मुंबई । Mumbai
प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं आज (१० मे, शनिवार) सकाळी निधन झालं. ते ६१ वर्षांचे होते. त्यांनी मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या कौशल्याने अनेक भूमिका अधिक प्रभावी बनवल्या होत्या. त्यांच्या निधनाने संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.
गेल्या काही वर्षांपासून ते आजारी होते. कोरोना काळात त्यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्या तब्येतीत सातत्याने चढ-उतार होत होते. मात्र गेल्या आठ दिवसांपासून प्रकृती अधिकच खालावली. त्यामुळे त्यांना मुंबईतील पवई येथील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे उपचार सुरू असतानाच आज सकाळी ८ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
विक्रम गायकवाड यांच्या पश्चात पत्नी ज्योत्सना आणि मुलगी तन्वी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कुटुंबासह फिल्म इंडस्ट्रीमध्येही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होणार आहेत.
विक्रम गायकवाड हे राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट होते. त्यांनी अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलं असून, त्यांच्या हातून साकारलेली मेकअप कलाकृती ही पात्रांना जीवंत करणारी ठरली आहे. त्यांच्या नावावर अनेक बॉलिवूड व मराठी चित्रपटांमधील अविस्मरणीय कामगिरीची नोंद आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत अनेकांनी त्यांना ‘कला विश्वाचा आधारस्तंभ’ म्हटलं आहे.