मेलबर्न | Melbourne
मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज सॅम कॉन्स्टासशी पंगा घेणे विराट कोहलीला चांगलेच महागात पडले आहे. बॉक्सिंग डे टेस्टच्या पहिल्याच दिवशी विराट कोहली मैदानात ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षीय खेळाडूंशी भिडला. सामन्यादरम्यान विराटने सॅम कोंस्टसला धक्का मारला ज्यामुळे त्याने वाद ओढवून घेतला आहे. विराटच्या याच वागणुकीमुळे आयसीसीने त्याच्यावर मोठी कारवाई केली असून दंड देखील ठोठावला आहे.
एका खासगी रिपोर्टनुसार, आयसीसीने विराटला त्याच्या मॅच फीच्या २०% दंड ठोठावला आहे. रिपोर्ट्सनुसार, विराट कोहली लेव्हल १ गुन्ह्याअंतर्गत दोषी आढळला आहे. ही दिलासा देणारी बाब आहे की विराट कोहलीला फक्त एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे, त्यानुसार त्याला पुढील सामन्यात निलंबित केले गेले नाही.
नेमके काय घडले?
झाले असे की, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करण्यासाठी सॅम कॉन्टास आणि उस्मान ख्वाजा फलंदाजीला आले. दोघांनी मिळून संघाला दणकेबाज सुरुवात करुन दिली.
दोघांनी मिळून ८९ धावा जोडल्या. ज्यावेळी ही जोडी फलंदाजी करत होती, त्यावेळी भारतीय संघाकडून ११ वे षटक टाकण्यासाठी जसप्रीत बुमराह गोलंदाजीला आला. त्यावेळी कॉन्टासने बुमराहच्या गोलंदाजीवर धावत २ धावा पूर्ण केल्या.
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची ११ वी ओव्हर सुरु असताना विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज सॅम कोंस्टसला धक्का दिला. त्यानंतर दोघांमध्ये मैदानात वादही झाला. तेव्हाच ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा आणि मैदानातील अंपायरनि मध्यस्ती केली आणि वाद मिटवला. ICC आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.12 नुसार आंतरराष्ट्रीय खेळाडू, खेळाडूचा सहाय्यक कर्मचारी, अंपायर, मॅच रेफरी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीशी अयोग्य आणि जाणूनबुजून शारीरिक संपर्क करणे हा लेव्हल 2 चा गुन्हा आहे. विराट कोहलीने मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्टने केलेले निर्बंध मान्य केल्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज पडली नाही.आयसीसीने कारवाई केली असून यात विराट कोहलीवर मॅच फीच्या २० टक्के दंड ठोठावण्यात आला असून त्याला एक डिमेरिट पॉइंटही देण्यात आला आहे.