Saturday, July 27, 2024
Homeनगरवांबोरीच्या ग्रामसभेत सदस्यांचे पती व ग्रामस्थांमध्ये हमरीतुमरी

वांबोरीच्या ग्रामसभेत सदस्यांचे पती व ग्रामस्थांमध्ये हमरीतुमरी

उंबरे |वार्ताहर| Umbare

वांबोरीच्या ग्रामसभेत शाब्दिक बाचाबाची झाल्यामुळे ही ग्रामसभा चांगलीच गाजली. एका महिला सदस्याचे पती व ग्रामस्थांमध्ये खडाजंगी होऊन हमरीतुमरीवर आले. मात्र, काही सदस्यांनी व पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वाद निवळला व पुन्हा ग्रामसभा सुरू झाली.

- Advertisement -

सोमवार दि. 28 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामपंचायत आवारात सरपंच किरण ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. ग्रामसभेत काही ग्रामस्थांनी विविध प्रश्नांचा ग्रामपंचायत प्रशासनावर भडिमार केला. यावेळी रवी पटारे हे सरपंच यांच्याशी चर्चा करीत असताना विशाल पारख यांनी आक्षेप घेऊन रवी पटारे यांना सांगितले की, तुम्ही सरपंच यांना काही सांगू नका, त्यांना उत्तरे देऊ द्या, असे म्हणताच पटारे यांनी मी सरपंचाशी ठराव करण्याची चर्चा करीत असून तुम्ही मला बोलण्याचे कारण नाही. यानंतर पटारे व पारख यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी काही ग्रामस्थ व पोलिसांनी मध्यस्थी करून वातावरण शांत केले.

ग्रामसभेत पिण्याचे पाणी हे आठ दिवसाला येत असून ग्रामपंचायतीने पाणीपट्टी 1200 रुपये असताना ती 1800 रुपये कशी केली? व ती रद्द करून 1200 ठेवावी अशी, मागणी ग्रामस्थांनी केली. नाहीतर दिवसाआड पाणी पुरवठा करावा, असा आग्रह ग्रामस्थांनी धरला. वांबोरी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जमिनीमधून मुरूमाचे उत्खनन केले जाते. यावर ग्रामपंचायत निबर्ंध आणणार का? कुणाच्या आशीर्वादाने हे उत्खनन होते. शासनामार्फत दिलेल्या काही घरकुलांचे अर्धवट बांधकाम झाले असून त्यांनी रक्कम पण उचलेली आहे. अशा लाभार्थ्यांनी घरकुले पूर्ण न केल्यास त्यांच्यावर कायदेशिर कारवाई करण्यात यावी, वांबोरी येथे असणार्‍या सर्व शाळांसमोर रोडरोमीयो गावातील चौकांत थांबून मुलींची व महिलांची छेड काढतात. अशा टारगटांंचा बंदोबस्त पोलिसांनी करावा.

10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत मोबाईल बंदी घालण्यात यावी. गावात प्रत्येक दुकानात प्लास्टीकचा सर्रास वापर होत असून सर्व दुकानदारांनी सूचना देऊन प्लास्टीकवर बंदी घालण्यात यावी, जर कोणी प्लास्टीकचा वापर केला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. वांबोरी गावातील महिला व पुरूष वर्ग रात्री व पहाटेच्या सुमारास फिरण्यास जातात. परंतु, संपूर्ण गावातील पथदिवे बंद असल्याने अनेकांना कुत्रे, साप अशा प्राण्यांपासून धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी पंचायतीने तात्काळ पथदिवे दुरूस्ती करून सुरू करावेत. तसेच मुलींची संख्या कमी असल्याकारणाने अनेकांना आपल्या मुलांचे लग्न करून आणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे स्त्री जन्माचे स्वागत प्रत्येकाने करावे. वांबोरी बाजारतळावरील अनेक दिवसांपासून बांधलेेले गोडावून भाडे तत्वावर देण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली.

शासनाच्या स्वच्छ भारत अभियान, पाणी गुणवत्ता, वृक्ष लागवड व संवर्धनाबाबत, ‘माझी वसुंधरा अभियान’ अशा अनेक विषयांवर ग्रामसभेत चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रामविकास आधिकारी बी. के. गागरे यांनी ग्रामसभेच्या विषय पत्रिकेचे वाचन केले.

यावेळी जि.प. चे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, उपसरपंच मंदाताई भिटे, अश्विनी पटारे, मंगल नागदे, शितल मकासरे, लता गुंजाळ, आशाताई पटारे, संगीता डोंगरे, डॉ. पवार, महवितरणचे भोर, सहाय्यक फौजदार चंद्रकांत बर्‍हाटे, पो.कॉ. पालवे, सारंगधर पटारे, रंगनाथ गवते, नितीन बाफना, विष्णू ढवळे, ईश्वर कुसमुडे, संजय नागदे,तुषार मोरे, गोरक्षनाथ ढवळे, नितीन बाफना, विलास गुंजाळ, सुदाम पाटील, राजू पाटील, बंडू पटारे, दिगंबर पटारे, हरिभाऊ काळे, ज्ञानेश्वर तांबटकर, सुनील शेलार, प्रदीप बाफना, योगेश राऊत, भाऊ पटारे, अण्णा धोत्रे, सुरज मकासरे, भरत भांबळ, बाळू मकासरे आदींसह ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते.

वांबोरी येथील कृषि विभागातील कर्मचारी व आधिकारी त्यांच्या कार्यालयात ते जागेवर उपस्थित नसतात. शेतकर्‍यांनी फोन केला तर आम्ही बाहेर शेतावर भेटीसाठी आलो आहोत असे कारणे सांगून शेतकर्‍यांची दिशाभुल करतात. शासकिय बियाणे व इतर खते मागणी केली असता ते त्यांच्या संपर्कातील ठरावीक शेतकर्‍यांना रात्रीतून ही बियाणे व खते वाटप करतात. असा आरोप ग्रामसभेत काही शेतकर्‍यांनी केला असता यावेळी तेथे उपस्थित कृषि सहाय्यक बाचकर यांची चांगलीच भंबेरी उडाली. व त्यांनी शेतकर्‍यांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने शेतकरी संतप्त झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या