अहिल्यानगर । प्रतिनिधी
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्यावर केलेल्या अश्लाघ्य, हीन टीकेप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात वसंतराव भाऊराव देशमुख यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुण्याच्या पिंपरी चिंचवड येथून रविवारी दुपारी ताब्यात घेतले आहे. माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या शुक्रवारी (25 ऑक्टोबर) धांदरफळ (ता. संगमनेर) येथे झालेल्या सभेत देशमुख यांनी डॉ.जयश्री थोरात यांच्याविषयी अश्लाघ्य व हीन भाषेत टीका केली होती. याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले आहेत.
देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी डॉ. जयश्री थोरात यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्याच दिवशी रात्री संगमनेर तालुका पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते. यानंतर पोलीस अंमलदार राजेंद्र घोलप यांच्या फिर्यादीवरून वसंत देशमुख यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 192 (दंगा घडवून आणण्याच्या उद्देशाने बेछुटपणे प्रक्षोभन करणे) व 79 (स्त्रीच्या विनयाचा अपमान करण्याच्या उद्देशाने शब्दोच्चार, हावभाव किंवा कृती करणे) नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून वसंत देशमुख पसार होते.
दरम्यान, संगमनेर तालुका पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून देशमुख यांचा शोध सुरू होता. पोलीस अधीक्षक राकेश ओला, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद सालगुडे, पोलीस अंमलदार अमृत आढाव, सागर ससाणे, बाळासाहेब गुंजाळ, जालिंदर माने, फुरकान शेख, मेघराज कोल्हे यांच्या पथकाने तांत्रिक विलेश्षणाच्या आधारे देशमुख यांचा शोध घेतला असता ते पिंपरी चिंचवड येथील एका ठिकाणी असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी रविवारी दुपारी देशमुख यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना पुढील तपासकामी संगमनेर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, काँग्रेसनेते बाळासाहेब थोरात यांनी मुंबईत सकाळी प्रसार माध्यमांशी बोलतांना विखेंनीच वसंतराव देशमुख यांना लपवून ठेवल्याचा आरोप केला होता. त्यानंतर तासाभरातच देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आले.