Thursday, October 29, 2026
Homeक्राईमAhilyanagar : वडारवाडी ग्रामपंचायतीमध्ये सफाई कामगार महिलेचा खून

Ahilyanagar : वडारवाडी ग्रामपंचायतीमध्ये सफाई कामगार महिलेचा खून

सरपंचांच्या कॅबिनमध्ये डोक्यात पाण्याचा लोखंडी वॉल घातला

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

एकतर्फी प्रेमातून महिलेला वारंवार त्रास देत अखेर तिच्या डोक्यात पाण्याचा लोखंडी वॉल मारून खून केल्याची धक्कादायक घटना भिंगारमधील वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंचांच्या कॅबिनमध्ये मंगळवारी (27 ऑक्टोबर) सकाळी घडली. अनिता देविदास आळकुटे (वय 42, रा. तागडकरवस्ती, वडारवाडी, भिंगार) असे मृत महिलेचे नाव आहे. संशयित संतोष नाना धोत्रे (रा. वडारवाडी) याच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -

याबाबत मृत महिलेचा मुलगा योगेश देविदास आळकुटे (वय 26) याने फिर्याद दिली आहे. अनिता आळकुटे या मागील सुमारे 20 वर्षांपासून वडारवाडी ग्रामपंचायतीमध्ये सफाई कामगार म्हणून काम करत होत्या. ग्रामपंचायतीच्या कचरा गाडीवर संतोष धोत्रे हा काम करत असल्याने अनिता आणि त्याची ओळख होती. सुमारे महिनाभरापूर्वी अनिता यांनी संतोष धोत्रे हा आपल्यावर प्रेम असल्याचे वारंवार सांगत असून, नकार दिल्याने विनाकारण त्रास देत असल्याचे मुलगा योगेश धोत्रे याला सांगितले होते. त्यानंतर योगेश आणि त्याच्या आईने संतोषला समजावून सांगितले होते. शुक्रवार (23 ऑक्टोबर) सकाळी साडेनऊच्या सुमारास अनिता या बिगारी कामासाठी जात असताना कावेरी हॉस्पिटलजवळ संतोष याने त्यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचे त्यांनी घरी आल्यानंतर मुलाला सांगितले होते. त्यावेळीही संतोषला समजावून सांगण्यात आले; मात्र पोलिसांत तक्रार देण्यात आली नव्हती.

दरम्यान, मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास अनिता या नेहमीप्रमाणे वडारवाडी ग्रामपंचायत कार्यालयात कामासाठी गेल्या होत्या. सकाळी 10:18 वाजता योगेश घरी असताना त्याचा चुलत मामा सूरज तागडकर यांचा फोन आला. ग्रामपंचायत कार्यालयात लवकर ये, संतोष धोत्रे याने तुझ्या आईचा खून केला आहे, असे त्यांनी सांगितले. ही माहिती मिळताच योगेश याने ग्रामपंचायत कार्यालयाकडे धाव घेतली. तेथील सरपंचांच्या कार्यालयात त्याची आई अनिता या डोक्याला गंभीर जखम झालेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांच्या डोक्याजवळ रक्त लागलेला पाण्याचा लोखंडी वॉल पडलेला होता.

पूर्वीच्या त्रासाची फिर्यादीत नोंद
आईला एकतर्फी प्रेमातून त्रास दिला जात असल्याचे तसेच यापूर्वी मारहाण झाल्याचेही योगेश याने फिर्यादीत नमूद केले आहे. संतोष धोत्रे याने आईच्या डोक्यात लोखंडी वॉल मारून खून केल्याचा आरोप त्याने केला आहे. या प्रकरणी योगेश आळकुटे याने पोलिसांकडे फिर्याद दिली असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कोपरगाव, राहुरीत तीन ठिकाणी छापे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेंतर्गत येथील अन्न व औषध प्रशासनाने कोपरगाव आणि राहुरी येथे तीन ठिकाणी...