दिल्ली । Delhi
फरार ललित मोदीचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आहे. आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर २०१० मध्ये पदावरून हटवण्यात आलेल्या आणि नंतर देश सोडून पळालेल्या मोदीला आता वानुआतू सरकारकडून मोठा धक्का बसला आहे. वानुआतूचे पंतप्रधान जोथम नापत यांनी त्याचा पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
ललित मोदीवर आयपीएलमध्ये आर्थिक अनियमितता केल्याचे आरोप आहेत. त्यामुळे भारतीय सरकारने त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न केले, पण त्यांना यश मिळालेले नाही. त्याने लंडनमध्ये आश्रय घेतला असून, तिथूनच तो आपले व्यवसाय आणि अन्य उपक्रम पाहतो आहे.
प्रशांत महासागरातील वानुआतू या लहानशा देशाने ललित मोदीला नागरिकत्व दिले होते. मात्र, आता त्याच्या पार्श्वभूमीबद्दल अधिक माहिती मिळाल्यानंतर वानुआतू सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. पंतप्रधान जोथम नापत यांनी एका उच्चस्तरीय बैठकीत मोदीचा पासपोर्ट रद्द करण्याचा निर्णय घेतला.
वानुआतू सरकारने स्पष्ट केले की, मोदीच्या वादग्रस्त कारवायांबद्दल त्यांना पूर्वी माहिती नव्हती. तसेच, त्यांच्या “गोल्डन पासपोर्ट” कार्यक्रमावर वाईट परिणाम होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला. युरोपियन देशांकडून वानुआतूवर कारवाई होऊ शकते, असेही म्हटले जात होते. त्यामुळे वानुआतूने आपली प्रतिमा जपण्यासाठी त्वरित कारवाई केली आहे.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी पुष्टी केली की ललित मोदीने भारतीय नागरिकत्व सोडण्यासाठी अर्ज केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी सांगितले की, मोदीने लंडनमधील भारतीय उच्चायोगात आपला पासपोर्ट सरेंडर करण्यासाठी अर्ज केला आहे.
“सध्याच्या नियम आणि प्रक्रियेनुसार त्याच्या अर्जाची चौकशी केली जाईल. त्याने वानुआतूची नागरिकता घेतली असल्याचे आम्हाला कळवण्यात आले आहे. कायद्यानुसार आम्ही त्याच्याविरोधात खटला सुरु ठेवू,” असे जायसवाल यांनी सांगितले.
ललित मोदी हे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती कृष्ण कुमार मोदी यांचे पुत्र आहेत. कृष्ण कुमार मोदी यांनी प्रचंड मेहनतीने १.५ अब्ज डॉलर्सचे साम्राज्य उभारले. मोदी कुटुंबाचा व्यवसाय अनेक क्षेत्रांमध्ये विस्तारलेला आहे. त्यांच्या व्यावसायिक साम्राज्यात के. के. मोदी विद्यापीठ, के.के. मोदी इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट, गॉडफ्रे फिलिप्स इंडिया लिमिटेड, इंडोफिल केमिकल्स लिमिटेड, मोदीकेअर, 24सेव्हन कन्व्हिनियन्स स्टोअर्स, कलरबार कॉस्मेटिक्स, एमएचपी स्टाफिंग आणि इगो स्पेशालिटी रेस्टॉरंट चेन यांचा समावेश आहे.
ललित मोदीच्या वानुआतूच्या पासपोर्ट रद्द झाल्याने त्याच्या भविष्यातील हालचालींवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्याला आता नवीन आश्रयस्थान शोधावे लागणार आहे, कारण वानुआतूने त्याच्यावर कठोर भूमिका घेतली आहे. तसेच, भारतीय सरकार त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरु ठेवणार असल्यामुळे त्याला भविष्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते.