मुंबई | Mumbai
महापालिका निवडणुकांपूर्वी आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार या चर्चा सुरू होत्या. मात्र निवडणुकांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबतच्या चर्चांना उधाण आले होते. शिवाय अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी पक्षांचे विलीनीकरण होणार का? अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची धुरा कुणाकडे जाणार? अशा अनेक प्रश्न उपस्थित झाले असताच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती येथे विमान अपघातात निधन झाल्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत चर्चांनी जोर धरला आहे. खुद्द शरद पवारांनीच याबाबतच खुलासा केला. गेल्या ४ महिन्यापासून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यात महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीने एकत्रित निवडणूकही लढवली. त्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले.
१७ जानेवारीला महत्वपूर्ण बैठक पार पडली होती
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या गोविंदबागेत १७ जानेवारीला एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती. ही बैठक राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणासंदर्भातली असल्याचे सांगितले जात आहे. या बैठकीला शरद पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासह दोन्ही गटातील नेतेमंडळी उपस्थिती होती. या बैठकीचा व्हिडीओ समोर आला आहे.
अजित पवार आणि जयंत पाटील हे या चर्चेचे नेतृत्व करत होते. सर्व चर्चा या दोघांनी केली. आमच्या पक्षाने आणि अजित पवार यांच्या पक्षाने एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी, यावर एकमत होते. १२ तारखेला याबाबत निर्णय जाहीर करायचा होता परंतु या अपघाताने यात खंड पडला असे त्यांनी सांगितले.
याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि आमदार हे अजित पवार यांची दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावी, ही इच्छा होती असे सांगत आहेत तर, तेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते आणि आमदार हे अजित पवार यांनी कधीच राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यासंदर्भातली इच्छा बोलून दाखवली नव्हती, असे विधान करत आहेत. त्यामुळे १७ तारखेला झालेली बैठक आणि शरद पवार यांच्या सांगण्यानुसार राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात १२ तारखेला होणारा निर्णयावर पुन्हा चर्चा होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




