Saturday, May 4, 2024
Homeनाशिकगर्दी टाळण्यासाठी ठिकठिकाणी भाजीबाजार

गर्दी टाळण्यासाठी ठिकठिकाणी भाजीबाजार

मालेगाव । प्रतिनिधी

भाजीपाला व फळफळावळ खरेदीसाठी बाजारात एकच गर्दी नागरीकांतर्फे केली जात असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मनपा प्रशासनातर्फे आजपासून चारही प्रभागात मुख्य भाजीपाला बाजारासह शहरात तीन ते चार ठिकाणी पर्यायी भाजीपाला, फळफळावळ व मटन विक्रीची दुकाने सुरू करण्यात आली आहे.

- Advertisement -

तसेच हातगाडीवर भाजीपाला व फळफळावळ विक्री करणार्‍या हातगाडी चालकांना देखील वेगवेगळ्या भागात विक्रीसाठी फिरण्यास सवलत देण्यात येवून एकाच ठिकाणी गर्दी होणार नाही याचे नियोजन केले गेले. या उपाययोजनेमुळे गर्दी विस्कळीत झाल्याचे दिलासादायक चित्र दिसून आले.

करोनाचा प्रादुर्भाव होवू नये या दृष्टीकोनातून विविध उपाययोजना राज्य शासनातर्फे केल्या जात आहेत. लॉकडाऊनसह संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी किराणा तसेच भाजीपाला, फळफळावळ खरेदीसाठी नागरीकांची बाजारात नागरीक एकच गर्दी करत असल्याचे चित्र दिसून आले होते. याची दखल घेत अप्पर पोलीस अधिक्षक संदीप घुगे, मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांनी बैठक घेत भाजीपाला, फळफळावळ तसेच मटन विक्रीची दुकाने शहरातील वेगवेगळ्या भागात सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला होता.

आज मनपाच्या चारही प्रभागांतर्गत तीन ते चार ठिकाणी मोकळ्या जागांवर भाजीपाला व फळफळावळ तसेच मटन विक्रीची दुकाने लावण्यात येवून योग्य अंतर ठेवत सदरचे साहित्य खरेदी करण्यासंदर्भात सुचना नागरीकांना मनपा कर्मचार्‍यांतर्फे केल्या जात होत्या. फळ, भाजीपाला व मांस दुकानांमध्ये प्रत्येकी 5 मीटरचे अंतर ठेवण्यात आले असून खरेदी करणार्‍या व्यक्तींमध्ये एक मीटरचे अंतर आखून देण्यात आले होते. नागरीकांतर्फे देखील मनपा कर्मचार्‍यांतर्फे केल्या जात असलेल्या सुचनांचे पालन केले जावून साहित्य खरेदी केली जात असल्याचे दिसून आले.

आयुक्त किशोर बोर्डे, अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत व अप्पर पोलीस अधिक्षक संदीप घुगे आदी अधिकार्‍यांनी सुरू करण्यात आलेल्या बाजारांना भेटी देत गर्दी होणार नाही याचा आढावा घेतला. हातगाडीवर भाजीपाला व फळफळावळ विक्री करणार्‍यांना देखील शहरात व वसाहतींमध्ये जावून भाजीपाला विक्रीची परवानगी देण्यात आली होती.

यामुळे जनतेची गैरसोय दूर झाली. नागरीकांनी एकाच ठिकाणी गर्दी करू नये यास्तव ठिकठिकाणी बाजार सुरू करण्यात आले असून आवश्यकता भासल्यास या विक्री केंद्रांची संख्या अधिक वाढवली जाईल, असे स्पष्ट करत आयुक्त बोर्डे पुढे म्हणाले, सदर बाजार नियमित भरले जाणार असल्याने खरेदीसाठी घरातून एकाच व्यक्तीने बाहेर पडावे व ठराविक अंतर पाळूनच खरेदी करावी, असे आवाहन आयुक्त बोर्डे यांनी केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या