नाशिक | प्रतिनिधी
पंचवटीतील रामवाडी येथून दोघा अट्टल दुचाकी वाहन चोरट्यांना जेरबंद केल्यानंतर त्यांच्या दोघा साथीदारांना शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. विशेष म्हणजे चोरीचे वाहन खरेदी करणाऱ्या भंगार विक्रेत्यालाही पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली आहे. त्यामुळे चोरांची टोळीच जेरबंद करण्यात यश आले आहे. कारवाईत चोरीच्या दोन दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.
अभिजित श्रीराम राऊत (३६, रा. कुमावत गल्ली, रामवाडी), विजय नागराज रेड्डी (४३, रा. संजयनगर, वाघाडी), श्याम गिरीश ओढेकर (रा.डीजीपीनगर, अंबड), कुणाल दत्तात्रय सोनवणे (रा. पंचवटी) यांच्यासह भंगार विक्रेता राजेश गोपीनाथ साळी (रा. तिबंधा लेन, भद्रकाली) यांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या चौकशीतून अंबड, उपनगर, पंचवटी हद्दीतील तीन गुन्ह्यांची उकल झाली आहे. युनिट एकचे अंमलदार विशाल काठे यांना संशयित अभिजित व विजय हे रामवाडीतील गोदापार्क येथे चोरीची मोपेड घेऊन येणार असल्याची खबर मिळाली होती.
त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, रवींद्र बागुल, प्रदीप म्हसदे, प्रवीण वाघमारे, संदीप भांड, नाझीम खान, प्रशांत मरकड, शरद सोनवणे, जगेश्वर बोरसे यांच्या पथकाने सापळा रचून दोघा संशयितांना अटक केली. पोलीस चौकशीतून त्यांनी संशतिय शाम व कुणाल यांच्या मदतीने दुचाकी चोरीची कबुली दिली. यात अंबड, पंचवटी व उपनगर हद्दीतील गुन्ह्याची उकल झाली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा