Monday, November 25, 2024
Homeब्लॉगवीर राणी चेन्नम्मा!

वीर राणी चेन्नम्मा!

भारताच्या इतिहासात अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या. त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली. या सदरातून ओळख करून घेऊया भारतवर्षातील अशाच काही देदीप्यमान शलाकांची.

भारतामध्ये इंग्रजी राजवटीविरुद्ध पहिला मोठा उठाव 1857 मध्ये झाला. या स्वातंत्र्य युद्धाच्या आधी 1824 मध्ये कित्तूरची वीर राणी चेन्नम्माने ब्रिटिशांना धूळ चारली. कित्तुरच्या रक्षणासाठी ती स्वतः रणांगणात लढली. देश रक्षणासाठी देशभक्तांची मजबूत फौज उभी केली. 19 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात जेव्हा देशातील अनेक स्थानिक राजे ब्रिटीश व्यापार्‍यांच्या योजनांशी पुरते परिचित नव्हते, त्यावेळी कित्तूरच्या संपत्तीवर व राज्यावर डोळा ठेवून आक्रमण करणार्‍या इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा देणार्‍या राणी चेन्नम्मा या पहिल्या भारतीय शासक होत्या.

राणी चेन्नम्माचा जन्म कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील काकती किल्ल्यावर झाला. लिंगायत संप्रदायाचे उपासक असलेल्या राजघराण्यातील धुलाप्पा देसाई त्यांचे वडील तर आई पद्मावती देसाई होत्या.आपल्या मुलीचे सुंदर, तेजस्वी रूपावरून आई-वडिलांनी तिचे नाव चेन्नम्मा ठेवले. कारण चेन्नम्मा या शब्दाचा अर्थ सुंदर मुलगी असा होतो. तिचे शिक्षण राजकुळानुसार झाले. घोडेस्वारी, शस्त्राचा सराव करणे हे सारे ती वडिलांकडून शिकली. राज्यकारभाराच्या अभ्यासाबरोबरच कन्नड, उर्दू , मराठी व संस्कृत या भाषांचा त्यांचा अभ्यास होता. त्यावेळी कित्तूरवर राजा मल्लसर्ज हा प्रजावत्सल, न्यायी, कलाप्रेमी राजा राज्य करत होता. कित्तूर हे संपूर्ण हिंदुस्थानात हिरे, रत्ने याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होते. एकदा जंगलात नरभक्षक वाघाची शिकार मल्लसर्ज यांनी केली. त्यावेळी त्याच वाघाला तरुण चेन्नमानेही निशाणा बनवले होते. वाघाच्या शिकारीनिमित्ताने राणी चेन्नम्मा आणि राजा मल्लसर्ज यांची नाट्यमयरीत्या भेट झाली. चेन्नम्माच्या सौंदर्याने व शौर्याने प्रभावित होऊन राजा मल्लसर्जने राणी चेन्नम्माबरोबर विवाह करून आपली पट्टराणी बनवले. बुद्धिमानी, प्रजावत्सलता, शौर्य, वर्तनातील ऋजुता यामुळे त्या राजपरिवारात आणि प्रजेतही लोकप्रिय झाल्या. त्यांनी एका मुलाला जन्म दिला; परंतु दुर्दैवाने त्याचा अकाली मृत्यू झाला.

- Advertisement -

अकस्मात राज्याशेजारच्या एका शत्रूने धूर्तपणे राजा मल्लसर्ज यास पकडून ठार केले. राजा मल्लसर्जची प्रजा, त्यांची पहिली पत्नी राणी रूद्रम्मा आणि राणी चेन्नम्मावर दुःखाचा डोंगर कोसळला. रूद्रम्माचा मुलगा शिवलिंग रूद्रसर्ज याला कित्तूरच्या सिंहासनावर बसवण्यात आले. राजा रूद्रसर्ज हा कर्तबगार नव्हता. तथापि राणी चेन्नम्माने राज्य चालवण्यासाठी त्यास मोठे प्रोत्साहन व मार्गदर्शन केले. राजा रूद्रसर्जने इंग्रजांना वेळोवेळी मदत करून त्यांच्याशी मैत्री केली होती. परंतु 1824 मध्ये रूद्रसर्जचा मृत्यू झाला. इंग्रजांच्या डोळ्यात कित्तूरचा प्रचंड खजिना भरला होता. कित्तूरचा राजा रूद्रसर्ज निपुत्र मरण पावला. म्हणजे आता आपण कित्तूर सहज हस्तगत करू असे धारवाड या संस्थानावर प्रभुत्व ठेवून असणार्‍या ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकार्‍यांना वाटले. पण राजा रूद्रसर्जने मृत्यूआधीच एका नातेवाईकाच्या मुलाला गुरुलिंग सर्जला दत्तक घेतले होते व मृत्युपत्र करून त्यात उल्लेख केला होता की, राजमाता चेन्नम्मा राज्याचा कारभार पाहतील.

राजा गुरुलिंग रूद्रसर्जच्या मृत्यूनंतर इंग्रजांचा धारवड संस्थांचा राजकीय अधिकार्‍याने राणी चेन्नम्माने कित्तूर राज्य इंग्रजांच्या अधिपत्याखाली द्यावे म्हणून विविध संदेश आणि प्रलोभने पाठवली. कित्तूर राज्यातील यल्लाप्पा शेट्टी आणि व्यंकटराव नावाचे दोन देशद्रोही इंग्रजांना जाऊन मिळाले. कित्तूरची सर्व गुपिते उघडी करून आणि इतरही सर्वतोपरी मदत करण्याच्या बदल्यात त्यांना कित्तूरचे अर्धे राज्य देण्याचे इंग्रजांनी लालूच दाखवले. राणी चेन्नम्माने इंग्रजांच्या डावपेचांशी मुत्सद्दीपणाने सामाना करण्यास आणि त्यांच्या विरुद्ध लढण्याची तयारी करण्यास सुरुवात केली होती. राणी चेन्नम्मासोबत गुरू सिद्धप्पा , कुशल दिवाण आणि बलरन्या, रायरन्या, गजवीर आणि चेन्नवसप्पा यांच्यासारखे विश्वासू, शूरवीर सहकारी होते.

इंग्रजांच्या अनेक पत्रांना, दत्तक वारस नामंजुरीच्या धमकवण्यांना राणी चेन्नम्माने सडेतोड उत्तर दिले, कित्तूर राज्याच्या वारसदारांचा प्रश्न हा राज्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. कित्तूर हे एक स्वतंत्र राज्य आहे आणि ते स्वतंत्र राहील. आम्हाला शांतता आवडते. परंतु आम्हावर कुणी हमला केला किंवा राज्याला इजा केली तर त्यासाठी आम्ही लढू.

इंग्रजांच्या कारवाया कित्तूर राज्यातील जनतेच्या लक्षात याव्या म्हणून राणी चेन्नम्माने प्रजाजनांना संदेश दिला की, कंपनी सरकार आमच्याकडून कित्तूर घेऊ इच्छित आहे. परंतु जोपर्यंत तुमच्या राणीच्या शिरामध्ये रक्ताचा एक-एक थेंब आहे तोपर्यंत कित्तूर कोणापुढे झुकणार नाही. शत्रूअधीन होण्यापेक्षा मरण चांगले आहे. राज्याला इंग्रजांच्या गुलामीपासून वाचवण्यासाठी मी ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा देईन.

कित्तूरचे लोक ब्रिटिशांच्या कारवाया ओळखून होते. राज्यातील जनता तन-मन-धनाने राणीच्या सोबत होती. वैभव, शांतता नांदत असलेल्या कित्तूरवर इंग्रजांनी संधी पाहून हल्ला केला. मोठ्या चातुर्याने ब्रिटिशांशी लढण्याची योजना राणीने केली. विश्वासू, शूर योद्धे राणीसोबत होते. इंग्रज सैन्याने मोठ्या ताकदीनिशी कित्तूर किल्ल्याला वेढा घातला होता. युद्ध पेटले. 24 सप्टेंबर 1824 हा दिवस हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला गेला. इंग्रज बलाढ्य शक्तीनिशी कित्तूरवर तुटून पडले. अचानक किल्ल्याचा भव्य दरवाजा उघडून सिंहीणीच्या आवेशात राणी चेन्नम्मा ब्रिटिशांवर तुटून पडली. राणीच्या मागे 2000 देशभक्तांची लढाऊ सेना होती. राणीच्या प्रेरणेने एका अनोख्या चैतन्याने भारून हे सैन्य ईस्ट इंडिया कंपनीच्या इंग्रज सैन्यावर तुटून पडले. त्यांचा प्रचंड वेग ब्रिटीश सैनिकांना सहन होईना. राणीच्या तलवारीच्या झंझावाताने कहर केला. धारवाडचा इंग्रजांचा अधिकारी ठार झाला. यल्लाप्पा शेट्टी आणि व्यंकटराव यांना यमसदनास पाठवण्यात आले. अनेक गोरे अधिकारी मारले गेले तर अनेक इंग्रज अधिकार्‍यांना कैदी बनवले गेले. या मोठ्या विजयाने राणी आणि प्रजा सुखावली.राणीने उदारपणे कैदेत असलेल्या ब्रिटीश अधिकार्‍यांना सोडून दिले.राणी चेन्नम्मांनी स्वातंत्र्यलढ्याची, आत्मसन्मानाची ज्योत पेटवली होती. इंग्रज अधिकारी पराभूत होऊन गप्प बसले तरी त्यांना स्वतःचा पराभव पचत नव्हता. त्यांनी मद्रास आणि मुंबई येथून मोठी कुमुक मागवली. डिसेंबर 1824 मध्ये मोठ्या शक्तीनिशी आणि आधुनिक शास्त्रास्रे घेऊन ते पुन्हा कित्तूरवर तुटून पडले. कित्तूरच्या देशभक्त सैन्याने राणीच्या नेतृत्वाखाली मोठ्या जिद्दीने शत्रूशी टक्कर दिली. देशद्रोहांच्या कारवायांमुळे आणि इंग्रजांच्या प्रचंड तोफा, बलाढ्य मोठे सैन्य तसेच त्यांचे फोडा आणि राज्य करा या कूटनीतीने युद्धामध्ये प्रत्यक्ष रणरागिणीसारख्या लढणार्‍या राणी चेन्नम्माला कैद करण्यात इंग्रज सफल झाले.

राणीच्या पाडावानंतर संपत्तीने भरलेले कित्तूर इंग्रजांनी लुटले. असंख्य घोडे, हत्ती, उंट, लोखंडी पितळी तोफा, लाखोंची रोकड, हिरे, मोती आणि असंख्य सोन्याचे दागिने इंग्रजांच्या हाती लागले. राणीला कैद करून ठेवण्यात आले. गुरू सिद्धप्पासह वीस सरदारांना फाशी देण्यात आली. तुरुंगात असताना 21 फेब्रुवारी 1829 रोजी राणी चेन्नम्माने शेवटचा श्वास घेतला. इंग्रजांविरुद्धचा पहिला सशस्त्र लढा लढणारी वीरांगना राणी चेन्नम्मा पुढील स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा देणारी स्फूर्तीदात्री ठरली. अशा वीर राणी चेन्नम्मास मानाचे अभिवादन!

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या