दिल्ली । Delhi
भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने शानदार ८ विकेटनी विजय मिळवला. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी लोटागंण घातल्याने ऑस्ट्रेलिया समोर विजयासाठी फक्त ९० धावांचे आव्हान होते. या विजयासह ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारताने आपली निच्चांकी धावसंख्याही यादरम्यान नोंदवली.
या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने हताश शब्दांत प्रतिक्रिया दिली. “हा पराभव खूप बोचणारा आहे, कदाचीत शब्दांत मांडता येणार नाही. आमच्याकडे ६० धावांची आघाडी होती आणि त्यानंतर सगळा डाव कोलमडला. दोन दिवस तुम्ही मेहनत करुन सामन्यात आपल्या संघाची बाजू वरचढ ठेवता पण एका तासाच्या खेळात चित्र असं काही बदलून गेलं की तिकडून सामना जिंकणं आमच्यासाठी केवळ अशक्य झालं. आम्ही विजयाच्या भावनेने खेळलोच नाही. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज पहिल्या डावाप्रमाणेच मारा करत होते, पण आमचे फलंदाज फक्त धावा कशा जमवता येतील याचा विचार करत होते.”
गोलंदाजांनी काही विशेष कामगिरी केली असं मला वाटत नाही, पण धावा जमवणं कठीण वाटत होतं. याचाच फायदा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी घेतला, अशा शब्दांमध्ये विराटने आपली नाराजी व्यक्त केली. पहिला कसोटी सामना संपल्यानंतर विराट भारतात परतणार आहे. पत्नी अनुष्काची बाळंतपणात काळजी घेण्यासाठी बीसीसीआयने विराटला सुट्टी दिली आहे.
दरम्यान, दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस भारतीय संघाने १ बाद ९ अशी मजल मारली. दिवसाअखेरीस ६२ धावांची आघाडी मिळवलेल्या भारतीय संघाची सुरुवातच खराब झाली. नाईट वॉचमन जसप्रीत बुमराहला कमिन्सने झटपट माघारी धाडलं. यानंतर भारतीय संघाला लागलेली गळती थांबलीच नाही. मयांक अग्रवाल, अजिंक्य रहाणे, विराट कोहली, वृद्धीमान साहा, रविचंद्रन आश्विन यासारखे फलंदाज माघारी परतत राहिले. ज्यामुळे टीम इंडिया संकटात सापडली. हनुमा विहारी आणि उमेश यादव यांनी अखेरीस झुंज देण्याचा प्रयत्न केला. मोहम्मद शमीला फलंदाजी करत असताना दुखापत झाल्यामुळे तो फलंदाजी करु शकला नाही. यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ९० धावांचं सोपं आव्हान मिळालं.
या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली. पहिल्या डावात झटपट बाद झालेल्या मॅथ्यू वेड आणि बर्न्स यांनी भारतीय गोलंदाजीचा समाचार घेत चांगले फटके खेळले. ऑस्ट्रेलियाची ही जोडी फोडण्याचे प्रयत्न भारताने केले, पण त्यांना यश आलं नाही. अखेरीस पहिल्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी झाल्यानंतर मॅथ्यू वेड धावबाद झाला आणि भारताला पहिलं यश मिळालं. यानंतर मार्नस लाबुशेनही आश्विनच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळताना बाद झाला. यानंतर विजयासाठी आवश्यक असलेल्या धावा पूर्ण करत कांगारुंनी संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
भारतीय संघाकडून दुसऱ्या डावात फलंदाजी करताना सलामीवीर पृथ्वी शॉने ४ धावा आणि मयंक अगरवालने ९ धावा केल्या. मागील पहिल्या डावात कसोटी स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजाराची फलंदाजी सुमार राहिल्यामुळे जसप्रीत बुमराहला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले. पण कर्णधार विराट कोहलीचा हा डावपेच फसला. ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्सने त्याला फक्त २ धावांवर माघारी पाठवले. त्यानंतर फलंदाजीला आलेला पुजारा तर भोपळाही फोडू शकला नाही. पुजाराव्यतिरिक्त अजिंक्य रहाणे आणि आर अश्विन हे दोघेही शून्य धावांवर बाद झाले, तर विराट कोहली (४ धावा), हनुमा विहारी (८ धावा), वृद्धिमान साहा (४ धावा), उमेश यादव (४ धावा) यांनीही लवकरच पव्हेलियनचा रस्ता धरला. कमिन्सच्या २१ धावांवर ४ विकेट्स आणि जोश हेजलवूडच्या ८ धावांवर ५ विकेट्सच्या कामगिरीचा यात मोठा वाटा राहिला.