मुंबई । Mumbai
लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Election) निकाल लागून आता बरेच दिवस झाले आहेत. देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन देखील झालं आहे. अशातच आता भारतीय जनता पक्षाची (BJP) चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
भारतीय जनता पक्षाचे खासदार नारायण राणे (MP Narayan Rane) यांच्या विजयाविरोधात शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) नेते विनायक राऊत (Vinayak raut) यांनी हायकोर्टात आव्हान दिले आहे. नारायण राणे यांनी मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. तसेच निवडणूक काळातील भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश द्या,अशी याचिकेतून मागणी करण्यात आली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
नक्की वाचा : अल्पवयीन महाविद्यालयीन विद्यार्थिनीची आत्महत्या; दोन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल
दाखल याचिकेत नेमकं काय?
- नारायण राणे यांनी मते विकत घेतली. मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
- नारायण राणे, त्यांचे चिरंजीव नितेश राणे तसेच भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक काळात अनेक गैरप्रकार केले.
- त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. मात्र कारवाई करण्याची तसदी पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतली नाही.
- आचारसंहिता भंगाच्या प्रकारांकडे जाणूनबुजून डोळेझाक केली आणि निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेच्या तत्त्वाला हरताळ फासला असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
- प्रचारात मतदारांना धमकी तसेच पैसे वाटप करण्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्याआधारे चौकशी करावी. त्यांची खासदारकी रद्द करावी.
- याचिकेत नारायण राणे, केंद्रीय निवडणूक आयोग, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला प्रतिवादी करण्यात आले आहे.
- 7 मे रोजी झालेली लोकसभा निवडणूक आणि 4 जून रोजीचा निकाल अवैध आहे, असे घोषीत करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.
- राणे यांनी मिळवलेला विजय रद्द करा तसेच निवडणूक काळातील भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे.
- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.