Monday, November 18, 2024
Homeराजकीयप्रशासक पद गेले, आता करोना जाऊ दे, अन् निवडणुका होऊ दे !

प्रशासक पद गेले, आता करोना जाऊ दे, अन् निवडणुका होऊ दे !

टिळकनगर |वार्ताहर| Tilknagar

ग्रामपंचायतीच्या प्रशासकपदाच्या खुर्चीचे स्वप्न गाव पुढारी पाहत होते. मात्र न्यायालयाच्या आदेशाने त्यावर पाणी फिरले. त्यामुळे हे सर्वच गाव पुढारी राजकारणापासून अलिप्त झाल्याचे चित्र आहे. हे सर्व आता लवकरात लवकर करोना जावो आणि निवडणुका होऊन पुन्हा ग्रामपंचायतीची सत्ता आपल्या हाती येवो, यासाठी देव पाण्यात बुडवून बसले असून काही गावपुढार्‍यांनी बाप्पाकडे साकडे घातले आहे.

- Advertisement -

जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 766 ग्रामपंचायतींच्या प्रशासकपदी अधिकार्‍यांची नियुक्ती केली जाणार असून, त्यापैकी काही ग्रामपंचायतींवर प्रशासक निवडी झालेल्या आहे. त्यामुळे या गावांना आता सरकारी सरपंच मिळाले आहेत. करोनाच्या संकटामुळे मुदत संपलेल्या या ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.

जिल्ह्यातील एप्रिल ते जून दरम्यान मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक झाली आहे. तर ज्या ग्रामपंचायतींची मुदत संपत आहे. या रिक्त जागांवर प्रशासक म्हणून योग्य व्यक्तीची नियुक्ती करण्याचे शासनाचे अधिकार संबंधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना प्रदान केले आहेत.

त्यात मध्यंतरी पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने योग्य व्यक्तीची म्हणजे गाव पुढार्‍यांच्या नियुक्तीच्या हालचाली झाल्या. मात्र न्यायालयाने शासकीय अधिकार्‍यांच्या नियुक्तीचे आदेश दिले. त्यात विस्तार अधिकारी व समकक्ष दर्जाच्या अधिकार्‍यांची नियुक्ती राज्यात होत आहे.

ग्रामपंचायतीवर त्या-त्या तालुक्यातील कृषी, शिक्षण, आरोग्य, सांख्यिकी विभागाचे विस्तार अधिकारी तसेच कृषी अधिकारी, प्रशासन अधिकारी, पर्यवेक्षिका, शाखा अभियंता व काही ठिकाणी केंद्रप्रमुखाची देखील नियुक्ती होणार आहे. तर मोठ्या ग्रामपंचायतींची जबाबदारी सहायक गटविकास अधिकार्‍यांवरही येण्याची शक्यता आहे.

करोनाने राजकीय नेत्यांना निवडणुकीपासून वंचित ठेवले. न्यायालयाच्या आदेशाने कारभारापासून लांब ठेवले. त्यामुळे संधी हुकलेले गाव पुढारी आता मनोमन करोनाचे संकट जावो, निवडणुका होवो अन् पुन्हा गावाचा कारभार आमच्या हाती येवो यासाठी देव पाण्यात बुडवून बसले आहेत. त्यांची ही इच्छा केव्हा फलद्रूप होते याचीच सगळ्यांना प्रतीक्षा आहे.

दरम्यान उच्च न्यायालयाने याआधी 27 जुलैला सरकारी अधिकारी नियुक्तीबाबतचा पहिला अंतरिम आदेश दिला होता. त्यानंतर 14 ऑगस्ट रोजी दुसर्‍यांदा असाच अंतरिम आदेश देण्यात आला आहे. पुढील सुनावणी आज सोमवारी 24 ऑगस्टला होणार असल्याने गावपुढारी याकडे लक्ष ठेऊन आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या