Monday, June 24, 2024
Homeनगरकोल्हारमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

कोल्हारमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

- Advertisement -

कोल्हार-लोणी रस्त्यावरील साई सेवा सिरॅमिक दुकानालगत साडेपाच वर्षीय मादी जातीचा बिबट्या मृतावस्थेत आढळला. या बिबट्याचा मृत्यू दोन दिवसांपूर्वी रात्री वाहनाच्या धडकेत झाला असण्याची शक्यता वनविभागाने वर्तविली.

कोल्हार बुद्रुक येथे लोणी रस्त्यावर अवघ्या काही अंतरावर ही घटना घडली. वनखात्याच्या माहितीनुसार हा बिबट्या रस्ता ओलांडत असताना त्यास अज्ञात वाहनाची धडक बसली. त्यानंतर बिबट्या रस्ता ओलांडून येथील अजित मोरे यांच्या साई सेवा सिरॅमिक या दुकानालगतच्या काटेरी झुडुपात जखमी अवस्थेत गेला. यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना सुमारे दोन दिवसांपूर्वीची असल्याची माहिती वनक्षेत्रपाल संजय साखरे यांनी दिली.

ही घटना सोमवारी उघडकीस आली. त्यानंतर स्थानिक पत्रकारांनी वनविभागास संपर्क साधला. वनरक्षक संजय साखरे व वन रखवालदार गोरक्ष सुरासे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मयत बिबट्याचे अंत्यसंस्कार जागेवरच करणार असल्याची माहिती वनक्षेत्र अधिकारी प्रतिभा पाटील यांनी दिली. मृत बिबट्याला पहाण्यासाठी बघ्यांची गर्दी उसळली होती.

कोल्हार भगवतीपूर परिसरात वारंवार बिबट्याच्या तावडीत शेतकर्‍यांचे पशुधन सापडत आहे. त्यामुळे वनविभागाने शेतकर्‍यांचे पशुधन वाचविण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे. सोबत सदर घटनेवरून अद्यापही कोल्हार भगवतीपूर परिसरात बिबट्याचा संचार मुक्तपणे असल्याचे अधोरेखित होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या