मुंबई l Mumbai
मराठी आणि हिंदी चित्रपटातील सतत चर्चेत असणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे करोनाने निधन झाले आहे. अभिनेते किशोर यांना करोनाची लागण झाली होती. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना ठाणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना आज दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान अखेरचा श्वास घेतला.
किशोर नांदलस्कर यांनी आत्तापर्यंत सुमारे ४० नाटके, २५ हून अधिक मराठी आणि हिंदी चित्रपट आणि २० हून अधिक मालिकांमधून काम केले. ‘नाना करते प्यार’, ‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’ अशा अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका गाजल्या.
महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून नांदलस्कर यांचा बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर प्रवेश झाला. ‘जिस देश में गंगा रहता है’ (गोविंदा), ‘तेरा मेरा साथ है’ (अजय देवगण), ‘खाकी’ (अमिताभ बच्चन) यांच्याबरोबर काम करायची संधी त्यांना मिळाली.
‘चाल जाए पर वचन न जाए’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’ या हिंदी चित्रपटांतही त्यांची भूमिका होती. अभिनेता गोविंदा यांच्या ‘जिस देश में गंगा रहता है’ चित्रपटातील त्यांनी साकारलेले सन्नाटा हे पात्र विशेष गाजले होते.
तसेच, ‘वासूची सासू’ हे नाटकही नव्याने सादर करण्यात आलं होतं. यातीलही प्रभावळकरांची भूमिका नांदलस्कर यांनी साकारली होती. या दोन्ही भूमिका नांदलस्कर यांनी आपल्या खास अंदाजात सादर केल्या होत्या. व्यावसायिक रंगभूमीवर किशोर नांदलस्कर यांनी ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’ इत्यादी नाटकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. नांदलस्कर यांच्या जाण्याने एक जाणता कलाकार हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त केली जात आहे.