कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
नगरपालिकेने 14 व्या वित्त आयोगांतर्गत अनुदान मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविलेला होता, या प्रस्तावामध्ये शहरातील विविध रस्त्यांच्या कामांचा समावेश केलेला असून
सदरचा प्रस्तावास मंजुरी मिळून निधी वर्ग होणे हा या प्रक्रियेतील भाग असल्याने यासाठी पाठपुराव्याची आवश्यकताच नसते. परंतु विद्यमान आमदार नेहमीप्रमाणे नगरपालिकेसाठी 6 कोटी रूपयाचा निधी आणण्यासाठी मी पाठपुरावा केला असल्याचे सांगत आहे.
खोटे बोल, पण रेटून बोल हे एकच काम निवडुन आल्यापासून सुरू असल्याची टीका कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केली आहे.
माजी आ. सौ स्नेहलता कोल्हे यांनी मतदार संघामध्ये मोठया प्रमाणात निधी आणून विकासाचा डोंगर उभा केला, अनेक प्रलंबित कामांचा पाठपुरावा करून ती मार्गी लावण्याचे काम केले. त्यासाठी शासनाच्या विविध खात्याकडून निधी आणला. त्याचे कागदपत्रीय सोपस्कर पुर्ण केले. त्यानंतर माजी आमदार सौ. कोल्हे यांनी भुमीपूजने आणि उदघाटने केली.
कोटयावधी रूपयाचा निधी आणूनही काही कामांचे भुमिपूजने करणेही शक्य झाले नाही. याच मंजुर कामांचे भुमिपूजन करण्यात विद्यमान आमदार धन्यता मानत आहे. याशिवाय 14 व्या वित्त आयोगांतर्गत मिळणारा निधी हा प्रत्येक ग्रामपंचायत आणि नगरपालिकांना मिळत असतो.
त्यासाठी त्या संस्थेची ती जबाबदारी असते.त्यासाठी प्रस्ताव तयार करणे. त्यासंदर्भातील कागदपत्रांची पुर्तता करणे ही कामे हा प्रक्रियेचा भाग असुन त्यासाठी मिळणारे अनुदान हे सरकार कोणाचेही असो, लोकप्रतिनिधी कोणीही असो तरीही त्या त्या संस्थांना मिळत असते.
14 व्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त अनुदानातील जी रक्कम शिल्लक आहे. त्या रक्कमेतुन कोपरगाव शहरातील विविध रस्ते कामासाठी निधी मिळावा म्हणून कोपरगाव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजुरी दिलेली आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी प्राप्त अधिकाराचा वापर करून 14 वा वित्त आयोगांतर्गत बंधनकारक भागातील शिल्लक रकमेतून रूपये 5 कोटी 93 लाख 84 हजार 548 रूपये खर्चासाठी प्रशासकीय मान्यता मंजुर करीत असल्याचे म्हटले आहे.
ही वस्तुस्थिती असतांना विद्यमान आमदारांना त्यांच्या प्रयत्नातून कोणत्याही प्रकारचा निधी मतदारसंघासाठी आणणे शक्य होत नाही. आणि ते मतदार संघासाठी निधी आणूच शकत नाही म्हणून नगरपालिकेच्या 14 व्या वित्त आयोगांतर्गत मिळालेला सुमारे 6 कोटी रूपयाचा निधी मीच मिळविला असल्याचे गाजावाजा विद्यमान आमदार करीत असल्याचे विवेक कोल्हे म्हणाले.