Wednesday, December 4, 2024
Homeशब्दगंधसैनिकांचे गाव

सैनिकांचे गाव

वेगळे करिअर निवडून सुखी होण्याचे स्वप्न अनेकजण बघतात आणि त्याप्रमाणे आपल्या जीवनाचे आखीव रेखीव नियोजनही करतात त्याप्रमाणे वाटचालही करताना दिसतात, पण काही तरुणांच्या मनात देशभक्तीची वेगळीच ज्योत तेवत असते. आपल्या देशासाठी प्राणाची आहुती देण्यासही ते तयार असतात. देशासाठी काहीपण, हेच त्यांचे स्वप्न असते आणि मग लेह लडाखसारख्या खडतर, अवघड वाटणार्‍या प्रांतातही ते आपली सेवा चोखपणे बजावताना दिसतात. भायाळे गावातील बहुसंख्य तरुण हेच स्वप्न बघतात. नाशिक जिल्ह्यातील भयाळे हे गाव, सैनिकांचे गाव म्हणून महाराष्ट्राला परिचित होऊ लागले आहे. या गावावर टाकलेला एक दृष्टिक्षेप.

भयाळे… नाशिक जिल्ह्याच्या चांदवड तालुक्यातील एक लहानशे, पण देशभक्तीने मंतरलेले गाव..! नाशिक शहरापासून साधारणपणे 50 किलोमीटर असलेले. संपूर्ण जिल्ह्यात सैनिकांचे व देशभक्तांचे गाव म्हणून या गावाची ख्याती आहे. त्याला कारणही तसेच आहे. गावातील अनेक कुटुंबातील तरुण सैन्यदलात, भारतीय सशस्त्र सेना, पॅरा कमांडो, आसाम रायफल, मराठा लाईट इंफ्रंट्री, गार्ड ग्रुप तसेच मॅकनाईज इंफ्रंट्री अशा अनेक ठिकाणी विविध पदांवर सेवा बजावत आहेत. तर बरेच जण आपली देशसेवेची पूर्ती करून निवृत्त झाले आहे.

- Advertisement -

स्मारक प्रेरणा देते…

गावातील मुख्य चौकात शहीद जवान शंकर शिंदे यांचे स्मारक शौर्य परंपरेचे प्रतीक आहे. त्यांना काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण प्राप्त झाले आहे. आपल्या गावातील एक तिशीतला तरुण सीमेवर शत्रूशी लढताना शहीद झाला, ही गोष्ट आठवून येथील प्रत्येक तरुणाच्या मनात रोमांच उभे राहतात. घराचा उंबरा ओलांडल्यानंतर प्रत्येकाला हे स्मारक बघितल्यावर प्रेरणा मिळत नसेल तर नवलच. अवघ्या दीड, दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावात शंभरहून अधिक तरुण आज सीमेवर देशसेवेत आपले कर्तव्य बजावत आहेत. वर्षाचे 365 दिवस कोणी ना कोणी सुट्टीवर आलेले असतातच. त्यामुळे येथे सैन्यदलात भरती होण्यासाठी सराव करणार्‍या तरुणांना प्रेरणा तर मिळतेच, मात्र त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळत असते, असे येथील सेवानिवृत्त जवान महेंद्र शिंदे सांगतात.

निरपेक्ष मार्गदर्शन

सैन्यदलातील आपल्या अनुभवाचा फायदा गावातील तरुणांना व्हावा, देशसेवा करण्यासाठी जवान तयार व्हावेत, यासाठी हे जवान निरपेक्षपणे जास्तीत जास्त मार्गदर्शन त्यांना करत असतात. पहाटे लवकर उठून गावच्या बाहेर असलेल्या डांबरी रस्त्यावर धावणारे अनेक जण थंडी-वारा, पावसाची तमा न बाळगता घाम गाळताना दिसतात. आपल्यालाही सैन्यात जाऊन देशाची सेवा करायची आहे, ही प्रेरणेची ज्योत त्यांच्या मनात अखंडपणे तेवत असते. गावात खास ग्राऊंडची सोय नसली तरी कोणाच्याही शेतात मैदान तयार केले जाते. तेथे गोळाफेक, लांब उडी, पुलअप्स याचा सराव केला जातो. त्यांचा दिवस हेच स्वप्न बघत उजाडतो आणि ते स्वप्न पूर्ण करण्याच्या धडपडीत, तयारी करण्यात संपतो. ज्यांच्या घरातील दोन जण सैन्यात आहेत, असे माध्यमिक शिक्षक किशोर शिंदे सांगतात. गावातील जवळजवळ प्रत्येक घरातील एक तरी तरुण सैन्यदलात कार्यरत आहे किंवा सेवानिवृत्त तरी आहे. माझा सख्खा भाऊ आणि चुलते सैन्यात आहेत. जेव्हा कधी ते घरी येतात त्यावेळी आई आणि वडिलांच्या डोळ्यात एक अनोखा अभिमान झळकत असतो. आमच्या गावातील रक्तातच सैन्यदलात जाण्याची ऊर्जा आणि उर्मी आहे. देशसेवेचे हे व्रत मोठ्या प्रमाणात वाढतच चालले आहे. याचा सर्व गावकर्‍यांना सार्थ अभिमान आहे.

सीमेवर ज्यावेळी तणाव निर्माण होतो तेव्हा आणि आपला एखादा जवान शहीद झाल्याचे कळते तेव्हा अंतःकरण पिळवटून निघते, असे येथील तरुण सांगतात. अशा वेळी आतून पेटून उठल्यागत होते आणि आपण कधी एकदाचे सीमेवर जाऊ अशी इच्छा निर्माण होत असल्याचे ते सांगतात. एकूणच काय तर देशाच्या सीमेवर दक्ष राहून देशाची अंतर्गत व बाह्य सुरक्षा राखण्यासाठी प्रसंगी प्राणांची आहुती देण्यास तयार असलेले भारतीय सैनिक भयाळेसारख्या अनेक गावांच्या मातीतूनच निर्माण होत असतात.

युवापिढीसाठी हे गाव आदर्शच म्हणता येईल, कारण एक तरुण सैन्यात गेला की, त्याच्या कामगिरीने दुसरा प्रेरीत होऊन सैन्यदलात जाण्याची वाट निवडतो आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवतो, सैन्यदलात तो भरती होतो, अर्थात यासाठी माजी सैनिकांचे मार्गदर्शन हे उपयुक्तच ठरत असते. नाशिक जिल्ह्यातील अनेक तरुण हे शत्रुशी दोनहात करताना धारातीर्थी पडले आहे. शहीद झाले आहे, अशा सर्वांच्या कामगिरीची प्रेरणा हे इतरांसाठी निश्चित दीपस्तंभासारखी मार्गदर्शक ठरते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या