धुळे – प्रतिनिधी dhule
उडाणेतील (ता.धुळे) अंगणवाडींना (Anganwadi) आज माजी सरपंचांसह (Sarpanch) ग्रामस्थांनी अचानक भेट देत पाहणी केली. तेव्हा निकृष्ट पोषण आहार वाटप केला जात असल्याचे दिसून आले. उपमा ऐवजी मुलांना खिचडी दिली तीही निकृष्ठ दर्जाची होती. त्यामुळे ग्रामस्थांची संताप व्यक्त करत अंगवाडीबाहेरच निदर्शन केले.
आहार पुरवणार्या ठेकेदारावर कारवाई करून बालकांना चांगला पोषण आहार मिळावा, अशी मागणीही करण्यात आली.
उडाणे गावातील अंगणवाडीमध्ये निकृष्ट दर्जाचा पोषण आहार मिळत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आज ग्रामस्थांनी प्रत्यक्ष गावातील अंगणवाडी क्र. 2 व 3 या ठिकाणी पाहणी केली. शासन नियमानुसार शनिवारी या ठिकाणी उपमा व राजगिरा लाडू पोषण आहार होता. परंतु या ठिकाणी शासन नियमानुसार उपमा दिला गेला नाही.
खिचडी आली मात्र ती निकृष्ट दर्जाची होती. खिचडीत शेंगदाणे, वटाणे, दाळ असे काहीच नसल्याने दिसून आले. शासन नियमानुसार राजगिरा लाडू 42 ग्रॅमचा आवश्यक आहे. मात्र तोही फक्त 4 ग्रॅमचा लाडू वाटप करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. याबाबत लवकरात लवकर हा आहार पुरवणार्या ठेकेदारावर कारवाई व्हावी व बालकांना चांगल्या प्रकाराचा पोषण आहार मिळावा, अशी मागणी यावेळी केली. याबाबत ग्रामस्थांनी यापुर्वी देखील जिल्हाधिकारी, सीईओंना निवेदन देण्यात आले होते.
परंतु कोणत्याही प्रकारची दखल घेतली गेली नसल्याने आज ग्रामस्थांनी चिमुकल्यांसह अंगणवाडी समोरच निदर्शने केली. याबाबत दखल न घेतल्यास आमरण उपोषण करू, असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी माजी सरपंच सोमनाथ बागुल, सेवा सोसायटी सदस्य देविदास हाके, नाना वाघ, देवेंद्र आलोर, आबा बागुल, सतीलाल मासुळे, सुभाष हाके, हर्षल हाके, प्रकाश आलोर, भटाबाई हाके, पल्लवी शिंदे, रूखमाबाई मोरे आदींसह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.