Wednesday, March 26, 2025
Homeब्लॉगविठ्ठलाचे अवघे गणगोत, जमले चंद्रभागेतिरी, विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी

विठ्ठलाचे अवघे गणगोत, जमले चंद्रभागेतिरी, विठ्ठल विठ्ठल गजरी, अवघी दुमदुमली पंढरी

आषाढी एकादशी, भागवत धर्मीयांची पर्वणीच.! आज चंद्रभागेचं वाळवंट वारकर्‍यांनी फुलून गेलं आहे. भीमातिरी भक्तीचं भगवं वादळ घोंगावत आहे. टाळ, मृदुंग, चिपड्यांनी रामकृष्ण हरीचा ठेका धरला आहे. हाती भगव्या पताका घेऊन वारकरी विठूनामात दंग झाला आहे. याचीसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा.! अशी तृप्ततेची भावना महिनाभर पायी चालणार्‍या वारकर्‍यांच्या मनात ओसंडून वाहत आहे. दोन वर्षापासून कोरोनाच्या दुष्टचक्रात अडकलेला वारकरी प्रथमच आपल्या लाडक्या दैवताला, डोळे भरुन पाहत आहे. सुंदर ते रुप, उभे विटेवरी, कर कटावरी ठेवूनिया.! असं ते सावळं, परब्रह्म रुप, जगाच्या उद्धारासाठीच पंढरीत विसावले आहे. धन्य काया, वाचा. धन्य जन्म झाला. विठू आज पाहिला, डोळे भरुनी. हीच भावना समस्त वैष्णव भक्तांची झाली आहे.

आषाढ महिन्याला प्रारंभ झाला म्हणजे सृष्टीला सृजनाचे वेध लागता. आभाळात मेघांची दाटी झालेली असते. मध्येच पावसाची एक छानशी रिमझिम हजेरी लागते. पेरण्या झालेल्या असतात. ढेकळांना फोडून नाजूक कोंब तरारुन वर आलेले असतात. सृष्टीने हिरवाईची चादर अंगावर ओढायला सुरुवात केलेली असते. महाराष्ट्रातील कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, वारकरी पेरण्या करुन निवांत झालेले असतात. त्यांच्या मनात पांडुरंगाच्या दर्शनाची आस लागते. मुखात राम कृष्ण हरीचा मंत्र घुमतो. आणि गावागावात खुंटीला अडकवून ठेवलेले टाळ, मृदुंग, वीणा, भगवे ध्वज आणि पताका बाहेर काढले जातात. आपापल्या भागातील संतांच्या पालख्या सजतात. सारे वारकरी भक्तिमय वातावरणात पंढरीची वाट चालायला लागतात. नाचत, गात, कीर्तन, भजन करत लाखो वारकरी एकत्र जमतात. माझ्या जीवाची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी ! असं म्हणत त्यांची पावलं पंढरपूरकडे चालू लागतात. हीच ती वारी. वारी ही महाराष्ट्रात निव्वळ एक उत्सव, यात्रा एवढ्यापुरतीच मर्यादित राहिलेली नाही. तर तो एक संस्कार बनला आहे. साडेसातशे वर्षांचा अखंड संस्कार.

घरात साधा कार्यक्रम, देशात नेत्यांच्या सभा असतील तर किती मानपान, निमंत्रण, पत्र, पैसा लागतो. मात्र वारीत कुणीही कुणाला बोलवत नाही. आग्रह करत नाही. धमकी देत नाही. पैसा तर इथं व्यर्ज. तरीही लाखो माणसं एकत्र येतात. त्यांचा जनसमूह बनतो. जनसागर उधाणतो. खरंतर सार्‍या नद्या, या सागराला जाऊन भेटतात. मात्र, आषाढी एकादशीला अघटीत घडतं. माणसांचा जनसागर, चंद्रभागेत जाऊन मिळतो. पांडुरंगाचे दर्शन घेतो आणि मुक्तीच्या वाटेला लागतो.

- Advertisement -

अवघ्या वैष्णवांच्या मनाला एकच ध्यास असतो. वारीचा. हल्ली तर वारीत सुशिक्षित, तंत्रस्नेही आणि परदेशी भाविकांचीही संख्या लक्षणीय वाढली आहे. आजचे वर्तमान हे थेट ज्ञानेश्वर माऊलींशी जुळले आहे, ते वारीमुळे. संत ज्ञानेश्वरांनीही गुढी सहर्ष खांद्यावर मिरवली आहे. माझ्या जीवाची आवडी असं म्हणत त्यांनी आपल्या पूर्वजांच्या वारीच्या परंपरेची वाट प्रशस्त केली आहे. ते म्हणतातच…..

माझे जिवाची आवडी,

पंढरपुरा नेईन गुढी.

पांडुरंगजी मन रंगले,

विठ्ठलाचे गुणी वेधले.

माऊलींनी निवृत्तीनाथांकडून दीक्षा घेऊन ज्ञानयात्रेचा प्रवास सुरु केला. जगाला अमृतानुभव देणारी ज्ञानेश्वरी लिहिली. संताच्या मेळा जमविला. स्वतः वारीत चालले. अनेकांना वारीची दीक्षा दिली. या परंपरेत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांसह अनेकांनी अलौकिक योगदान दिले आहे. ते इतकं रुजलंय, की विठ्ठलाच्या, पांडुरंगाच्या भेटीला निघालेल्या प्रत्येक वारकर्‍यांच्या मुखी ज्ञानेश्वर माऊली- तुकाराम हा गजर चालू असतो. याचं कारण हे सर्व संत पांडुरंगाशी इतके एकरुप होऊन गेले आहेत की, देवात आणि त्यांच्यात द्वैतच उरलेलं नाही. त्यांचं नाव घेतलं की विठ्ठलाचं, पांडुरंगाचं नाव घेतल्याचं पुण्य मिळतं, अशी धारणा वारकर्‍यांमध्ये रुजली आहे. माऊलींनी हेच तर सांगितलं आहे. जे जे जीव आहेत, त्यातच देव शोधा. हे शोधणं म्हणजेच भक्ती योग आहे, असं ते म्हणतात.

जे जे भेटे भूत,

ते ते मानिजे भगवंत.

हा भक्तियोग निश्चित,

जाण माझा.

विठ्ठल हा सर्वसामान्य जनतेचा, कष्टकर्‍यांचा देव आहे. वारकरी त्यांच्यातच माय-बाप बघतात. त्याची भेट म्हणजे माऊलींची भेट. आणि विठ्ठलाची पंढरी म्हणजे त्यांचं माहेर. सासूरवाशीण स्त्री आपले कष्ट विसरण्या माहेरपणाला जशी दिवाळी-आखाजीला जाते. तसेच हे वारकरी मनाला विसावा भेटावा म्हणून आषाढी – कार्तिकीच्या वार्‍या करतात. देवाला आपलं सुख-दुःख सांगतात. संत तुकाराम आपल्या अभंगात म्हणतातच.

जाऊ देवाचिया गावा,

देव देईल विसावा.

देवा सांगू सुख दुःख,

देव निवारील भूख.

संत चोखा मेळ्यालाही या पायीवारीचा ध्यास लागला होता. टाळी वाजवावी आणि गुढी उभारी हीच तर त्यांचीही वारीची संकल्पना.

टाळी वाजवावी,

गुढी उभारावी.

वाट ती चालावी,

पंढरीची.

संताजी जगनाडे यांनीही संसाराला जड जोखड मानलं आहे. हे जोखड उतरावावं आणि भगवतभक्तीत रमावं असं सांगतांना ते म्हणतात रात्रंदिन त्या वनमाळीला म्हणजे विठ्ठलाला स्मरायला हवे.

संतू तेली म्हणे,

घाण्याचे जोखड.

आहे फार जड,

जगामाजी.

तुकाराम महाराज तर वारीचं महत्त्व विषद करताना ती कोणत्याही तीर्थापेक्षा आणि व्रतापेक्षा मोठी श्रेयस्कर असल्याचं नमूद करतात.

पंढरीची वारी,

आहे माझे घरी.

आणिक न करी,

तीर्थ व्रत.

विठ्ठल चरणांची सेवा ही मला पूर्वापार मिळाली असून तीच माझी मिरासी आहे असं म्हणताना ते सांगतात.

माझ्या वडिलांची,

मिराशी गा देवा.

तुझीच चरण सेवा,

पांडुरंग.

संत एकनाथ महाराजांनीही आपले आई-वडील हे विठ्ठल रुखमाई असून ते भीमेच्या तीरावर पंढरपुरी राहतात असा दाखला दिला आहे.

माझे माहेर पंढरी,

आहे भिवरीच्या तिरी.

बाप आणि आई,

माझे विठ्ठल रखुमाई.

पंढरपूर हे सर्व संतांना माहेर वाटतं. कारण तेथे गरीब, श्रीमंत हा भेद नाही. जात पंथ आडवा येत नाही. म्हणून तर चोखामेळ्यालाही पंढरी आपलं माहेर वाटतं. ते म्हणतात.

चोखा म्हणे आमुचे,

दीनांचे माहेर.

ते पंढरपूर,

भीमा नदी.

अशिक्षित, अज्ञानी, दीनांना जे बळ मिळाले ते विठ्ठलाने दिलंय. ही भावना सर्वांचीच आहे. तिला अशिक्षित चोखामेळाने शब्द दिले.

चोखा म्हणे मज,

काहिच न कळे.

विठ्ठलाचे बळे,

नाम घेतो.

म्हणून संत एकनाथ या पंढरीच्या वाटेला भक्तीची सोपी पायवाट म्हणतात. ज्याला कुणाला ही वारी भेटेल. त्याने तिचा पाठलाग करावा. वारीत चालावं आणि विठ्ठलाची पेठ गाठावी असा सल्ला ते देतात.

करा करा लागा पाठ,

धरा पंढरीची वाट.

पुंडलिकाची पेठ,

सोपी आहे सर्वासी.

ज्यांच्यासोबत देव जेवले ते संत नामदेवांनीही संसाराला सागर म्हटले असून पंढरीला माहेरच म्हटलं आहे. त्यांनी तर वारीला फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित न ठेवता तिला पंजाबपर्यंत नेलं. म्हणूनच नामदेवांचा अभंगांना गुरु ग्रंथसाहेबांएव्हढंच महत्त्व मिळालं.

संसार सागरी रे,

माझे माहेर पंढरपुरी.

तीर्थ, क्षेत्र, देव आणि देहदेखील विठ्ठलमय झालेले नामदेव अत्र तत्र सर्वत्र विठ्ठलाचंच दर्शन घेतात. ते म्हणतात.

तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल,

देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल.

संत मांदियाळीतला प्रत्येक संत पांडुरंगमय झालेला आहे. गोरोबा कुंभाराला तर विठ्ठल त्यांचे सोबत मातीत नाचताय असा भास व्हायचा. हा त्यांचा अधिकारच होता.

केशवाचे ध्यान,

धरुनी अंतरी.

मृत्तिके माझारी,

नाचतसे.

संत सावता माळी कधी पंढरीला गेले नाहीत. वारीत चालले नाहीत. मात्र त्यांनी कामात राम पाहिला. वारकर्‍यात विठ्ठल पाहिला. कांदा, मुळाभाजी यांच्यात विठ्ठल शोधला. म्हणून विठ्ठल त्यांना भेटायला त्यांच्या शेतात आले. ते त्यांच्या हृदयीचे विसावले.

कांदा मुळा भाजी,

अवघी विठाई माझी.

लसूण मिरची कोथिंबीर,

मोट नाडा विहीर

शिवभक्त असणार्‍या नरहरी सोनारांना त्या कृपाळू विठ्ठलाने सर्व देवळात तो एकच असल्याचा साक्षात्कार करुन दिला. जीवा शिवाची भेट घालून दिली. म्हणून ते नामाचा व्यवहार करु लागले.

देवा तुझा मी सोनार,

तुझे नामाचा व्यवहार.

देह बागेसी जाणे,

अंतरात्मा नाम सोने.

अशा या कुटुंब वत्सल भगवंतांच्या भेटीसाठी तुकोबा सासरी जाणार्‍या लेकीची व्याकुळता विदित करतात. तशीच व्याकुळता त्यांना विठ्ठल दर्शनाचा लागते.

कन्या सासुरासी जाये,

मागे परतुनी पाहे.

तैसे झाले माझ्या जिवा,

केव्हा भेटसी माधवा.

माय आणि बाळाची चुकामुक व्हावी आणि ते भांबावून जावे किंवा मासोळी पाण्यातून बाहेर काढावी आणि पाण्याशिवाय ती तळमळावी इतकी व्याकुळता सर्व संतांमध्ये विठाईसाठी आहे.

जनाबाईला तर पंढरपुराच्या वाळवंटात जमलेला संतमेळा बघून ते सारे विठ्ठलाच्या अंगाखांद्यावर खेळताय असेच चित्र दिसते. हा देव लेकुरवाळा आहे असं त्या म्हणतात.

विठू माझा लेकुरवाळा,

संगे गोपाळांचा मेळा.

यात निवृत्ती खांद्यावर, सोपान हातधरुन, ज्ञानेश्वर पुढे, मागे सुंदर मुक्ताई, मांडीवर गोरा, चोखा जिवात, बंका कडेवर, नामा करंगळीधरुन चालतायेत. आणि जनाबाई हे मनोहारी दृष्य साक्षात अनुभवतेय. यांसह संत सेना न्हावी, सखूबाई, बहिणाई, दामाजी पंत यांनीही वारीची परंपरा जीवापाड जपली.

हे सर्व संत वारकरी चंद्रभागेच्या वाळवंटात जमतात. तेथे हा भक्तीचा खेळ मांडला जातो. येथे दिंड्या, वार्‍या येतात. तळ ठोकतात. सारेच येथे वैष्णव असतात. त्यांना त्यांची जात आठवत नाही. धर्म लक्षात राहत नाही. सारे विठू नामात धुंद होतात. देहभान विसरतात. नाचायला लागतात.

खेळ मांडिला,

वाळवंटी घाई.

नाचती वैष्णव,

भाई रे.

या पवित्र भूमीत क्रोध, अभिमान, वर्णाभिमान गळून पडतो. मन निर्मळ होते. चित्त प्रभू चरणी लागते. आणि सर्वत्र फक्त आनंद ओसंडून वाहतो. चंद्रभागेला वारकर्‍यांचा पूर येतो. आणि वारकर्‍यांमध्ये आनंद दुथडी भरुन वाहतो. वारीत असताना तुकोबांना वेळापूर टेकडीवरून पांडुरंगाच्या मंदिराचा कळस दिसला होता. ते आनंद विभोर झाले. धावतच पांडुरंग भेटीला गेले. हाच तो धावा. आजही वारकरी येथूनच धावा करतात. जणू ते म्हणतात.

आनंदाचे डोही,

आनंद तरंग.

आनंदची अंग,

आनंदाचे.

केशवाचे नामःस्मरण आणि विठ्ठलाचंच प्रासादिक दर्शन हेच या भूतलावरचे अलौकिक सुख आहे असं तुकाराम महाराज म्हणतात आणि स्वतःला धन्य मानतात.

तुका म्हणे सुख,

झाले माझे जिवा.

रंगलो केशवा,

तुझ्या सवे.

अत्यंत हीन कुलात जन्म घेऊनही केवळ विठूनामाच्या पवित्र संस्काराने आपलं जीवन धन्य करणारी कान्होपात्राही या सर्वापेक्षा कां वेगळी आहे ? दुष्ट यवनांपासून तिचं रक्षण करुन, आपल्या चरणी विसावा देणारा पांडुरंग, दीनांचा तारणहारच नाही कां.? कान्होपात्रा म्हणते.

धन्य भाग आज,

डोळीया लाभले.

म्हणोनी देखले,

विठ्ठल चरण.

भागवत धर्माचा हा वसा, जो घेतो तो गळ्यात तुळशी माळ घालतो. शाकाहारी होतो. सत्याचा आग्रह धरतो. त्याचं जगणं, वागणं हे सदाचारी, परोपकारी होतं. त्याचं जगणं तर सुधारतंच शिवाय त्याचा मृत्यूनंतरचा मार्गही मुक्तीकडे जातो. आपल्या सर्वंकश हिताचा हा मार्ग ज्याला सापडतो, त्याचे मायबाप धन्य होतात असं संत म्हणतात.

आपुलिया हिता,

जो होय जागता.

धन्य माता पिता,

तयाचिया

ज्या काळात असे कन्या-पुत्र जन्माला येतात ते कूळ, तो वंश धन्य होतो. अशा लेकरांचा त्या परमपित्या परमेश्वराला, पांडुरंगाला देखील हेवा वाटतो.

कुळी कन्या पुत्र,

होती जे सात्विक.

तयांचा हरीक,

वाटे देवा.

आपल्या वागण्या, बोलण्याचा, जगण्याचा आणि कामाचा देवालाही आनंदच वाटायला हवा. अशी शिकवण सर्व संत देतात. हा संस्कार वारीत मिळतो म्हणून प्रत्येक सश्रद्ध नागरिकांनी किमान एकदा किंवा काही पावलं पंढरीची पायी वारी चालायलाच हवी. तुकाराम महाराज म्हणतातच हा भवसागर सुखेनैव पार करायचा असेल, तर ही वारीची पायवाट धरायला हवी.

तुका म्हणे केली,

सोपी पायवाट.

उतरावया पार,

भवसागर रे.

या सर्व संतांच्या कर्मभूमीतून दिंड्या निघतात. पालख्या चालतात. सर्व संत एकादशीला पंढरीत जमतात. वारीत चालताना कडूस फाटा, वेळापूर, वाखरी येथे रिंगण केले जाते. वारकरी कडं करुन उभे राहतात. त्यात एक अश्व प्रदक्षिणा मारतो. त्यावर माऊली विराजमान असतात असा समज आजही दृढ आहे.

या वाटेने जे जे गेले ते ते अमर्त्य झाले. अक्षर झाले. अमर झाले. कालजयी झाले. सामान्य माणूस जन्माला येतो. राबराब राबतो. आणि शेवटी मरुन जातो. त्याची दखल त्याचे वारसही पुढे ठेवू शकत नाहीत. काळ उलटला की कुटुंब सदस्य, नातेवाईकांच्याही ते विस्मृतीत जातात. मात्र, पांडुरंगाच्या चरणी जे लागलेत. त्याच्या नामात रमलेत, वारीत चाललेत. ते साडेसातशे वर्ष झालेत, तरी अजूनही जगाच्या स्मरणात आहेत. जनमानसाच्या मनात जिवंत आहेत. हीच तर वारीची महती आहे. ती जपायला हवी. नव्या पिढीत रुजवायला हवी. फार तर नव्या युगाची, तंत्राची तिला जोड द्यावी. परंतु, तिचं अखंडत्व अमर राहिलं पाहिजे. एका पिढीकडून नव्या पिढीकडे तिचं सहज, सुलभ हस्तांतरण व्हायलाच हवे.

राम कृष्ण हरी.

– ‘देवरुप’, नेताजी रोड, धरणगाव, जि.जळगाव. 425 105.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 99 ग्रामपंचायतींची आज अंतिम मतदार यादी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे, तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका...