नाशिक | Nashik
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी नवी दिल्लीतील (New Delhi) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील परिसंवादात बोलतांना “ठाकरेंच्या शिवसेनेत (Shivsena UBT) दोन मर्सिडिज गाड्या मिळाल्या की एक पद मिळतं ही वस्तुस्थिती आहे”, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी नीलम गोऱ्हेंचा निषेध नोंदवला असून अनेक नेत्यांनीही त्यांच्यावर शाब्दिक हल्लाबोल केला आहे.
त्यानंतर आज सकाळी माध्यमांशी बोलतांना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नीलम गोऱ्हे यांच्यावर सडकून टीका करत चांगलाच संताप व्यक्त केला आहे. तसेच नीलम गोऱ्हे यांनी कशाप्रकारे कार्यकर्त्यांची लूटमार केली, याविषयी विनायक पांडे आणि अशोक हरनावळ यांना विचारा, असे देखील म्हटले होते. यानंतर आता यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे (Vinayak Pande) यांनी नीलम गोऱ्हे यांनी तिकीटासाठी पैसे घेतल्याचा आरोप माध्यमांशी बोलतांना केला आहे.
यावेळी विनायक पांडे म्हणाले की,”विधानसभा निवडणूक २०१४ (Vidhansabha Election) साठी मध्य नाशिकमधून मी आणि अजय बोरस्ते इच्छुक होतो. आमचे दोघांचे उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू होते. नाशिकरोडला भैय्या बाहेती म्हणून नीलमताईंचा कार्यकर्ता होता. त्याने मला विचारलं की तिकीटासाठी प्रयत्न करायचं का? त्याने मला नीलम ताईकडे नेलं, तेव्हा नीलमताईंनी मला सांगितलं की इतके-इतके पैसे द्या तुम्हाला उमेदवारी आणून देते. आम्ही काही पैसे पोहोचवले पण काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना उमेदवारी मिळाली. १५ ते २० दिवस झाल्यावर मी नीलमताईंना फोन लावले पण त्यांनी काही रिप्लाय दिला नाही. मी त्यांना सांगितलं की पत्रकार परिषद घेईल आणि हे सर्व मांडेल. यावर त्यांनी मला सांगितलं की माणूस पाठवा पैसे देते. त्या पद्धतीने मी संदेश फुले आणि राजेंद्र देसाई तिघे गेलो. आमदार निवासला गेल्यावर त्यांचा ड्रायव्हर आला आणि पैसे दिले. मात्र, गोऱ्हेंनी पैसे कमी दिले असे विनायक पांडे यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की,”मी शिवसेनेचा (Shivsena) सात वर्षे शहरप्रमुख आणि सात वर्षे जिल्हाप्रमुख होतो. उपमहापौर आणि महापौरही होतो. शिवसेनाप्रमुख किंवा उद्धव ठाकरेंनी कधीही माझ्याकडून पदासाठी पैसे मागितले नाही. फक्त त्यांनी एक पाहिलं की डॅशिंग कार्यकर्ता आहे म्हणून ते मला मदत देत गेले. शिवसेनेमध्ये बाळासाहेब आणि उद्धवसाहेबांनी कधी पैसे घेतले नाहीत. पण नीलम गोऱ्हेंनी माझ्याकडून विधानसभेला पैसे घेतले”, असा आरोप विनायक पांडेंनी केला.
तसेच “मुळात नीलम गोऱ्हेंनी जो विषय दिल्लीत मांडला, तो मांडण्याचा व्यासपीठ ते नव्हते. तिथे मराठी साहित्याविषयी आपली भूमिका मांडायला पाहिजे होती. त्यामुळे आम्हाला या बाईची किव येते. मी ४३ वर्षे शिवसेनेत आहे. मला मातोश्रीचे दरवाजे कायम खुले आहेत. पण काही नवीन कार्यकर्ते आहेत, ज्यांना पदाची अपेक्षा असते, त्यांना मातोश्रीपर्यंत पोहोचू दिलं जात नाही. ज्या ज्या ठिकाणी नीलम गोऱ्हे संपर्कप्रमुख होत्या, तिथल्या कार्यकर्त्यांना मातोश्रीपर्यंत पोहोचू दिलं गेलं नाही”, असंही विनायक पांडे यांनी सांगितलं.