अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पुणे जिल्ह्यात दूषित पाण्यामुळे जीबीएस (गुलेन बॅरी सिंड्राम) रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. जीबीएसच्या फैलावास दूषित पाणी कारणीभूत असून नगर जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात ग्रामीण भागात दूषित पाणी नमुन्यांची संख्या वाढली असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकार्यांना पत्र पाठवून ग्रामीण भागात पिण्याचे पाणी दूषित होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान नगर जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात 31 गावांतील पाणी दूषित असल्याचे समोर आले आहे.
ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर पिण्याचे पाणी शुद्धीकरण व त्यासाठी आवश्यक असणार्या टीसीएल पावडर साठा उपलब्ध करणे, त्याच्या गुणवत्तेची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे. याबाबत संबंधित गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या पातळीवरून सनियंत्रण केले जात आहे. मात्र अनेक गावात पाणी शुद्धीकरणात त्रुटी असल्याचे समोर येत आहे. आता उन्हाळा सुरू झाला असून अनेक ठिकाणी पाणी टंचाईची शक्यता आहे. त्यासोबत उपलब्ध होणारे पिण्याचे पाणी दूषित होण्याची शक्यता वाढली आहे. त्यातच पुण्यासह राज्यातील काही भागात जीबीएस या दूषित पाण्यामुळे होणार्या आजाराने डोके वर काढले आहे. दूषित पाण्यामुळे होणारे आजार टाळण्यासाठी राज्य सरकार पातळीवरून सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आता ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी दूषित होणार याबाबत आरोग्य विभाग काळजी घेतांना दिसत आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात 31 गावातील पाणी नमुने दूषित असल्याचे समोर आले आहे. याबाबत अहवाल जानेवारी महिन्यात तयार झाला असून आरोग्य विभागाने संबंधित गावांसह गटविकास अधिकारी यांना पत्र पाठवत अवगत केले आहे. जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात 12 गावातील पाणी शुद्धीकरणासाठी वापरण्यात येणार्या ब्लिचिंग पावडरमध्ये (टीसीएल) 20 टक्क्यांपेक्षा कमी क्लोरीन असल्याचे आढळून आले आहे. यामुळे ही पावडर पाणी शुध्दीकरणासाठी कुचकामी ठरणार आहे. याबाबत आरोग्य विभागाकडून संबंधीत ग्रामपंचायत आणि त्यात्या पंचायत समितीला कळवण्यात आले आहेत. तसेच पाणी नमुने दूषित असणार्या 31 गावांना तातडीने सुधारणा करण्यास सांगण्यात आले आहे.
जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात तपासणी करण्यात आलेल्या 1 हजार 735 गावांपैकी 31 गावातील आणि नमुने दूषित आढळून आले आहेत. यात अकोले 5, कोपरगाव 3 नगर 8, नेवासा 1, पारनेर 1,पाथर्डी 2, राहाता 3, राहुरी 2, संगमनेर 4, शेवगाव 2, श्रीगोंदा आणि श्रीरामपूर प्रत्येकी 1 या गावांचा समावेश आहे.
पाणी दूषित असणारी गावे
चंदगरवाडी, निब्रळ, लव्हाळीओतूर, सातेवाडी (अकोला). वेळापूर, मुर्शतपुर, रांजणगाव, देशमुख (कोपरगाव). रतडगाव, नागरदेवळे, कापूरवाडी, बुर्हाणनगर, अकोळनेर,पिंपळगाव माळवी (नगर). कौठा (नेवासा). धोत्रे खु. (पारनेर). कोल्हार, लांडकवाडी (पाथर्डी). पाथरे, हनुमंतगाव, साकोरी (राहाता). जांभूळवन, अमळनेर (राहुरी). पारेगाव बु. दिग्रस, खळी, पिंपरी लौकी (संगमनेर). खरडगाव, कोनोशी (शेवगाव), अजनुज (श्रीगोंदा), वडाळा महादेव (श्रीरामपूर) या गावांचा समावेश आहे.