विनय मधुकर जोशी
कधी दुष्टांच्या अत्याचाराने क्रोधीत होऊन तर कधी कोण्या भक्ताच्या आर्ततेने मन द्रवून जगत्पती नारायण या भूमीवर वारंवार अवतीर्ण होतात. त्रेतायुगात रावणाच्या त्रासाने त्रस्त होऊन ब्रह्मदेवादि सर्व देव,ऋषीमुनी,गंधर्व सिद्ध व्यंकटगिरी पर्वतावर भगवान नारायणाची आराधना करत होते. त्याच वेळी पुत्रप्राप्तीसाठी राजा दशरथ देखील तिथे तप करण्यास आले. सर्वाना हरी दर्शनाची तीव्र ओढ लागली. सगळी सृष्टी जणू आर्ततेने भगवंतांचा धावा करू लागली.
लवकर हरि यावे, मज पावे, संकट सर्व हरावे |
कल्याणाअद्भुत गात्रा कामीतार्थ प्रदायक व्हावे।।
सर्वांची प्रार्थना फलद्रूप झाली .भक्तांचा धाव ऐकून हरी धावून आले. भाद्रपद वद्य एकादशीच्या दिनी दोन प्रहरी व्यंकटगिरीवर व्यंकटेश बालाजी श्रीदेवी भुदेवी सहित विमानावर बसून अवतरले.भगवंतांच्या प्रकटण्याने दशदिशा उजळून निघाल्या.देवांनी पुषवृष्टी केली,गंधर्वांनी गायन केले, अप्सरांनी नृत्य केले, ऋषीमुनींनी स्तवने गायली. रावणवधासाठी लवकरच दशरथाचा पुत्र म्हणून अवतार घेण्याचे त्यांनी वरदान दिले.आनंदित झालेल्या सर्वानी ब्रह्मदेवांच्या पुढाकाराने अश्विन प्रतिपदेपासून भगवंतांचा अलौकिक उत्सव केला.रोज विविध वाहनांवर बसवून ,विविध उपचारांनी पूजन केले. तोच ब्रह्मोत्सव !
कलियुगात जुन्नर तालुक्यातील पणसंबे इथल्या गणेशपंतांना भगवंतांच्या दर्शनाची ओढ लागली.
वरिशामता निरमुनी अंतर शुद्धाते प्रगटावे ||
इह जन्मीचे जन्मांतरीचे सर्वही तुजला ठावें||
या ओढीने तीर्थयात्रा करत फिरणाऱ्या त्यांना व्यंकटेशानी दर्शन देण्याचा दृष्टांत दिला. त्याप्रमाणे गणेशपंत ताम्रपर्णी नदीवरच्या पुष्करणी तीर्थावर सूर्याला अर्घ्य देताना त्यांच्या हातात भगवंतांची चतुर्भुज मूर्ती आली. तोही दिवस भाद्रपद वद्य एकादशीचा.पुढे गणेशमहाराजांचे पुत्र तिमय्या महाराजांनी देवांना नाशिक येथे आणून स्थापन केले. तिरुपती प्रमाणेच इथेही ब्रह्मोत्सव सुरु केला.त्यांनी देवाला मागितले कि
वडिली आराधिली तैसे मागें नांव असावे||
परंपरेनें सर्वोत्कर्ष संततिने चालावे ||
यानुसार कापडपेठेतील बालाजी मंदिरात बालाजीवाले घराण्याकडून गेली अनेक शतके पिढ्यानपिढ्या हि परंपरा अविरत सुरु आहे.
भाद्रपद एकादशीला व्यंकटेश विमानातून प्रकटले. देवांचा प्रकटदिन विमानोत्सव म्हणून साजरा केला जातो. श्री व्यंकटेश बालाजी यांची मुख्य मूर्ती श्रीदेवी आणि भूदेवींसह फुलांनी सजवलेल्या झोपळ्यात ठेवली जाते. व्यंकटेशांच्या प्रकटण्याचे आख्यान होते. शंखनाद ,नगारे ,टाळ यांच्या गजरात देवांचे प्राकट्य साजरे होते. यांनतर तिमय्या महाराजांनी रचलेला ‘लवकर हरि यावे, मज पावे, संकट सर्व हरावे ‘ हा पारंपरिक धावा म्हटला जातो. देवाला नैवेद्य दाखवून आरती होते.
या धाव्यात तिमय्या महाराजांनी म्हटल्या प्रमाणे
वर्षोवर्षी नवरात्री उत्सवासी करवावे ।
नवही दिवशी नवही वहनी नवरात्री मिरवावे।
अश्विन प्रतिपदेपासून देवाला विविध वाहनांवर बसवून ब्रह्मोत्सव साजरा केला जातो.अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम होतात.धाव्यातील ‘प्रथमारंभी श्री भूसहित विमान दर्शन द्यावे’ या ओवीप्रमाणे व्यंकटेशांचा विमानोत्सव पुढे सुरु होणाऱ्या ब्रह्मोत्सवाची नांदी ठरतो.