राहाता |वार्ताहर| Rahata
यावर्षी पाऊस भरपूर होईल, पण रोहिणी नक्षत्राचा पाऊस तुरळक ठिकाणी होईल. मृग व आर्द्रा नक्षत्राचा पाऊस चांगला होईल. खरिपाची पेर दोनदा होईल, असे भाकीत राहाता येथील वीरभद्र यात्रेत वीरभद्र देवस्थानचे पुजारी सोमनाथ भगत यांनी केले. राहात्यातील वीरभद्र व नवनाथ महाराजांच्या यात्रेत देवस्थानचे पुजारी सोमनाथ भगत हे प्रत्येक वर्षी पाऊस व येणारे पिके कसे असतील याची भाकीत करतात. प्रत्येक येणार्या वर्षाची भविष्यवाणी ऐकण्याकरिता पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता असते. देवस्थानचे पुजारी भगत यांच्या भविष्यवाणीवर शेतकरी बांधव यावर्षीचे आर्थिक गणिते कसे असेल याचा अंदाज लावतात. यावर्षी वीरभद्र मंदिरासमोर स्त्री व पुरुष यांची नवसपूर्ती करण्यासाठी गळवंतीला गळी लागण्याकरिता 1500 पेक्षा जास्त उपस्थिती असल्याने व्हईक म्हणजेच भाकित सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता झाले.
यापूर्वी हे भाकीत पहाटे सहा वाजे दरम्यान व्हायचे. परंतु दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात नवसपूर्ती करणारांची संख्या वाढू लागल्याने भविष्यवाणी कार्यक्रमाला उशीर होऊ लागला आहे. तरी हे भाकित ऐकण्यासाठी अनेक नागरिकांनी रात्री पासूनच याठिकाणी गर्दी केली होती. पुजारी सोमनाथ भगत यांनी आपल्या भविष्यवाणीत सांगितले की, यावर्षी भरपूर पाऊस होईल पण रोहिणी नक्षत्रात काही ठिकाणी पाऊस पडेल तर मृग व आर्द्रा नक्षत्रात चांगला पाऊस होईल. खरिपाची पेर दोनदा होईल अशी भविष्यवाणी पुजारी भगत यांनी केली. भविष्यवाणी करण्याअगोदर पाच मातीच्या घागरी एक सरळ रेषेमध्ये ठेवून त्यावर देवाची घोंगडी अंथरली जाते. या घागरी पाण्याने भरून ठेवण्याचा मान सदाफळ परिवाराकडे आहे.
पाण्याने भरलेल्या घागरीवरून मंदिराचे पुजारी तीन वेळेस चालतात. घागरी समोर पाच नागिणीच्या पानावर विडे ठेवलेले जातात. त्या पानांच्या विड्यांचे नाव राजा, प्रजा, सुख, दुःख व दारिद्र्य असे दिले जाते. या घागरी जमिनीवर रिचल्यानंतर जो विडा जागेवर राहील त्याचा मानवतेला त्रास होतो व ज्या दिशेने पाणी जास्त वाहिले त्या दिशेला पाऊस जास्त होतो. अशी भविष्यवाणीची परंपरा शेकडो वर्षांपासून राहाता यात्रेत सुरू आहे. यावर्षी घागरी रिचल्यानंतर पाचही पानांचे विडे पाण्याने वाहून गेले. नवसाला पावणारे ख्याती असलेल्या वीरभद्र महाराज यांच्या यात्रेतील केलेल्या भविष्यवाणीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक वर्षापासून भगत परिवाराकडे भविष्यवाणी सांगण्याची पिढीजात परंपरा आहे.