मुंबई । Mumbai
१९९५ मधील एका प्रकरणात माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे नाशिक सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे आता कोकाटे यांची विधिमंडळ सदस्यता धोक्यात आली आहे. मात्र न्यायालयाच्या निर्णयानंतर काही वेळातच जामीनासाठी अर्ज करत माणिकराव कोकाटेंनी जामीनही मिळवला. परंतु, याचे आता राजकीय वर्तुळात पडसाद उमटू लागले आहेत.
काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. वडेट्टीवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘आरोपीचे नाव : माणिकराव कोकाटे पद: महायुती सरकारमध्ये कृषी मंत्री झालेली शिक्षा: 2 वर्ष कारावास, 50,000 रुपयांचा दंड. गुन्हा: कागदपत्रांची फेरफार करून आर्थिक फसवणूक .शेतकऱ्यांना भिकारी म्हणणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. आता तरी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा!’
वडेट्टीवार यांनी आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हटले आहे की, ‘1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला आहे. यात मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे, 50 हजार रूपयांचा दंडही कोर्टाकडून ठोठावण्यात आला आहे. इतके उद्योगी आणि तेजस्वी लोक महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात आहेत की दररोज सरकारची लाज निघत आहे.’
आपल्या ट्विटमध्ये माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेच्या प्रकरणावरून वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोनही उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले आहेत की, दररोज आरोप होत आहे. कोर्टाकडून शिक्षेचे आदेश निघत आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आरोपी मंत्र्यांना स्वतः क्लिनचीट देऊन त्यांची पाठराखण करत आहे!
नेमकं प्रकरण काय?
माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी सदनिकांच्या कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक प्रकरणी 1995 मध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी गुरुवारी (20 फेब्रुवारी) सुनावणी करताना नाशिक सत्र न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला दोन वर्षांचा कारावास आणि 50 हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी जामीनाची प्रक्रिया सुरू केली. यानंतर न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जातमुचकल्यावर त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला.