क्रीडा क्षेत्रातील अनेक विक्रम सध्या चर्चेत आहेत. विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या शतकी विक्रमाची बरोबरी केली आहे. भारतीय संघाचा कप्तान रोहित शर्माने टी-२० विश्वचषकात सर्वाधिक षटकारांचा शिरपेच खोवला आहे. जम्मू काश्मीरच्या शीतलदेवीने पॅरा आलिम्पिक्स मध्ये दोन सुवर्णपदके पटकावली. असे करणारी ती पहिली भारतीय महिला आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धेत प्रतिस्पर्ध्यावर अवघ्या २२ सेकंदात आसमान दाखवून महाराष्ट्र केसरीचा किताब पटकवला. टी-२० विश्वचषकाच्या सामन्यांमधून अफगाणिस्तानचा संघ बाहेर पडला आहे.
पण त्या संघाने दोन बलाढ्य संघांना पराभूत केले. या सर्वांचे पराक्रम एकमेकांपेक्षा वेगळे आहेत. काहींची क्षेत्रे वेगळी आहेत. पण एक धागा मात्र सारखाच आहे. या सर्वांनी आव्हानांचा सामना केला. त्याचे रडगाणे गात बसले नाहीत. त्यांनी उणिवांवर मात केली आहे. काहींना परिस्थिती अनुकूल नव्हती तर काहींना शारीरिक आणि मानसिक सामर्थ्याची कमी होती. पण त्यांनी संघर्ष सोडला नाही. विराटने बराच काळ त्याची क्षमता (फॉर्म) गमावली होता. फलंदाजीतील अपयशाने रोहितचा बराच काळ पाठलाग केला. तिरंदाज शितलादेवी तर पायाने तिरंदाजी करते. कारण तिला हातच नाहीत. ती अवघ्या सोळा वर्षांची आहे. सिकंदरला घरची परिस्थिती अनुकूल नव्हती. त्याचे वडील ओझी उचलायचे. त्यांचे काम सुटल्यावर त्याच्या भावाने ती जबाबदारी त्याच्या खांद्यावर पेलली. अफगाणिस्तान सरकारला कोणत्याही देशाची मान्यता नाही. त्यांचा देश आर्थिक अस्थिरतेशी झुंजतोय. देशात खेळाला पूरक वातावरण नाही. संघातील अनेक खेळाडू रेफुजी कॅम्प मध्ये राहातात. अनेकांनी तर तिथेच क्रिकेटचे धडे गिरवले. या खेळाडूंकडून युवापिढी अनेक गोष्टी शिकू शकेल. या सर्वांना सतत कोणते ना कोणते आव्हान पेलावे लागते. पण त्यांनी त्यांच्या आयुष्याचे ध्येय निश्चित केले आहे. कोणतेही कारण न सांगता ध्येयपूर्तीसाठी ते झटतात.
प्रयत्न कधीच सोडत नाहीत. कोणतीही कमतरता त्यांना ध्येयाचा पाठलाग करण्यापासून रोखू शकत नाही. कमालीची शारीरिक तंदुरुस्ती, स्वयंशिस्त आणि मनावर कठोर नियंत्रण याशिवाय हे शक्य होऊ शकेल का? तीही माणसेच आहेत. जिभेला आवडणारे पदार्थ खाण्याचा मोह त्यांना होत नसेल का? आखीवरेखीव दिनचर्येचा त्यांना कंटाळा येत नसेल का? त्यांची झोपेची, उठण्याची, खाण्याची वेळ ठरलेली असते. त्या वेळेला टप्पा द्यावा किंवा युवा पिढीच्या भाषेत चिट डे साजरा करावा असे त्यांना खरेच वाटत नसेल का? पण हे सगळे मोह ते नेहमीच दूर सारतात आणि ध्येयाचा ध्यास घेतात. तो कायम राखतात. हे गुण युवा पिढीने आत्मसात करायला हवेत. युवांच्या आत्महत्या हा देशाच्या चिंतेचा विषय आहे. त्यांना निराशा ग्रासत आहे. मने अस्वस्थ आहेत. मानसिक अनारोग्यामुळे अनेक युवा आत्महत्या करतात किंवा तसा प्रयत्न करतात. आयुष्यात संकटे येणे किंवा अडचणी निर्माण होणे अपरिहार्य आहे याचा विसर अनेकांना पडू शकतो. तसे झाले तर त्यांच्यापेक्षा बरी आर्थिक परिस्थिती असलेल्यांशी तुलना करण्याचा मोह त्यांना होतो. तुलना करून ते अधिकच निराश होऊ शकतात. नव्हे होतात. अनेक जण प्रयत्नांपेक्षा हार मानतात. त्यांच्यापुढे उपरोक्त खेळाडूंनी आदर्श उभा केला आहे. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडीता’ हे कृतीतून दाखवले आहे. कष्टसाध्य यशाचा मार्ग त्यांनी प्रशस्त केला आहे. गरज आहे ती त्या वाटेवर चालण्याची.