नागपूर | Nagpur
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वातील सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार रविवारी पार पडला. मंत्रिमंडळ विस्तार भाजप, शिवसेना ( शिंदे गट ) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील ( अजितदादा पवार ) अनेकांना डावललं गेले आहे. त्यामुळे बरेच बडे नेते नाराज असल्याचं समोर येत आहे. रविवारी महायुतीतील ३९ मंत्र्यांनी गोपनियतेची शपथ घेतली. यंदा महायुतीतील तीनही पक्षांनी धक्कातंत्राचा अवलंब करत काही जुन्या चेहऱ्यांचा पत्ता कट केल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये पुरंदरचे शिवसेना आमदार आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांचाही समावेश आहे. मंत्रिमंडळात संधी मिळाली नसल्याने आमदार शिवतारे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करत महायुती सरकारला घरचा आहेर दिला आहे.
मंत्रिपदाच्या लिस्टमधून नाव कट केल्याचे दु:ख नाही. पण, विश्वासात न घेतल्यामुळे मी १०० टक्के नाराज आहे. अडीच वर्षानंतर मंत्रिपद दिले तरी घेणार नाही, असा राग शिवतारे यांनी व्यक्त केला आहे. तसेच, महाराष्ट्राची वाटचाल बिहारच्या दिशेने चालली आहे, असे म्हणत शिवतारे यांनी एकप्रकारे आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे.
मला मंत्रिपदाची गरज नाही. मला माझ्या मतदारसंघातील कामं मुख्यमंत्र्यांकडून करुन घेणे अधिक महत्त्वाचे वाटते. मंत्रिपदाबाबत मला राग नाही. पण दिलेल्या वागणुकीबद्दल प्रचंड राग आहे”, .पूर्वी विभागीय पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि महाराष्ट्र, अशी विभागीय नेतृत्त्व दिली जायची. उपयुक्त माणसांच्या हातात सत्ता देऊन महाराष्ट्र पुढे नेला होता. पण, आता आपण कुठेतरी मागे जात बिहारच्या मार्गाने चाललो आहे.” आता अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळाले तरी मी ते घेणार नाही. आम्ही या नेत्यांचे गुलाम नाही,” असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला
दरम्यान, नाराज आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या गटातून सुरू असल्याची माहिती मिळत आहे. मीडियाच्या माध्यमातून नाराजीला वाचा फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर मात्र एकनाथ शिंदे हे नाराज झाल्याचे देखील समजते. त्यामुळे नाराजी व्यक्त केलेल्या आमदारांना नाराजीचा फटका बसण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे श्रध्दा आणि सबुरी ठेवणाऱ्यांनाच भविष्यात शिवसेनेकडून मंत्रीपदं मिळतील, अशी राजकीय वर्तुळात रंगली आहे.