Saturday, September 21, 2024
Homeनाशिकवागदर्डी धरणाने गाठला तळ

वागदर्डी धरणाने गाठला तळ

मनमाडकरांवर पावसाळ्यात पाणीटंचाईचे संकट

- Advertisement -

मनमाड । प्रतिनिधी Manmad

मुंबई, पुणेसह राज्यात वेगवेगळ्या भागात पावसाने हाहाकार माजविलेला आहे. मात्र पावसाळा सुरु होऊन दोन महिन्याचा कालावधी उलटल्या नंतर देखील मनमाड शहर परिसरात रिमझिम पाऊस वगळता सलग आणि जोरदार पर्जन्यवृष्टी झालेली नाही. विशेषतः वागदर्डी धरणाचे पाणलोटक्षेत्र कोरडे असल्यामुळे धरणाने तळ गाठला असल्याने भीषण पाणी टंचाईचे संकट कायम असल्याने शहरवासिय अक्षरश: त्रस्त झाले आहे.

दरम्यान, पालखेड धरणातून मिळणार्‍या पाण्याच्या आवर्तनावर पाणीपुरवठ्याची सर्व भिस्त असल्याने लवकरात लवकर आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी पालिका प्रशासन आणि आमदार सुहास कांदे यांनी केली आहे.

वागदर्डी धरणात जेमतेम पाण्याचा साठा शिल्लक आहे त्यामुळे ऐन पावसाळ्यात देखील शहरात पाणी टंचाईची तीव्रता कायम आहे. पालिकेतर्फे महिन्यातुन एकदा पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आगामी काळात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सलग आणि जोरदार पाऊस नाही झाला तर पुढे काय होईल अशी चिंता नागरीकांतर्फे व्यक्त केली जात आहे.

गेल्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती.पावसा अभावी धरणाने तळ गाठला तर बोरवेल देखील बंद पडल्या होत्या त्यामुळे नागरिकांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागले मात्र यंदा चांगला पाऊस होण्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तविला होता त्यानुसार वेळेवर पावसाला सुरुवात होऊन जून महिन्यात शहर परिसरात तीन वेळा चांगला पाऊस झाला होता.

दमदार पाऊस झाल्यामुळे बंद पडलेले सर्व बोरवेल पुन्हा सुरु झाले त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळालेला असताना दुसरीकडे मात्र शहराला पाणी पुरवठा करणार्‍या वागदर्डी धरणाचे पाणलोट क्षेत्र कोरडेच असून जुलै महिना देखील संपला मात्र धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने हजेरी लावली नाही त्यामुळे धरणात पावसाचे पाणी आले नसल्याने धरणाने तळ गाठला असून धरणात पाण्याचा मृतसाठा शिल्लक आहे त्यातून पालिकेतर्फे महिन्यातून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे.

धरणात गाळयुक्त पाणी असल्यामुळे त्याला फिल्टर केल्यानंतर देखील नळाला गढूळ पाणी येत असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला देखील धोका निर्माण झाला आहे. शहराचा पाणी पुरवठा पावसा सोबत पालखेड धरणातून आवर्तनाच्या माध्यमातून मिळणार्‍या पाण्यावर अवलंबुन आहे. गेल्या वर्षी पाहिजे तेवढा पाऊस झाला नाही त्यामुळे बहुतांश बोरवेल बंद पडल्या होते.

एकीकडे धरणात पाणी साठा कमी असल्यामुळे पालिके तर्फे महिन्यातून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे तर दुसरीकडे बोरवेल देखील बंद पडल्यामुळे पाणी टंचाईचे दुहेरी संकट शहरावर आले होते त्यामुळे सर्वांचे लक्ष जोरदार पावसा कडे लागले होते मात्र पावसाळा सुरु होऊन दोन महिने झाले तरी देखील सलग आणि जोरदार पाऊस झालेला नाही जर आगामी काळात सलग आणि जोरदार पाऊस नाही झाला तर काय होईल अशा चिंतेत असलेल्या नागरीक व महिलांचे लक्ष पावसा सोबत आमदार सुहास कांदे यांच्या अथक प्रयत्नातुन मंजूर करण्यात आलेली करंजवन पाणी पुरवठा योजनेकडे लागले आहे.

करंजवन योजना पूर्ण झाली तर त्यातून नागरिकांची पाणी टंचाईतुन कायमस्वरूपी सुटका होणार आहे. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याने ती केव्हा सुरू होते याची उत्सुकता शहरवासियांना आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या