उंबरे |वार्ताहर| Umbare
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे निखिल देवकर या 23 वर्षीय तरुणाने काल दि. 24 एप्रिल रोजी पहाटे 2 वाजेच्या सुमारास वांबोरी परिसरात धावत्या रेल्वेसमोर उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. त्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणार्या पेट्रोलपंप मालकावर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी देवकर यांच्या नातेवाईकांनी वांबोरी पोलीस चौकीवर ठिय्या मांडला. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांकडे आत्महत्येस कारणीभूत असलेल्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे दि. 18 एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास सहा जणांच्या टोळक्याने शांतीलाल कांतीलाल अॅण्ड सन्स यांच्या पेट्रोल पंपावर कामगारांना शिवीगाळ करुन धुडगूस घातल्याचा आरोप करून सहा जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानंतर निखील रावसाहेब देवकर (वय 23) रा. वांबोरी, या तरुणाने 24 एप्रिल रोजी पहाटे 2 वाजे दरम्यान वांबोरी परिसरात धावत्या रेल्वेसमोर उडी मारली. या घटनेत तो जागीच मयत झाला. त्यानंतर मयत निखील देवकर याच्या नातेवाईकांनी वांबोरी येथील पोलीस चौकी समोर ठिय्या मांडत निखील याला आत्महत्येस प्रवृत्त करणार्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा. अन्यथा आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा घेतल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेह वांबोरी येथील पोलीस चौकीसमोर ठेवण्यात आला होता.
राधेशाम दत्तात्रय कुसमुडे (रा. वांबोरी, ता. राहुरी) यांनी लोहमार्ग पोलिसाकडे दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले, निखील देवकर याच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्याचा व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करण्यात आली. या कारणातून मानसिक तणावामुळे निखील याने आत्महत्या केली. सुमित किरण ऊर्फ बाळासाहेब मुनोत व किरण मुनोत यांनी बदनामी केल्यामुळे निखील हा आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाला. राधेशाम दत्तात्रय कुसमुडे रा. वांबोरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून किरण शांतीलाल मुनोत (रा. वांबोरी), सुमित किरण मुनोत (रा. वांबोरी) यांच्या विरोधात अहमदनगर लोहमार्ग पोलीस ठाण्यात गु.र.न. 64 प्रमाणे भारतीय न्याय संहिता 108, 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.