Friday, May 15, 2026
Homeराजकीयनवनीत राणा जातीय विष पसरवणारी विषवल्ली; विजय वडेट्टीवारांची बोचरी टीका

नवनीत राणा जातीय विष पसरवणारी विषवल्ली; विजय वडेट्टीवारांची बोचरी टीका

मुंबई । Mumbai

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील ‘व्हिडिओ कांड’ प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून, आता या प्रकरणाला तीव्र राजकीय आणि सामाजिक वळण लागले आहे. अयान अहमद या १९ वर्षीय तरुणाने अनेक मुलींशी शारीरिक जवळीक साधून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो काढल्याचे समोर आले आहे. हे धक्कादायक व्हिडिओ अयानचा मित्र उजेर खान याने सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर खळबळ उडाली. या प्रकरणातील आरोपींविरुद्ध कारवाईची मागणी होत असतानाच, राजकीय नेत्यांमध्ये आता वाकयुद्ध सुरू झाले आहे.

- Advertisement -

माजी खासदार नवनीत राणा यांनी या प्रकरणावर भाष्य करताना पीडित मुलींच्या धर्माचा उल्लेख केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. “परतवाडा प्रकरणातील पीडिता बुरख्यावाल्या नाहीत, तर त्या आमच्या हिंदू मुली आहेत,” असे विधान राणा यांनी केले होते. या विधानामुळे वातावरण अधिकच तापले असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विजय वडेट्टीवार यांनी नवनीत राणा यांच्यावर अत्यंत बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. वडेट्टीवार यांनी राणा यांचा उल्लेख ‘विषवल्ली’ असा करत त्यांच्यावर सडकून ताशेरे ओढले आहेत.

विजय वडेट्टीवार प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, “जातीय विष पेरण्यासाठी नवनीत राणा ही एक ठेवलेली विषवल्ली आहे. समाजात जात आणि धर्माच्या नावाने भांडणे लावून सत्तेची पोळी कशी शेकता येईल, यासाठीच अशा लोकांना पोसले जात आहे.” अत्याचार आणि शोषणाच्या घटनांमध्ये जात किंवा धर्म पाहणे चुकीचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जो कोणी नराधम असा गुन्हा करतो, तो केवळ गुन्हेगार असतो आणि त्याला फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी आक्रमक भूमिका वडेट्टीवारांनी मांडली.

नवनीत राणा यांच्यावर अधिक टीका करताना वडेट्टीवार म्हणाले की, पीडित मुली कोणत्या धर्माच्या आहेत हे राणांना कशाच्या आधारावर माहिती झाले? निव्वळ जातीयवादी आणि धर्मांध राजकारण करण्यासाठी अशा प्रकारच्या “तोंडाच्या वाफा” काढल्या जात आहेत. ज्यांना हनुमान चालीसाच्या दोन ओळी नीट बोलता येत नाहीत, त्यांनी हिंदू धर्माच्या गोष्टी करू नयेत, असा टोलाही त्यांनी लगावला. इतर प्रकरणांत शांत राहणाऱ्या नवनीत राणा केवळ मुस्लीम आरोपी दिसल्यावरच अशा प्रकारे का बावचळतात, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

या वादात वडेट्टीवार यांनी खासदार अनिल बोंडे यांच्यावरही निशाणा साधला आहे. बोंडे हे पेशाने डॉक्टर असून, डॉक्टर कधीही रुग्णाची जात किंवा धर्म पाहून उपचार करत नाहीत किंवा रक्त लावत नाहीत, याची आठवण त्यांनी करून दिली. दुसरीकडे, नवनीत राणा यांनी आपली मागणी लावून धरली आहे. व्हायरल झालेल्या दीडशे व्हिडिओंमध्ये एकही मुस्लीम मुलगी नसून सर्व मुली हिंदू आहेत, असा दावा त्यांनी केला. अशा आरोपींचे थेट एन्काउंटर करून त्यांचे नागरिकत्व रद्द करावे आणि त्यांना देशाबाहेर हाकलून द्यावे, अशी मागणी राणा यांनी केली होती. या संपूर्ण प्रकरणामुळे अमरावतीसह राज्यात तणावाचे वातावरण आहे.

ताज्या बातम्या

NEET : नीट-युजी २०२६ पेपरफुटी प्रकरण – सीबीआयने मुख्य सूत्रधाराला ठोकल्या बेड्या;...

0
पुणे | प्रतिनिधी Pune देशभरातील वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या 'नीट-युजी २०२६' परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाचा केंद्रीय अन्वेषण विभागाने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार...