Friday, November 15, 2024
Homeराजकीयशरद पवार यांचा अन्नत्याग खोटा

शरद पवार यांचा अन्नत्याग खोटा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शरद पवार यांनी राज्यसभेतील खासदारांसोबत अन्नत्याग केला. मात्र पवार यांनी हा अन्नत्याग ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिली,

- Advertisement -

त्यावेळी केला असता तर मराठा समाजातील तरुणांना बरे वाटले असते, अशी टीका माजी मंत्री विनोद तावडे यांनी केली. मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर दोन दिवसांत राज्य सरकार 18 हजार पोलीस भरतीचा निर्णय करते. त्यावरूनच सरकारची नियत काय आहे व सरकार मराठा समाजाला कसे डावलते आहे, हे दिसून येतंय, असा आरोप त्यांनी केला.

दिवंगत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नगर शहर भाजपाच्यावतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला माजी मंत्री विनोद तावडे हे उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी कृषी विधेयकावरून तावडे यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला.

ते म्हणाले, शरद पवार हे स्वतः कृषिमंत्री होते. पवार यांना जर कृषी विधेयकामध्ये काही दुरुस्ती सुचवायच्या असत्या, तर त्यांनी राज्यसभेत बोलणे गरजेचे होते. शेतकरी हिताच्या दुरुस्त्या नक्कीच सरकारने स्वीकारल्या असत्या. पण केवळ विरोधासाठी विरोध शरद पवार यांच्यासारख्या माजी कृषिमंत्री व ज्येष्ठ नेत्याने करणे सामान्य शेतकर्‍यांला पटलेले नाही. एकनाथ खडसे नाराज असून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. यावर बोलताना, भाजपचं नुकसान होईल असं काहीही नाथाभाऊ करणार नाहीत हा ठाम विश्वास मला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

माजी मंत्री शिंदेंची गृहमंत्र्यांवर टीका

माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आज जोरदार हल्ला चढविला. राज्यातील काही अधिकारी महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असे गृहमंत्री यांनी काही दिवसापूर्वी सांगितले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या विधानावर घुमजाव गेले. परंतु माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी गृहमंत्री यांच्या या विधानावर जोरदार टीका केली.

प्रा. शिंदे म्हणाले, अधिकारी सरकार पाडायला निघाल्याची ही स्वातंत्र्यानंतरची पहिलीच घटना असेल. अधिकारी हे करत असताना सरकार काय करत होते? सरकार पाडण्याचा प्रयत्न करणारे ते अधिकारी कोण आहेत. त्यांची नावे सरकारने जाहीर करावीत. अशा अधिकार्‍यांवर कारवाई झाली पाहिजे. अशा अधिकार्‍यांवर महाविकास आघाडी सरकारकडून कारवाई नाही म्हणजे, मूळ मुद्यांपासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे. दोन्ही काँग्रेस फक्त सरकारमध्ये सहभागी होण्यात धन्यता मानत आहे, असेही शिंदे म्हणाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या