पुणे | Pune
पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात (Vaishnavi Hagawane Death Case) दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. वैष्णवी हगवणे यांची आत्महत्या नसून खून झाल्याचा संशय पोलिसांच्या रिमांड कॉपीमधून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच आता वैष्णवी हगवणेच्या (Vaishnavi Hagawane) आत्महत्येनंतर तिच्या नऊ महिन्याच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी बंदूकधारी निलेश चव्हाणवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय चव्हाण याच्या घरावर पोलिसांनी छापा (Raid) मारल्याचे देखील समोर आले आहे.
याबाबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम (Sambhaji Kadam) माहिती देताना म्हणाले की, “निलेश चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी पंचनामे करत छापेमारी केली आहे. याशिवाय त्याचा लॅपटॉप देखील जप्त केला असून, त्याच्या वडीलांना आणि भावाला चौकशीसाठी बोलावले आहे. तसेच जे-जे लोक त्या दिवशी प्रत्यक्षदर्शी होते, ज्या दिवशी कस्पटे यांना धमकी दिली. त्या सर्वांना चौकशीसाठी बोलविण्यात येईल”, असे त्यांनी म्हटले आहे.
वैष्णवीचे ९ महिन्यांचे बाळ आणण्यासाठी तिच्या माहेरचे लोक २० मे रोजी कर्वेनगर येथील निलेश चव्हाणच्या घरी गेले होते. यावेळी त्याने पिस्तुलाचा धाक दाखवून कस्पटे कुटुंबीयांना धमकावले होते. १६ मे रोजी वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर तिचे नऊ महिन्यांचे बाळ (Child) तिची नणंद करिष्मा हगवणेने निलेशच्या ताब्यात दिले होते. यानंतर कस्पटेंनी २१ मे रोजी पुन्हा हे बाळ स्वतःकडे घेण्याचा पुन्हा प्रयत्न केला होता. मात्र, तेव्हा निलेशने हे बाळ पिरंगुट गावातील एका व्यक्तीकडे सोपवले होते.
त्यानंतर दुपारी हे बाळ पुणे-मुंबई महामार्गावर (Mumbai-Pune Higway) वैष्णवीचे काका मोहन कस्पटेंकडे सोपवण्यात आले होते. त्यामुळे नऊ महिन्यांच्या बाळाची प्रचंड हेळसांड झाली होती. त्यानंतर कस्पटे कुटुंबीयांच्या तक्रारीवरून निलेश चव्हाणच्या विरोधात याप्रकरणी वारजे पोलीस ठाण्यात (Warje Police Station) भारतीय दंड विधान कलम ३५१ (३) आणि शस्त्र कायदा कलम ३० अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
निलेश चव्हाणची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृ़त्तीची
निलेश चव्हाणवर २०१९ साली पत्नीच्या बेडरूममध्ये स्पाय कॅमेऱ्याद्वारे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा गुन्हा वारजे पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, पोलिसांनी आता त्याच्या पुण्यातील कर्वेनगर परिसरातील घरावर छापा मारून तेथील काही तपासाच्या दृष्टिकोनातून ताब्यात घेण्याची शक्यता आहे. तसेच निलेश याचा लॅपटॉप ताब्यात घेण्यात आला असून, यात इतरही मुलींसोबतचे त्याचे आक्षेपार्ह व्हिडीओ असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या लॅपटॉपमधून आणखी मोठ्या गोष्टींचा उलगडा होऊ शकतो.
निलेश चव्हाण पोलिसांसमोर सरेंडर होणार
निलेश चव्हाणवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आल्याने तो आता पोलिसांसमोर सरेंडर होणार असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबतचा त्याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. त्यामुळे तो सरेंडर झाल्यास वैष्णवी हगवणे मृत्युप्रकरणी पोलिसांना तपासाला अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.