Monday, September 23, 2024
Homeनगरव्यवस्थेच्या निष्काळजीपणाने निष्पाप नागरिकांचा बळी - विवेक कोल्हे

व्यवस्थेच्या निष्काळजीपणाने निष्पाप नागरिकांचा बळी – विवेक कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

- Advertisement -

शिर्डी कोपरगाव रस्त्यावर अपघात होऊन मुजीब खान यांचे निधन झाले आहे. या रस्त्याला दर आठ दिवसाला एक घटना घडून अपघातात नागरिक बळी ठरत आहे. या रस्त्यासाठी अनेकदा टोकाचे आंदोलन करून शासनाला जाग आणून काम सुरू झाले. मात्र गेले कित्येक महिने हे काम काही कारणाने अतिशय धीम्यागतीने होत असल्याने निष्पाप नागरिक हकनाक बळी ठरतं आहेत.हे दुःखद आहे.हजारो कोटींचे फलक आणि शेजारी रक्ताच्या थारोळ्यात मायबाप जनता पडू लागली आहे हे खेदजनक आहे. शेकडो अपघात होऊन अनेकांना अवयव गमवावे लागले आहेत तर अनेक कुटुंबातील प्रमुख व्यक्ती अपघातात मृत झाल्याने त्यांचे कुटूंब दुःखात होरपळले आहेत, अशी प्रतिक्रिया युवानेते विवेक कोल्हे यांनी दिली.

श्री. कोल्हे म्हणाले, वास्तविक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासाठी निधी दिला असून त्याचा विनियोग स्थानिक यंत्रणेने लवकर का होऊ दिला नाही व संथ गतीने काम झाल्याने जाणारे बळी कधी थांबणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. फलकासाठी श्रेय आणि जाहिराती यासाठी विलंब करून नागरिकांना मृत्यूच्या दाढेत ढकलण्याचे प्रकार अनेकदा बघायला मिळतात. मात्र या झळा सर्वसामान्य जनतेला रोज बसतात. या रस्त्याचा दैनंदिन वापर करावा लागत असल्याने पर्यायी मार्ग देखील नाही त्यामुळे होणार्‍या त्रासाला नागरिक कंटाळले आहे.

तुकड्या तुकड्यात सुरू असलेले काम, प्रलंबित ठिकाणी असलेली अफाट धूळ यामुळे नोकरदार, विद्यार्थी यांची वर्दळ असणारा हा महामार्ग श्वसनाच्या आजारांचा सापळा बनला आहे का अशी स्थिती आहे. अवजड वाहतूक आणि लहान वहाने यात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीवर असणारे नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करतात. के जे सोमैय्या, एसएसजीएम या महाविद्यालयाच्या परिसरात विद्यार्थी मोठ्या संख्येने ये-जा करतात. त्यांना अशा हलगर्जी व्यवस्थेचा त्रास रोज सहन करावा लागतो, अशी प्रतिक्रिया विवेक कोल्हे यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या