Thursday, September 19, 2024
Homeनगरअखेर टाकळीभान सोसायटीत विखे गट सत्तेत, प्रशासकीयराज संपुष्टात

अखेर टाकळीभान सोसायटीत विखे गट सत्तेत, प्रशासकीयराज संपुष्टात

चेअरमनपदी एकनाथ पटारे तर व्हा. चेअरमनपदी रोहिदास बोडखे विजयी

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

- Advertisement -

गेली आठ वर्षे न्यायालयीन संघर्ष करून न्यायालयाच्या निकालानंतरही सत्ता संघर्ष झालेल्या टाकळीभान वि.वि.का. सह. सोसायटीच्या पदाधिकार्‍यांची अखेर काल निवड झाल्याने आठ वर्षांचे प्रशासकीयराज संपुष्टात आले आहे. चेअरमनपदी एकनाथ पटारे तर व्हा. चेअरमनपदी रोहिदास बोडखे विजयी झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक संदीपकुमार रुद्राक्ष यांनी केली. सन 2016 रोजी टाकळीभान सोसायटीच्या सदस्य मंडळाची पंचवार्षिक निवडणूक पार पडली होती. त्यानंतर मूळ सभासद व बाहेरगावचे सभासद हा कळीचा मुद्दा ठरल्याने संस्थेचे माजी अध्यक्ष राहुल पटारे यांनी छ. संभाजीनगर उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. आठ वर्षांच्या न्यायालयीन संघर्षानंतर नुकताच 30 एप्रिल रोजी न्यायालयाने निवाडा करून मूळ सभासद मतपेटीतील जास्तीची मते घेणार्‍या उमेदवारांना विजयी घोषित करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांना दिले होते.

त्यानुसार 13 विजयी उमेदवारांच्या नावाची घोषणा सहाय्यक निबंधक रुद्राक्ष यांनी यांनी 5 मे रोजी करून 28 मे रोजी पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर केला होता. पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर होताच 2016 च्या निवडणुकीत ग्रामविकास मंडळाकडून निवडणूक लढवलेले संचालक व त्यांचे स्थानिक नेते सत्तेत येण्यासाठी एकमेकांसमोर उभे ठाकले होते. स्थानिक मुरकुटे गटाने सत्तेचा प्रबळ दावा केला होता. मात्र, विखे गटाने दोन टप्प्यात आठ संचालक देवदर्शनाला पाठवून मुरकुटे गटावर कडी केली होती. काल पदाधिकारी निवडीसाठी सहाय्यक निबंधक रुद्राक्ष यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विखे गटाकडून चेअरमनपदासाठी एकनाथ विठ्ठल पटारे यांनी तर व्हा. चेअरमन पदासाठी रोहिदास वामन बोडखे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. तर मुरकुटे गटाकडून चेअरमनपदासाठी नितीन विठ्ठलराव पटारे तर व्हा. चेअरमनपदासाठी विजय दिनकर कोकणे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले. यावेळी मतदान होऊन मुरकुटे गटाचे चेअरमनपदाचे उमेदवार नितीन विठ्ठलराव पटारे यांनी विखे गटाच्या उमेदवारांना मतदान केल्याने विखे गटाचे उमेदवार विजयी झाले. तर निकराची झुंज देऊनही मुरकुटे गटाचे ऐनवेळी एक मत कमी झाल्याने त्यांना चार मतांवर रोखण्यात विखे गट यशस्वी झाला.

यावेळी नूतन संचालक मंजाबापू थोरात, एकनाथ पटारे, रोहिदास बोडखे, अविनाश लोखडे, देवदान रणनवरे, पुष्पलता मगर, संगीता गायकवाड, नितीन पटारे, सुनंदा कोकणे, शांताबाई नाईक, शिवाजी पवार व विजय कोकणे उपस्थित होते. संस्थेचे सचिव रामनाथ ब्राम्हणे, रघुनाथ शेळके, छोटू बनकर, यांनी निवडीकामी सहकार्य केले. यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार, ज्ञानदेव साळुंके, शिवाजी शिंदे, राहुल पटारे, भारत भवार, मयुर पटारे, विलास दाभाडे, बंडोपंत बोडखे, दत्तात्रय नाईक, भाऊसाहेब पवार, भाऊसाहेब मगर, लक्ष्मण सटाले, रावसाहेब मगर, शिवाजी धुमाळ, विठ्ठल बोडखे, कान्हा खंडागळे, भास्कर कोकणे, यशवंत रणनवरे, मधुकर कोकणे आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवड घोषित होताच हितचिंतकांनी फटाके फोडून गुलाल उधळला.

चेअरमनपदाच्या उमेदवाराचेच मत फुटले
अटीतटीच्या पदाधिकारी निवडीत विखे-मुरकुटे गटाने ही निवड प्रतिष्ठेची केली होती. प्रथम मुरकुटे गटाने सत्ता स्थापनेचा दावा करत सात सदस्यांचे बळ प्राप्त केले. मात्र, स्थानिक मुरकुटे गट गाफिल राहिल्याने विखे गटाने मुरकुटेंच्या संख्याबळातील दोन सदस्यांना पदाचा शब्द देऊन देवदर्शनाला पाठवले. त्यामुळे विखे गट बहुमतात आला. निवडीत काही चमत्कार होईल या अपेक्षेने मुरकुटे गटाने नितीन विठ्ठलराव पटारे यांचा चेअरमनपदासाठी अर्ज भरला होता. मात्र ऐनवेळी मुरकुटे गटाचे चेअरमनपदाचे उमेदवार नितीन पटारे यांनी आपले मत विखे गटाच्या पारड्यात टाकल्याने विखे गटाचे संख्याबळ आठवर गेले. स्थानिक मुरकुटे गटाची मात्र या प्रकारामुळे चांगलीच गोची झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या