता उष:काल फार दूर नाही…

स्वाती पेशवे

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या