भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज, ‘हिटमॅन’ रोहित शर्मा आणि ‘अँग्री यंग मॅन’ विराट कोहली यांनी टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मात्र, यानंतरही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या दोन्ही खेळाडूंबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
BCCI ने स्पष्ट केले आहे की, रोहित आणि विराट हे अजूनही भारतीय क्रिकेट संघाचा भाग आहेत आणि त्यामुळेच त्यांचा ग्रेड A+ करार कायम राहणार आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ही माहिती दिली.
२ मे २०२५ रोजी विराट कोहलीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट करत कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये त्याने आपल्या १४ वर्षांच्या कसोटी प्रवासाचे स्मरण करत मनोगत व्यक्त केले.
विराट म्हणतो, “१४ वर्षांपूर्वी जेव्हा मी पहिल्यांदा बॅगी ब्लू जर्सी घातली, तेव्हा कल्पनाही नव्हती की हा प्रवास मला इतका काही शिकवेल.” कसोटी क्रिकेटने त्याची परीक्षा घेतली, त्याला परिभाषित केलं आणि आयुष्यभर पुरणारे धडे दिले, असेही त्याने नमूद केले.
“या फॉरमॅटपासून दूर जाणं सोपं नाही. पण हेच योग्य वेळ वाटतंय. मी माझं सर्वस्व दिलं आणि अपेक्षेपेक्षा जास्त मिळवलं,” असे तो म्हणाला. पोस्टच्या अखेरीस “#269, Signing off” असे लिहून विराटने आपल्या कसोटी प्रवासाचा शेवट केला.
विराट कोहलीने जून २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. आपल्या १४ वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत त्याने १२३ सामने खेळले आणि २१० डावांमध्ये ९२३० धावा केल्या. त्याची सरासरी ४६.८५ होती. यामध्ये ३० शतकं आणि ३१ अर्धशतकांचा समावेश आहे.
विराट कोहलीने भारतीय संघाचे कर्णधारपदही समर्थपणे सांभाळले आणि अनेक ऐतिहासिक विजय मिळवले. ग्रेग चॅपलनंतर कसोटीत कर्णधारपदाच्या पदार्पणात दुहेरी शतक करणारा तो दुसरा खेळाडू ठरला.
विराटप्रमाणेच रोहित शर्माने देखील काही दिवसांपूर्वी टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. दोघांच्याही निवृत्तीने भारतीय क्रिकेटच्या एका सुवर्णयुगाचा अंत झाला असला, तरी ते अजूनही एकदिवसीय क्रिकेटसाठी उपलब्ध असतील, अशी शक्यता आहे.
दोघेही निवृत्त झाल्यानंतर त्यांचा ग्रेड A+ करार कायम ठेवणे हा बीसीसीआयचा निर्णय महत्त्वाचा ठरतो. ग्रेड A+ करारामुळे त्यांना वार्षिक वेतन आणि अन्य सुविधा मिळत राहणार आहेत. यावरून BCCI कडून त्यांच्यावरील विश्वास दिसून येतो.
या निर्णयामुळे विराट आणि रोहितच्या चाहत्यांमध्ये समाधान आहे. हे दोघेही भविष्यात भारतीय क्रिकेटसाठी मार्गदर्शक म्हणून कार्य करतील, अशी अपेक्षा क्रिकेटविश्वात व्यक्त केली जात आहे.