वैजापुर | प्रतिनिधी
भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचवर बेकायदेशीररीत्या मोबाईल द्वारे ऑनलाईन पैसे लावून वैजापूर शहरात सुरू असलेल्या सट्टा अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केले आहे. याप्रकरणी आनंद मदनराज जैन (वय 34 वर्षे राहणार मारवाडी गल्ली वैजापूर) गोकुळ कपूर सिंग राजपूत (वय 37 वर्षे राहणार परदेशी गल्ली वैजापूर) यांच्याविरुद्ध वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, परदेशी गल्ली येथे बेकायदेशीररीत्या भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅचवर ऑनलाईन पद्धतीने सट्टा लावण्यासाठी जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता त्यांना त्या ठिकाणी आनंद मदनराज जैन व गोकुळ कपूर सिंग राजपूत हे दोघे जुगार खेळताना व खेळवीताना आढळून आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून मोबाईल, रोख रक्कम, लॅपटॉप असा एकूण दोन लाख 65 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई योगेश पंढरीनाथ कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैजापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बनसोडे मॅडम या करीत आहेत.