Monday, September 16, 2024
Homeमुख्य बातम्याससून ड्रग प्रकरणाची विशेष एसआयटी मार्फत चौकशी करा; विजय वडेट्टीवार यांची मागणी

ससून ड्रग प्रकरणाची विशेष एसआयटी मार्फत चौकशी करा; विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई | प्रतिनिधी

- Advertisement -

पुण्याच्या ससून रुग्णालयातील ड्रग रॅकेटचा मुख्य आरोपी ललीत पाटीलच्या मागे महायुतीमधील कोणाचा आशीर्वाद आहे? त्याला पळून जाण्यासाठी कोणी मदत केली? असे अजून किती ललीत महाराष्ट्रात मोकाट आहेत? असे सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी या संपूर्ण प्रकरणाची विशेष एसआयटीमार्फत चौकशी झाली करून सत्य जनतेसमोर आणण्याची मागणी केली.

अमली पदार्थ तस्करीचा आरोप असलेल्या ललित पाटीलला मुंबई पोलिसांनी आज तामिळनाडू येथून ताब्यात घेतले. या अटकेनंतर ललित पाटीलने आपण ससून रुग्णालयातून पळून गेलो नाही तर मला पळविण्यात आले, असा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषदेत या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

ललित पाटीलला पकडले म्हणजे प्रकरण मिटले, असे होत नाही. त्याला कोणाची फूस होती, त्याला कोणी पळवले याची चौकशी झाली पाहिजे. एकीकडे रूग्णालयात ड्रगचा धंदा केला जातो. दुसरीकडे रूग्णांना औषध मिळत नाही. हे सरकारचे अपयश आहे. सरकारी दवाखान्यात ड्रगचा धंदा होतो, हे महाराष्ट्राचे दुर्दैव असून पुण्याच्या ससून रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक १६ चे रहस्य जनतेसमोर आले पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले.

सरकारचा आशिर्वाद असल्याशिवाय ललित पाटील पळून जाऊ शकत नाही. सरकार फक्त टेंडर काढण्यात व्यस्त असून सरकारला मलिदा खाण्याशिवाय उद्योग राहिला नाही. त्यामुळे असे अनेक ललित राज्यात मोकाट फिरत आहे. या प्रकरणाचे धागेदोरे कुठेपर्यंत आहेत, याचा छडा सरकारने लावला पाहिजे. यासाठी विशेष एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, ओबीसींच्या प्रश्नावरून वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. ओबीसी महामंडळाला निधी देताना दुजाभाव केला जात आहे. हा निधी का कमी दिला जातो याचे स्पष्टीकरण सरकारमधील ओबीसी नेत्यांनी द्यावे. कर्ज घेतलेल्यांना नोटीसा देऊन त्यांची मुस्कटदाबी केली जात आहे.

महाविकास आघाडी सरकारने ओबीसींसाठी घरकुल योजनेचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची अंमलबजाणी महायुती सरकार करत नाही. वसतिगृहाचा विषय आला की, अर्थ खाते फाईल अडवून ठेवते. त्यामुळे परदेशी शिष्यवृत्ती, स्वाधार योजना हे सरकार राबविणार नाही. हे सरकार ओबीसींचे वाटोळे करणार हे आता स्पष्ट झाले आहे, अशी टीका वडेट्टीवर यांनी केली.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या