नवी दिल्ली | New Delhi
एनडीएकडून (NDA) उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (Vice President Election) महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे विरोधकांच्या इंडिया आघाडीकडून (India Aaghadi) कुणाला उमेदवारी दिली जाणार, याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. त्यानंतर आता इंडिया आघाडीने उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवाराची (Candidate) घोषणा केली आहे.
इंडिया आघाडीने उपराष्ट्रपतीपदासाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी.सुदर्शन रेड्डी (B. Sudarshan Reddy) यांना रिंगणात उतरवले असून, ते मुळचे आंध्रप्रदेशचे आहेत. तर एनडीएने उमेदवारी दिलेले सी.पी. राधाकृष्णन हे तामिळनाडूचे (Tamilnadu) आहेत. त्यामुळे यंदा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत दक्षिण विरुद्ध दक्षिण असा सामना होणार आहे. काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी सर्व पक्षांच्या सहमतीने सुदर्शन रेड्डी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती दिली. तर तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार डेरेक ओ’ब्रायन यांनी आम आदमी पार्टीने देखील सुदर्शन रेड्डी यांच्या नावाला पाठिंबा दिल्याचे सांगितले.
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बी.सुदर्शन रेड्डी काय म्हणाले?
रेड्डी म्हणाले की, “हा वैचारिक दृष्टिकोनाचा विषय असून, ही वैचारिक लढाई आहे. इंडिया आघाडीने माझ्या नावाचा प्रस्ताव ठेवला. तुम्हाला माहिती आहे, इंडिया आघाडी देशातील ६० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करते. ज्यांचे संसदेच्या दोन्ही सभागृहात संख्याबळआहे. मला वाटतं मी देशातील ६० टक्क्यांहून अधिक लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करेन, मी एनडीएच्या सर्व पक्षांना आवाहन करतो की त्यांनी मला पाठिंबा द्यावा, असे त्यांनी म्हटले.
कोण आहेत बी. सुदर्शन रेड्डी?
बी.सुदर्शन रेड्डी यांचा जन्म ८ जुलै १९४६ रोजी झाला. त्यांनी बी.ए.आणि एल.एल.बी.ची पदवी प्राप्त केली आहे. २७ डिसेंबर १९७१ रोजी आंध्र प्रदेश बार कौन्सिल, हैदराबाद येथे वकील म्हणून कारकिर्दीला सुरुवात. त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात रिट आणि सिव्हिल प्रकरणांमध्ये वकिली केली. १९८८-९० दरम्यान त्यांनी उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून काम केले आणि १९९० मध्ये ६ महिन्यांसाठी केंद्र सरकारचे वकील म्हणूनही सेवा दिली. तसेच २ मे १९९५ रोजी त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. तर ५ डिसेंबर २००५ रोजी त्यांना गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनवण्यात आले. त्यानंतर १२ जानेवारी २००७ रोजी त्यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आणि ८ जुलै २०११ रोजी ते निवृत्त झाले.
द्रमुक आणि टीडीपीची झाली गोची
भाजपने सी.पी.राधाकृष्णन यांना उमेदवारी देत इंडिया आघाडीतील द्रमुकला कोंडीत पकडले होते. यानंतर आता इंडिया आघाडीने बी.सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर करत एनडीएची अडचण केली आहे. कारण राधाकृष्णन मूळचे तामिळनाडूचे असून, द्रमुकने त्यांना मतदान केल्यास इंडिया आघाडीच्या विरोधात भूमिका घेतल्याचे मानले जाईल. तर राधाकृष्णन यांच्या विरोधात भूमिका घेत आघाडी धर्म पाळल्यास तामिळनाडू अस्मितेचा प्रश्न उपस्थित होईल. तमिळनाडूतील लोकसभेच्या खासदारांची संख्या ३९ असून, यात इंडिया आघाडीचा घटक असणाऱ्या द्रमुकचे २१ खासदार आहेत. तर उर्वरित खासदार इंडिया आघाडीतील घटक पक्षांचे आहेत.
दुसरीकडे इंडिया आघाडीने बी.सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देत तामिळनाडूच्या शेजारीच असलेल्या आंध्र प्रदेशात एनडीएची कोंडी केली आहे. आंध्र प्रदेशात एनडीएची सत्ता असून, राज्यात चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री आहेत. तसेच त्यांच्या पक्षाचे १६ खासदार असून, त्यांचा पाठिंबा मोदी सरकारसाठी महत्त्वाचा आहे.आंध्र प्रदेशातील लोकसभेच्या खासदारांची संख्या एकूण २५ असून त्यातील नायडू यांच्या टीडीपीचे १६ खासदार आहेत. तर पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाचे २ खासदार आहेत. आंध्र प्रदेशात भाजप,टीडीपी आणि जनसेना या मित्रपक्षांचे सरकार आहे. त्यातच आता इंडिया आणि एनडीएने उपराष्ट्रपतीपदासाठी दक्षिणेतील उमेदवार दिल्याने द्रमुक आणि टीडीपीची गोची झाली आहे.




