Saturday, May 4, 2024
Homeनगरविखे-राजळे समर्थकांमधील संघर्ष पाथर्डीत टोकाला

विखे-राजळे समर्थकांमधील संघर्ष पाथर्डीत टोकाला

पाथर्डी | Pathardi

जिल्हा बँक निवडणुकीच्या मुद्यावरून माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे व आ. मोनिका राजळे यांच्या गटातील संघर्ष टोकाला पोहचला आहे.

- Advertisement -

मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात एकसंध वाटणार्‍या गटांनी एकमेकांविरोधात पवित्रा घेतल्याने ‘हेचि फळ काय मम तपाला’ असे म्हणण्याची वेळ आता राजळे समर्थकांवर आली आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आ. मोनिका राजळे यांनी सेवा सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताच त्यांच्या विरोधात आ. विखे यांचे खंदे समर्थक संभाजी वाघ यांच्या पत्नी मथुरा वाघ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजळे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. यासह भाजप खा. डॉ. सुजय विखे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनीही भटके विमुक्त मतदार संघातून तर भाजप नगरसेविका दीपाली बंग यांनीही बिगरशेती मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले.

हे अर्ज दाखल करताना आ. राजळे यांना विश्वासातच न घेतल्याने राजळे यांचे समर्थक जबाजी लोंढे व भाजप महिला तालुकाध्यक्षा काशीबाई गोल्हार यांनीही आव्हाड यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करत विखे गटाच्या विरोधी भूमिका घेतली.

या दोघांच्याही परस्पर विरोधी भूमिकेमुळे सध्या विखे विरोधात राजळे असा संघर्ष तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. मागील लोकसभा निवडणुकी पूर्वी जिल्ह्याच्या राजकारणात विखे विरोधात राजळे असा संघर्ष सुरु होता. मात्र, खा. डॉ. विखे यांनी भाजपकडून उमेदवारी मिळवल्याने सुरवातीच्या काळात त्यांना तालुक्यात राजळे समर्थकांनी विरोध केला. या कार्यकर्त्यांची आ. राजळे यांनी मनधरणी करत त्यांना विखे यांच्या प्रचारात सहभागी करून घेतल्याने या मतदारसंघातून विखे यांना चांगले मताधिक्य मिळाले होते.

यानंतर माजी आमदार आप्पासाहेब राजळे यांच्या अमृत महोत्सवी सत्कार समारंभात बोलताना माजी मंत्री आ. विखे यांनी या निवडणुकीत आ. राजळे यांनी खूप कष्ट घेतल्यानेच डॉ. विखे यांना या मतदारसंघात मोठे मताधिक्य मिळाले. यामुळे या पुढील काळात आम्ही राजळे यांना कायम साथ देऊ, अशी ग्वाही दिली होती. ही ग्वाही देताना त्यांनी काँग्रेसमध्ये असलेले तुमचे मामा जरी तुमच्या पाठीशी उभे राहिले नाही, तरीही मामा म्हणून मी उभा राहील, असा चिमटाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात याना काढला होता.

मात्र, सद्यस्थितीत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे यांच्या समर्थकांनी शेवगाव तालुक्यात वेगळी आणि पाथर्डी तालुक्यात यापेक्षा वेगळी भूमिका घेतल्याने सध्या तरी हेचि फळ काय मम तपाला असे म्हणण्याची वेळ राजळे समर्थकांवर आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या