Tuesday, May 28, 2024
Homeनगरवळण पिंप्री यात्रोत्सवात तुफान हाणामारी

वळण पिंप्री यात्रोत्सवात तुफान हाणामारी

वळण, राहुरी |प्रतिनिधी| Valan| Rahuri

राहुरी तालुक्यातील पिंपी वळण येथील कानिफनाथ महाराजांच्या यात्रेत दोन समाजांच्या गटात वाद निर्माण होऊन दगडफेक व हाणामारी झाल्याने काही काळ गावामध्ये तणाव निर्माण झाला होता. या घटनेत काहीजण किरकोळ जखमी झाल्याचेही समजते. राहुरी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने हा वाद निवळला व देवाच्या काठीची छबिना मिरवणूक शांततेत पार पडली.

- Advertisement -

काल गुरूवार दि. 2 मार्च रोजी राहुरी तालुक्यातील पिंप्री वळण येथील ग्रामदैवत कानिफनाथ महाराजांचा यात्रोत्सव सुरू होता. त्याचवेळी मुळानदी पुलावर काही तरुण बसलेले असता एका समाजातील गावातील व बाहेर गावावरून आलेल्या टोळक्याने पुलावर बसलेल्या तरुणांना वाद निर्माण करण्याच्या हेतूने शिवीगाळ सुरू केल्याने दोन्ही गटांत तुफान हाणामारी सुरू झाली. त्यानतंर एका गटाकडून दगडफेक झाल्याचेही समजते. या अचानक घडलेल्या घटनेमुळे गावात सुरू असलेल्या यात्रोत्सवाच्या आनंदावर विरजन पडले.

यात्रेत आलेल्या खाऊ, खेळणी तसेच इतर छोट्या व्यावसायिकांनी आपला गाशा गुंडाळून तेथून पळ काढला. या घटनेची राहुरी पोलिसांना माहिती मिळताच राहुरीचे पोलीस निरीक्षक डांगे श्रीरामपूर जिल्हा पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलिसांचा फौजफाटा तैनात केला. यावेळी शिघ्र कृती दलाच्या पथकालाही पाचारण करण्यात आले त्यामुळे गावाला छावणीचे स्वरूप आले होते.

पिंप्री वळण गावात तणावपुर्ण शांतता असून राहुरीचे पोलीस निरीक्षक डांगे यांच्या हस्ते देवाची आरती होऊन देवाच्या काठीची छबिना मिरवणूकीची सांगता करण्यात आली. दरम्यान या देवस्थान व देवस्थानाच्या जमिनीवरून दोन समाजात न्यायालयात वाद सुरू असल्याचे समजते. काहींना या यात्रोत्सवात मुद्दामहून वाद घालण्यासाठी बाहेरून माणसे बोलवून हा वाद निर्माण केल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या