अहिल्यानगर | ज्ञानेश दुधाडे
लहरी, खराब हवामानामुळे शेतकर्यांना अनेकदा मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टम प्रोजेक्ट प्रकल्प (विंड्स) अंतर्गत राज्य सरकारने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील गावात स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे शेतकर्यांना हवामानाची अचूक व आगावू माहिती मिळणार आहे. यासाठी महावेध व विंड्स कंपनीने नगर जिल्ह्यातील 1 हजार 327 गावात या स्वयंचलित हवामान केंंद्रासाठी जागा निश्चित केली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात यापूर्वीच महावेध अंतर्गत 119 ठिकाणी हवामान केंद्र कार्यान्वित असून त्यात आता 1 हजार 208 केंद्राची भर पडणार आहे. नव्याने राबव्यात येणार्या विंड्स प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्यस्तरीय अपर मुख्य, प्रधान सचिव कृषी विभाग हे अध्यक्ष राहणार आहेत. तर जिल्हास्तरावरील प्रकल्पात त्यात्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे अध्यक्ष राहणार असून या समितीत जिल्हा कृषी अधीक्षक सदस्य सचिव, सर्व उपविभागीय अधिकारी सदस्य, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अन्य निमंत्रित हे सदस्य म्हणून काम पाहणार आहेत. तालुकास्तरावर असणार्या समितीत तहसीलदार हे अध्यक्ष राहणार असून तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी यासह अन्य निमंत्रित सदस्य काम पाहणार आहेत.
राज्यात सध्या प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्रे बसवण्यात आली आहेत. यामुळे संबंधीत मंडळातील सर्व गावांमध्ये हवामानविषयक अचूक माहिती मिळावी, असे या प्रकल्पामागचा उद्देश होता. या केंद्रांद्वारे तापमान, पर्जन्यमान, सापेक्ष आर्द्रता, वार्याचा वेग आणि दिशा या हवामानविषयक घटकांची माहिती प्राप्त करण्यात येत होती. त्यानूसार नगर जिल्ह्यात देखील महावेधच्यावतीने 131 पैकी 119 ठिकाणी स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. मात्र, ग्रामपंचायत स्तरावर केंद्रांची उभारणी झाल्यास दुष्काळ, आग, पूर, गारपीट, ढगफूटी, थंडीची लाट, कडाक्याची थंडी आदी नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने हवामानविषयक माहिती उपलब्ध होणार आहे. यासाठी राज्य सरकारने आता राज्यातील प्रत्येक गावात वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टम प्रोजेक्ट प्रकल्प (विंड्स) अंतर्गत एडब्लूएस बसवण्याचा निर्णय घेतला आणि शेतकर्यांना हवामान- आधारित कृषी सल्ला आणि मार्गदर्शन देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
या ठिकाणी बसवणार स्वयंचलित केंद्र
श्रीगोेंदा 81, पाथर्डी 100, नेवासा 104, कर्जत 83, राहुरी 77, राहाता 44, संगमनेर 130, जामखेड 52, नगर 95, शेवगाव 87, श्रीरामपूर 47, पारनेर 103, अकोले 135 आणि कोपरगाव 70 अशा 1 हजार 208 नवीन स्वयंचलित केंद्राचा समावेश आहे. केंद्रासाठी निवड करण्यात आलेल्या या सर्व जागा शासकीय आहेत.
खासगी जागामधील केंद्र
श्रीगोंदा 6, पाथर्डी 9, नेवासा 3, कर्जत 5, राहुरी आणि राहाता प्रत्येकी 3, श्रीरामपूर 8, पारनेर 1, अकोले 15 अशा 53 ठिकाणी खासगी जागांमध्ये या केंद्रासाठी जागा निश्चित करण्यात आलेली आहे.
ग्रामपंचायत कर्मचार्यांवर जबाबदारी
प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नव्याने सुरू करण्यात येणार्या स्वयंचलीत हवामान केंद्राची जबाबदारी ही ग्रामपंचायतींच्या कर्मचार्यावर सोपवण्यात येणार आहे. या हवामान केंद्राची उभारणी, त्याचे कॅलिबे्रशन, कार्यान्वयन, देखभाल, दुरूस्ती यावेळी संबंधीत ग्रामपंचायत कर्मचार्याची उपस्थिती आवश्यक असणार आहे. तसेच त्यांनी संबंधीत केंद्राची नियमित तपासणी, यंत्रामध्ये बिघाड किंवा नुकसान झाल्यास वेदर इन्फॉर्मेशन नेटवर्क डेटा सिस्टम प्रोजेक्ट अथवा कृषी विभागाला कळवणे बंधनकारक राहणार आहे.




