नवीन नाशिक ।प्रतिनिधी
पोलीस प्रशासन व मनपा प्रशासन यांच्यावतीने करोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता भाजीबाजारात गर्दी होऊ नये याकरीता संयुक्तरीत्या पवन नगर भाजी मार्केट परिसरात पाच रुपये शुल्क आकारणी करून प्रवेश देण्यात येत होता. मात्र यामुळे शुल्क भरण्याची पावती देतानाच विलंब होत असल्याने भाजीबाजारात कमी तर बाहेर जास्तच असा सोशल डिस्टंसिंग चा फज्जा उडाला.
मनपा व पोलिस प्रशासनाने करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरिता घेतलेला निर्णय आता महागात पडतो की काय असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. मंगळवारी पोलिसांतर्फे परिसरात बेरिकेटिंग करण्यात आली व सायंकाळी पाच रुपये शुल्क आकारणी करून भाजी बाजारात प्रवेश दिला गेला.
याकरिता सुमारे 473 लोकांकडून शुल्क आकारले गेले. मात्र मनपाचे यासाठी कुठलेच नियोजन केले नसल्याने पावती देतांना विलंब लागत होता. यामुळे नागरीकांची मोठ्या प्रमाणावर लाईन लागली होती.
यामध्ये कुठे ही सोशल डिस्टंसिंग चे पालन केल्याचे दिसत नव्हते यामुळे भाजीबाजारात कमी तर पावतीच्या रांगेत करोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही ना ? असा सवाल नवीन नाशिककर विचारत आहेत.