Wednesday, February 11, 2026
Homeदेश विदेशVande Mataram : आता सार्वजनिक कार्यक्रमात पूर्ण 'वंदे मातरम्' अनिवार्य; केंद्र सरकारकडून...

Vande Mataram : आता सार्वजनिक कार्यक्रमात पूर्ण ‘वंदे मातरम्’ अनिवार्य; केंद्र सरकारकडून नवी नियमावली जाहीर

दिल्ली । Delhi

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीची मशाल पेटवणाऱ्या ‘वंदे मातरम्’ या गीताचा सन्मान अधिक वृद्धिंगत करण्यासाठी केंद्र सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या गीताबाबत नवीन आणि सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

- Advertisement -

नव्या नियमावलीनुसार, आता सरकारी आणि अधिकृत कार्यक्रमांमध्ये ‘वंदे मातरम्’ सुरू असताना उपस्थित असलेल्या प्रत्येकाला आदरार्थ उभे राहणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भात गृहमंत्रालयाने १० पानांचा सविस्तर आदेश जारी केला असून, त्याची प्रत सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश, मंत्रालये आणि संवैधानिक संस्थांना पाठवण्यात आली आहे.

YouTube video player

या निर्णयामागे एक महत्त्वाचे ऐतिहासिक औचित्य आहे. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी ‘वंदे मातरम्’ गीताला १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. या दीडशे वर्षांच्या प्रवासाचे निमित्त साधून केंद्र सरकारने देशभरात विविध उपक्रम राबवले होते. याच मोहिमेचा एक भाग म्हणून राष्ट्रीय गीताचा दर्जा जपण्यासाठी आणि शिस्तबद्धता आणण्यासाठी ही नवीन नियमावली लागू करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. या नव्या बदलांमुळे आता राष्ट्रीय कार्यक्रमांच्या स्वरूपात महत्त्वाचे बदल होणार आहेत.

नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ‘वंदे मातरम्’च्या गायनाच्या वेळेत आणि स्वरूपात मोठा बदल करण्यात आला आहे. आता कोणत्याही सरकारी कार्यक्रमात या गीताची सर्व सहा कडवी गाणे अनिवार्य असेल. यापूर्वी सामान्यतः वंदे मातरमची पहिली दोन कडवी गायली जात होती, ज्यासाठी ६५ सेकंदांचा वेळ लागत असे. मात्र, आता पूर्ण सहा कडव्यांचे गायन करावे लागणार असून, त्यासाठी ३ मिनिटे १० सेकंदांचा वेळ निश्चित करण्यात आला आहे. यामुळे अधिकृत कार्यक्रमांमध्ये या गीताला आता अधिक सविस्तर आणि भव्य स्वरूप प्राप्त होणार आहे.

कार्यक्रमाच्या शिष्टाचाराबाबतही केंद्र सरकारने अत्यंत स्पष्ट निर्देश दिले आहेत. जर एखाद्या कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ आणि ‘जन गण मन’ (राष्ट्रगीत) ही दोन्ही गीते सादर करायची असतील, तर अशा वेळी प्रथम ‘वंदे मातरम्’ वाजवले किंवा गायले जाईल आणि त्यानंतर राष्ट्रगीत सादर केले जाईल. ध्वजारोहण, राष्ट्रपती आणि राज्यपालांचे अधिकृत कार्यक्रम, तसेच त्यांचे राष्ट्राला उद्देशून होणारे संबोधन यापूर्वी ‘वंदे मातरम्’ वाजवले जाणार आहे. हा क्रम आता सर्व स्तरांवरील सरकारी सोहळ्यांमध्ये पाळला जाईल.

गृहमंत्रालयाने हे गीत कधी आणि कुठे वाजवावे, याचेही निकष ठरवून दिले आहेत. नागरी सन्मान सोहळे, पदवीदान समारंभ किंवा सरकारी पुरस्कार वितरणावेळी हे गीत वाजवले जाईल. तसेच राष्ट्रपती किंवा राज्यपालांच्या आगमन आणि प्रस्थानाच्या वेळीही याचे गायन होईल. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रपतींच्या भाषणानंतर आणि पूर्वी हे गीत अनिवार्य असेल. याव्यतिरिक्त, परेडमध्ये राष्ट्रीय ध्वज नेला जात असताना किंवा कोणत्याही महत्त्वपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमात ध्वजारोहण करताना ‘वंदे मातरम्’चा जयघोष केला जाईल.

‘वंदे मातरम्’चा इतिहास अत्यंत प्रेरणादायी आहे. बंकिम चंद्र चट्टोपाध्याय यांनी ७ नोव्हेंबर १८७५ रोजी ‘आनंदमठ’ या कादंबरीद्वारे हे गीत जगासमोर आणले. १८९६ मध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनात हे गीत पहिल्यांदा गायले, ज्यामुळे ते देशभर लोकप्रिय झाले. १९०५ च्या बंगालच्या फाळणीविरुद्धच्या आंदोलनात तर हे गीत क्रांतीचे मुख्य शस्त्र बनले होते. २४ जानेवारी १९५० रोजी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी संविधान सभेत स्पष्ट केले होते की, स्वातंत्र्यलढ्यातील या गीताचे महत्त्व पाहता त्याला राष्ट्रगीताप्रमाणेच समान दर्जा आणि सन्मान दिला जाईल. त्याच परंपरेला अनुसरून आता केंद्र सरकारने या नव्या नियमांद्वारे या गीताचा गौरव अधिक अधोरेखित केला आहे.

ताज्या बातम्या

संपादकीय : ११ फेब्रुवारी २०२६ – सामूहिक शहाणपण गरजेचे

0
सायबर दरोड्यांकडे सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) पुन्हा एकदा सरकार आणि समाजाचे लक्ष वेधले आहे. सायबरच्या माध्यमातून आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. तुटीचा आकडा काही...