मुंबई | Mumbai
झिम्बॉब्वेचा माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज हीथ स्ट्रिकचं निधन झाल्याचे समजून अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावरून त्याला श्रद्धांजली वाहिली होती.
गेल्या काही वर्षांपासून हीथ स्ट्रिक हा कर्करोगाशी झुंज देतोय. त्याच्या निधनाबाबत सहकारी हेन्री ओलंगाने ट्विट केल्यानं ही बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. भारताचा फिरकीपटू आर अश्विननेसुद्धा हीथ स्ट्रिकला श्रद्धांजली वाहिली होती. पण आता हेन्री ओलंगानेच हीथ स्ट्रिक जिवंत असल्याचं सांगितलं आहे. हीथ स्ट्रिकने केलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट हेन्री ओलंगाने शेअर केलाय.
हेन्री ओलंगाने म्हटलं की, ‘हीथ स्ट्रीकच्या निधनाची अफवा असल्याची मी खात्री केली. त्यानेच मला सांगितलं आहे. थर्ड अंपायरने त्याला परत बोलावलंय. तो जिवंत आहे.’ यासोबत हेन्री ओलंगाने स्क्रीनशॉट पोस्ट केला असून त्यात हीथ स्ट्रिकने केलेला मेसेज आहे. माझा धावबादचा निर्णय मागे घ्या. मित्रा तात्काळ असा व्हॉटसअप मेसेज स्ट्रिकने केला. यावर ऐकून खूप आनंद झाला असा रिप्लायसुद्धा हेन्रीने दिला आहे.
स्ट्रीकने आपल्या १२ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत जवळपास ४ वर्षे झिम्बाब्वे संघाचे कर्णधारपदही सांभाळले आहे. २००० ते २००४ पर्यंत त्याने कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही प्रकारात झिम्बाब्वे संघाचे नेतृत्व केले. त्याचबरोबर झिम्बाब्वेसाठी कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम आजही हिथ स्ट्रीकच्या नावावर आहे. स्ट्रीकने १९९३ मध्ये पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती.