दिल्ली । Delhi
तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि चाहत्यांचा लाडका ‘थलापती’ विजय याने आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ अभिनय कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे. २७ डिसेंबर २०२५ रोजी मलेशियामध्ये पार पडलेल्या ‘जन नायकन’ (Jana Nayagan) या चित्रपटाच्या ऑडिओ लाँच सोहळ्यात विजयने ही अधिकृत घोषणा केली. ५१ वर्षीय विजयने स्पष्ट केले की, यापुढे तो चित्रपटात काम करणार नसून आपले संपूर्ण लक्ष केवळ समाजकारण आणि राजकारणावर केंद्रित करणार आहे.
विजयने वयाच्या १० व्या वर्षी ‘वेट्री’ या चित्रपटातून बालकलाकार म्हणून आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती. त्यानंतर १९९२ मध्ये ‘नालैया थीरपू’ चित्रपटातून त्याने मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. सुरुवातीच्या काळात त्याला अनेक टीकेला सामोरं जावं लागलं होतं, मात्र आपल्या मेहनतीने आणि चाहत्यांच्या पाठिंब्याने त्याने दक्षिण भारतीय सिनेसृष्टीत आपले एक वेगळे स्थान निर्माण केले. मागील काही वर्षांपासून विजयच्या लोकप्रियतेचा आलेख इतका उंचावला आहे की, २०१५ च्या ‘पुली’ चित्रपटानंतर त्याचा कोणताही चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या अपयशी ठरलेला नाही.
मलेशियातील कार्यक्रमात चाहत्यांशी संवाद साधताना विजय भावूक झाला होता. तो म्हणाला, “लोक माझ्यासाठी थिएटरमध्ये येतात, तासनतास रांगेत उभे राहतात. त्यांनी माझ्यासाठी जे काही केले आहे, त्या प्रेमाची परतफेड करण्याची हीच वेळ आहे. तुम्ही माझ्यासाठी एक महाल उभारला आहे, आता मला पुढील ३०-३३ वर्षे तुमच्या हक्कासाठी आणि सेवेसाठी उभे राहायचे आहे. म्हणूनच मी अभिनयातून निवृत्ती घेत आहे.”
विजयने गेल्या वर्षीच ‘तमिळगा वेट्री कझगम’ (TVK) या आपल्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे. २०२६ मध्ये होणारी तामिळनाडू विधानसभा निवडणूक हा त्याच्या राजकीय प्रवासातील सर्वात मोठा टप्पा असणार आहे. पक्षाने आधीच विजयला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषित केले असून, तो आता पूर्णवेळ राजकारणात उतरून निवडणुकीची तयारी करणार आहे.
दिग्दर्शक एच. विनोद यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होत असलेला ‘जन नायकन’ हा विजयचा ६९ वा आणि शेवटचा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात पूजा हेगडे आणि बॉबी देओल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ९ जानेवारी २०२६ रोजी पोंगलच्या मुहूर्तापर प्रदर्शित होणार आहे. चाहत्यांसाठी हा केवळ एक चित्रपट नसून, त्यांच्या आवडत्या सुपरस्टारला मोठ्या पडद्यावर अखेरचे पाहण्याची एक संधी असणार आहे.




