Tuesday, November 26, 2024
Homeअग्रलेखऑलिम्पिक संघटनेतील उष:काल

ऑलिम्पिक संघटनेतील उष:काल

भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ खेळाडू पी.टी.उषा यांची निवड झाली आहे. केरळमधील पय्योळी या छोट्याशा गावापासून सुरु झालेली त्यांची धाव एका बलाढ्य संघटनेच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचली आहे. हा प्रवास सोपा नव्हताच. त्यांची सगळी कारकिर्द विलक्षण संघर्षाने भरलेली आणि तितकीच प्रेरणादायी आहे. त्यांची निवड झाल्याचे जाहीर होताच देशातील प्रत्येकाला 1984 सालचे ऑलिम्पिक नक्कीच आठवले असेल. ठिकाण होते लॉस एंजेलिस.

400 मीटर अडथळ्याच्या शर्यतीची अंतिम फेरी होती. पी.टी. उषा त्यात धावल्या होत्या. त्यांच्याबरोबर तमाम भारतीयांची मनेही धावली होती. पहिल्या तीन खेळाडूंमध्ये त्या स्थान मिळवतील असे सर्वांनाच वाटले होते. पण कुठेतरी काहीतरी चुकले आणि त्यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. गणिती भाषेत सांगायचे तर एक दशांश सेकंदाच्या फरकाने त्यांचे कांस्यपदक हुकले होते आणि खेळाच्या भाषेत सांगायचे तर त्यांचा पाय पुढे होता पण त्यांनी छाती पुढे झुकवलेली नव्हती. कारणे काहीही असोत, त्यांचे पदक हुकले होते. पण त्यामुळे भारतीयांना फारसा फरक पडला नव्हता. त्यांनी पी.टी.उषा यांना डोक्यावर घेतले होते. कारण तेव्हा एका भारतीय खेळाडूने ऑलिम्पिक पदाचे स्वप्न पाहाणे देखील दूर्मिळ होते. पण ऑलिम्पिक अ‍ॅथलेटिक्समध्ये देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याचे उषा यांचे स्वप्न अजूनही विरलेले नाही.

- Advertisement -

स्वप्नांचा पाठलाग त्यांनी थांबवलेला नाही. उषा अकादमी या संस्थेच्या माध्यमातून तो सुरुच आहे. ही संस्था त्यांनी 2002 साली स्थापन केली. त्यांच्या अकादमीमधील खेळाडूने ते स्वप्न पूर्ण करावे यासाठी त्या झटत आहेत. पदकासाठी खडतर तपश्चर्या करावी लागते हेच त्यांच्या अकादमीमधील खेळाडूंच्या मनावर बिंबवत आहेत. त्यांच्याच अकादमीमधील टिंटू लुका हिने तिच्या वयाच्या सोळाव्या वर्षीच ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. 1986 साली झालेल्या सोल आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने पाच सुवर्णपदके जिंकली. त्यात उषा यांचीच चार पदके होती. त्यानंतरही त्यांनी असंख्य पदके जिंकली आणि विक्रम स्वत:च्या नावावर नोंदवले.

क्रीडाक्षेत्रातून निवृत्ती स्वीकारेपर्यंत त्यांनी 103 पेक्षा जास्त पदकांवर देशाचे नाव कोरले आहे. आता उषा यांनी अध्यक्षपदाची धुरा हाती घेतली आहे. भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या बंदीची तलवार टांगती आहे. तो तिढा त्यांना सोडवावा लागेल. त्या राज्यसभेच्या खासदारही आहेत. त्या पदाला त्यांनी न्याय देणे अपेक्षित आहे. अडथळ्यांच्या शर्यतीतील दीर्घ अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी त्यांच्या रुपाने एक महिला विराजमान होत आहे.

‘कठोर मेहनतीला पर्याय नाही आणि महिलांसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही’ असे त्या नेहमी म्हणतात. पदकांसारखेच अध्यक्षपदाच्या कारकिर्दीवरही उषा त्यांचे नाव नोंदवतील आणि त्यांच्या दीर्घ अनुभवाचा फायदा क्रीडाक्षेत्राला करुन देतील. त्यांच्या कारकिर्दीला ‘देशदूत’च्या शुभेच्छा.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या