Saturday, July 27, 2024
Homeनगरवांबोरीत महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

वांबोरीत महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असतानाच सायरन वाजला आणि पोलीस हजर झाल्याने चोरटे पसार झाले. या तत्परतेबद्दल नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.

- Advertisement -

बाजारतळावर महाराष्ट्र बँकेने एटीएम बसविले आहे. मंगळवारी मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास तीन ते चार चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश केला. सीसीटीव्ही कॅमेर्‍यावर काळ्या रंगाचा फवारा मारला, एटीएमच्या काचांवरती फवारा मारला व एटीएम फोडण्याच्या मार्गावर असतानाच एटीएमचा सायरन वाजला. सायरन वाजल्यानंतर चोरट्यांनी त्या ठिकाणाहून धूम ठोकली.

यावेळी तातडीने पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना कॉल केला व त्यांनी लगेच गस्तीवर असणारे सहाय्यक फौजदार चंद्रकांत बराटे, पोलीस मित्र गोरक्षनाथ दुधाडे यांना कल्पना दिली. ते पाच मिनिटांत पोहोचले. किमान दहा लाख रुपये एटीएममध्ये असल्याचे समजते.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे एटीएमची रक्कम वाचली. एटीएमच्या आसपास पाचशे फुटाच्या अंतरावर वडाचे झाड आहे. या ठिकाणी चोरट्यांनी चारचाकी गाडी उभी केली होती. यावेळेस तीन ते चार मुलं गावामध्ये होल्डिंग बोर्ड लावत होते. त्यांनी या आरोपींना पाहिले परंतु आरोपींच्या तोंडाला काळे रुमाल बांधलेले होते. हे चोर असावे असं लक्षात न आल्यामुळे चोर तरुणांसमोरूनच बँकेकडे गेले.

सकाळी उपविभागीय अधिकारी बसवंत शिवपुजे, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, एपीआय वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वांबोरी पोलीस स्टेशनमध्ये काही संशियतांना बोलावून चौकशी करण्यात आली. पोलिसांनी ताबडतोब चौकशीचे चक्र फिरवले असून चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालेले आहेत परंतु त्यांच्या तोंडाला काळे रुमाल बांधलेले असल्यामुळे त्यांची ओळख पटवणे पोलिसांना अवघड आहे.

वांबोरी परिसरातील व्यापारी व दुकानदारांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी सहकार्य करावे, पोलीस प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत. यापुढेही पोलिसांना सहकार्य करावे,असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी बँकेच्या अधिकार्‍यांना बोलावून घटनेची खबर नोंदवावी, अशी विनंती केली. यावेळी अधिकार्‍यांनी तक्रार देण्यास टाळाटाळ केली.एवढी मोठी घटना होऊन सुद्धा बँकेचे अधिकारी तक्रार का देत नाही? हा मोठा चर्चेचा विषय बनला असून कोणी तक्रार दिली नाही तर पोलिसांनाही तपास करण्यासाठी अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे कुठली घटना झाली तर तक्रार दाखल केलीच पाहिजे, अशी नागरिकांमधून चर्चा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या