Wednesday, December 4, 2024
Homeनगरवीरगाव फाट्यावर काँग्रेसचा रास्तारोको

वीरगाव फाट्यावर काँग्रेसचा रास्तारोको

वीरगाव |वार्ताहर| Virgav

अशी जुलूमशाही या देशाने कधी बघितली नसल्याची टीका नाशिक पदवीधरचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली.

- Advertisement -

अकोले तालुक्यातील वीरगाव फाट्यावर अकोले तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढलेल्या किमती आणि महागाई विरोधात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनात केंद्र सरकारवर टीका करताना ते बोलत होते.

डॉ. तांबे म्हणाले, हे काँग्रेसचे आंदोलन नसून हा जनतेचा आक्रोश आहे. करोना कालावधीत त्रस्त झालेल्या जनतेला केंद्र सरकारकडून मदतीऐवजी वाढत्या महागाईची भेट मिळाली. पेट्रोल, डिझेलच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. गॅसमध्ये मोठी दरवाढ करून केंद्र सरकारने महिलांची फसवणूक केली. खोटी आश्वासने देऊन स्वतःची छबी छान बनविणे एवढेच धोरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रोज महाविकास आघाडी सरकारवर टीका करतात. ते महागाईवर का बोलत नाहीत? असाही सवाल त्यांनी केला.आघाडी सरकारच्या काळात करोनाच्या दोन वर्षे प्रतिकूल परिस्थितीतही महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांचे कर्ज माफ केले. बजेटमध्येही नियमित कर्ज भरणार्‍या 20 लाख शेतकर्‍यांना प्रत्येकी 50 हजार रुपयांप्रमाणे 10 हजार कोटींची मदत केली. देशापुढील शेतकर्‍यांचे प्रश्न, बेरोजगारी, विजेचे प्रश्न याबाबत केंद्राकडून कुठलेही धोरण नाही. सरकार विरोधात बोलणाराला तुरुंगात डांबले जाते. चौकशा लावल्या जातात. या विरोधातही काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून लढा देईल, असा इशाराही आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिला.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा काँग्रेसचे ज्येष्ठनेते मधुकरराव नवले म्हणाले, खोटे बोलून जनतेच्या मतांची लूट करायची. दिलेली आश्वासने विसरायची आणि रयतेची लूट करणे हाच अजेंडा केंद्र सरकारचा आहे. देशातील तमाम शेतकर्‍यांचे आंदोलन परिणामकारक ठरले आणि तीन काळे कायदे पर्यायाने केंद्र सरकारला मागे घ्यावे लागले. महागाई विरोधात आंदोलनाची व्याप्ती अधिक वाढवणार असून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला.

यावेळी तालुकाध्यक्ष दादापाटील वाकचौरे, काँग्रेसचे ज्येष्ठनेते मीनानाथ पांडे, एन.टी.सेलचे जिल्हाध्यक्ष रोहिदास चव्हाण आदींनी टीका केली.

आंदोलनास काँग्रेसचे कार्याध्यक्ष बाळासाहेब नाईकवाडी, संगमनेर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक संभाजी वाकचौरे, संपतराव वाळुंज, चंद्रमोहन निरगुडे, मंदाताई नवले, महिला अध्यक्ष सौ.निरगुडे, माणिकराव अस्वले, देवराम कुमकर, अशोक माळी, साईनाथ घोरपडे, मावंजी आगीवले, रमेश बोडके, बजरंग तोरमल, एकनाथ सहाणे, संदीप कर्णिक, संतोष चव्हाण, संतोष वाकचौरे, प्रशांत आस्वले, दत्ता दळवी यांच्यासह नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सुमारे एक तास हे रास्ता रोको आंदोलन सुरु असल्याने सिन्नर-अकोले-संगमनेर रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली. विद्यार्थ्यांचा परीक्षा कालावधी लक्षात घेता हे आंदोलन आटोपते घेण्यात आले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या