Thursday, November 21, 2024
Homeशब्दगंधवाट खडतर!

वाट खडतर!

गुजरातमध्ये येत्या वर्षाखेरीज विधानसभा निवडणुका होत असल्या तरी त्याची रणधुमाळी आताच रंगण्यास सुरुवात झाली आहे. पाटीदार समाजाचे तरुण नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला दिलेल्या सोडचिठ्ठीमुळे आणि त्यांच्या भाजप प्रवेशामुळे गुजरातमधील राजकारण ढवळून निघाले आहे. कारण गुजरातच्या राजकारणात पाटीदार समुदायाची मोठी भूमिका आहे. तथापि खुद्द भाजपतील अनेकांची हार्दिक यांच्या पक्षप्रवेशावर नाराजी आहे. त्यामुळे त्यांचा विरोध पत्करून पक्षात आपले स्थान तयार करणे हे मोठे आव्हान हार्दिक यांच्यापुढे आहे.

गुजरातचे पाटीदार समाजाचे तरुण नेते हार्दिक पटेल यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसबरोबर हार्दिक यांची इनिंग फारकाळ चालली नाही. हार्दिक यांनी 2019 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि 2020 मध्ये त्यांना राज्याचे कार्यकारी अध्यक्षदेखील केले होते. परंतु अन्याय होत असल्याचा आरोप करत त्यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि आता ते भाजपवासी होत आहेत. हार्दिक पटेल हे भाजपमध्ये दाखल झाल्याने भाजपला पाटीदार समुदायाची मोठी मदत मिळू शकते.

हार्दिक पटेल यांनी भाजपचे कमळ हाती घेतले असले तरी या पक्षात त्यांना अनेक प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. गेल्या सात वर्षांत ते गुजरातमध्ये भाजपच्या विरोधात मैदानात उतरले होते. त्यामुळे भाजपमधील एक गट त्यांना पक्षात प्रवेश करण्यास विरोध करत होता. पक्षनेतृत्वाने मंजुरी दिल्यानंतर त्यांना प्रवेश मिळाला. अर्थात, पक्षात अन्य नेत्यांशी ट्युनिंग बसवणेदेखील वाटते तेवढे सोपे नाही. हार्दिक यांनी नरेंद्र मोदी यांना भारताचे सर्वात यशस्वी पंतप्रधान म्हणून म्हटले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिपाई म्हणून काम करणार असल्याचे सांगितले आहे.

- Advertisement -

काँग्रेसला आणखी झटका देणार

भाजपमध्ये सामील होण्याबरोबरच हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये नाराज असणार्‍या अन्य नेत्यांना भाजपमध्ये आणण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी म्हटले की, आपण आयुष्यातील नवीन अध्यायाला सुरुवात केली आहे. दर दहा दिवसांला कार्यक्रम आयोजित करू आणि त्यात काँग्रेसमधील नाराज लोकांना आणू. हार्दिक यांच्या वक्तव्यावरून एक बाब स्पष्ट झाली की, आगामी काळात ते काँग्रेसला धक्का देऊ शकतात.

हार्दिक यांच्याकडून भाजपवर हल्ले

हार्दिक आता भाजपचे नेते झाले असले तरी त्यांच्यासमोरील आव्हाने कमी नाहीत. गुजरातमधील पाटीदार आंदोलनाच्या काळात आणि काँग्रेस सदस्यत्व स्वीकारल्यानंतर हार्दिक पटेल यांनी भाजपवर शाब्दिक हल्ले केले होते. भाजपच्या अनेक नेत्यांच्या कार्यक्रमात हार्दिक पटेल यांच्या समर्थकांनी अडथळे आणले आहेत. त्यामुळे भाजपच्या प्रवेशावेळी एका गटाकडून सातत्याने विरोध केला गेला आहे. भाजपचा एक गट हार्दिक यांच्या भाजपविरोधी भूमिकेवरून नाराज आहे. त्यामुळे त्यांनी पक्षात प्रवेश देण्यास विरोधही केला होता. या गटाच्या मते, हार्दिक पटेल यांनी भाजपचे बरेच नुकसान केले आहे. आता काँग्रेसमधील स्वत:ची अधोगती पाहता ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या मते, यापूर्वीदेखील काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसमधून येणार्‍यांबद्दल आम्हाला कोणताही आक्षेप नाही. परंतु हार्दिक यांचा विचार केल्यास त्यांनी भाजपचे खूप नुकसान केले आहे. म्हणून राज्यातील बहुतांश मोठे नेते हार्दिक यांना पक्षात घेण्याबाबत नाखूश आहेत.

पाटीदार नेत्यांचादेखील हार्दिक यांना विरोध

गुजरातमधील भाजपमध्ये आज अनेक पाटीदार नेते आहेत आणि त्यांना हार्दिक पटेल यांना प्रवेश देणे पचनी पडलेले नाही. पाटीदार समुदायावर चांगली पकड ठेवणारे भाजपचे नेते वरुण पटेल यांनी म्हटले की, हार्दिक यांच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी घाम गाळला आहे. ही लढाई केवळ भाजप आणि काँग्रेस यांच्यापुरतीच नाही तर या काळात अनेक व्यक्तिगत हल्लेदेखील केले गेले आहेत. हार्दिक पटेल यांच्या काँग्रेस प्रवेशाचा पक्षाला फारसा फायदा झाला नव्हता. अशावेळी हार्दिकमुळे भाजपलादेखील लाभ होणार नाही, असे काही नेत्यांचे म्हणणे आहे. चिराग पटेल यांनीदेखील हार्दिक पटेल यांना पक्षात घेण्यास विरोध केला होता. त्यांच्या मते, पाटीदार समुदाय शिक्षित असून ते निर्णय घेण्यास सक्षम आहेत.

ट्युनिंग बसवणे कठिण

भाजपमधील पाटीदार नेत्यांना हार्दिक पटेल यांचा प्रवेश भावलेला दिसून येत नाही. त्यामुळे त्यांच्यासमवेत ट्युनिंग बसवणे हार्दिक यांना कठिण जाणार आहे. सोशल मीडियावर हार्दिक यांचे जुने व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओत ते भाजपवर प्रखर शाब्दिक हल्ले करताना दिसतात. भाजपसमोर आपण कधीही झुकणार नाही. भाजपला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचे हार्दिक यांचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर स्पष्टीकरण देताना हार्दिक पटेल यांची दमछाक होणार आहे.

हार्दिक यांचा कस लागणार?

हार्दिक यांच्या प्रवेशानंतर भाजपच्या एका नेत्याने म्हटले की, हार्दिक पटेल यांना लगेच काही मानाचे पान नसेल. पक्षाचे सदस्य म्हणून त्यांच्या शिस्तीचे आकलन केले जाईल आणि त्यांना आपली पात्रता सिद्ध करून दाखवावी लागणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते शक्तिसिंह गोहिल यांनी म्हटले की, हार्दिक पटेल हे सहा महिन्यांपासून भाजप नेत्यांच्या संपर्कात होते. त्यांचा भाजपमधील प्रवेश हा एक संधिसाधूपणा आहे. ही गोष्ट गुजरातच्या लोकांना चांगलीच ठावूक आहे. हार्दिक पटेल आता केवळ टीव्हीवरचे वाघ राहिले आहेत.

तज्ज्ञ मंडळी काय म्हणतात?

आरक्षणाच्या आंदोलनात हार्दिक पटेल यांच्यासमवेत राहिलेले लालजी पटेल यांनी हार्दिक यांचा भाजप प्रवेश हा चुकीचा निर्णय असल्याचे म्हटले आहे. हार्दिक यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून चूक केली होती आणि तीच चूक पुन्हा केली आहे, असे ते म्हणतात. कारण आरक्षण आंदोलनादरम्यान त्यांनी आपण कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसल्याचे जाहीर केले होते. आता हे आश्वासन तोडले आहे. त्यामुळे त्यांना राजकारणात आरक्षण आंदोलनाप्रमाणे यश मिळणार नाही. दुसरीकडे ‘वोटर्स मूड रिसर्च’चे सीईओ जय मृग म्हणाले की, भाजपच्या प्रवेशाने हार्दिक पटेल हे आता प्रत्यक्षात राजकारणाच्या मैदानात उतरले आहेत. त्यांची राजकीय इनिंग सुरू झाली आहे.

भाजपसाठी कसे आहेत उपयुक्त?

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होत असून त्यात पाटीदार समुदायाची मोठी भूमिका असेल. सौराष्ट्राच्या 54 जागांवर पाटीदारांची भूमिका निर्णायक राहिली आहे. 2012 च्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये सौराष्ट्रात 12 जागा जिंकल्या आणि 2017 मध्ये काँग्रेसने भाजपला मागे टाकत 30 जागा जिंकल्या होत्या. 2017 मध्ये भाजपला केवळ 24 जागा मिळाल्या होत्या. यंदा भाजप काँग्रेसला जोरदार टक्कर देण्यासाठी सौराष्ट्रात संपूर्ण ताकद पणाला लावणार आहे. पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे पाटीदार समुदायाच्या कार्यक्रमात सातत्याने सहभागी होत आहेत. अशावेळी हार्दिक पटेल यांचा प्रवेश उपयुक्त ठरू शकतो. त्याच्या मदतीने भाजप पाटीदारांवर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करू शकतो.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या