भारतातील सर्वात लोकप्रिय आणि भावपूर्ण गायकीने आपलेसे करणारा अरिजित सिंगचा 25 एप्रिल रोजी 37 वा वाढदिवस आहे. त्यांच्या आवाजाने गेल्या दशकात भारतीय संगीताच्या भावविश्वात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. आज प्रत्येकाच्या आयुष्यात एकतरी क्षण असा असेल जो मनातल्या भावना शब्दांपेक्षा अरिजितच्या गाण्यांशी जास्त जुळलेल्या वाटतात. एका छोट्या गावातून आलेल्या या युवकाने देशभरात आणि बाहेरही आपल्या आवाजाने एवढा प्रभाव कसा निर्माण केला हे एक आश्चर्यच आहे.
अरिजितचा जन्म 1987 मध्ये पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जियागंज येथे झाला. राष्ट्रीय एकात्मतेचे उदाहरण त्याच्या घरीच दिसते.. वडील शीख पंजाबी कक्कर-सिंह तर आई बंगाली हिंदू. या दोन्ही संस्कृतींची सांगड त्याच्या व्यक्तिमत्त्वात आणि आवाजातही झळकते. त्याचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण मुर्शिदाबाद येथेच झाले.
अरिजितला गाण्याचा वारसा त्याच्या आजोळकडून मिळाला. त्याची आजी चांगले गायची.. मावशीने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. आई तबला वाजवायची आणि गायची. अरिजितला शिक्षणापेक्षा संगीतात रस जास्त होता, हे ओळखून त्याच्या आई-वडिलांनी त्याला शास्त्रशुद्ध संगीताचे शिक्षण देण्याचे ठरवले. वयाच्या तिसर्या वर्षापासून त्याचे संगीताचे प्रशिक्षण हजारी बंधूंकडे सुरू झाले. शास्त्रीय संगीताचे गुरू होते राजेंद्र हजारी, तबला त्याने धीरेंद्र हजारी यांच्याकडून तर पॉप म्युझिकचे प्रशिक्षण वीरेंद्र हजारी यांच्याकडून घेतले. वयाच्या नवव्या वर्षी अरिजितला भारत सरकारची शास्त्रीय संगीताची शिष्यवृत्ती मिळाली.
राजेंद्र हजारींच्या सांगण्यावरून अरिजितने 2005 मध्ये ‘फेम गुरुकुल’ या संगीत रियालिटी शोमध्ये भाग घेतला आणि तो त्याच्या करिअरमधील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. तो या स्पर्धेत सहावा आला, पण त्याच्या आवाजाने संगीत क्षेत्रातील दिग्गजांचे लक्ष वेधले. शंकर महादेवनसारख्या संगीतकारांनी त्याच्या आवाजाची आणि अभिव्यक्तीची प्रशंसा केली.
स्पर्धेनंतर प्रसिद्धीच्या मागे न धावता अरिजितने काही वर्षे संगीत संयोजक आणि सहाय्यक म्हणून प्रीतम, शंकर-एहसान-लॉय, विशाल-शेखर यांसारख्या संगीत दिग्दर्शकांकडे काम केले. त्याकाळात त्याने त्याचा रेकॉर्डिंग स्टुडिओ तयार केला आणि ध्वनी संयोजन, आधुनिक संगीताचे पैलू शिकून घेतले.
लोकप्रियतेची सुरुवात : 2012 ते 2014
2013 साली ‘आशिकी-2’ मधील ‘तुम ही हो’ या गाण्यामुळे अरिजितची ओळख निर्माण झाली . त्याआधीही ‘फिर ले आया दिल’ आणि ‘राब्ता’ यांसारखी काही गाणी त्याने गायली होती, पण ‘तुम ही हो’ने त्याला घराघरांत पोहोचवले. त्या क्षणापासून तो भारतातील तरुणवर्गाचा चाहता झाला. प्रेम, विरह, दु:ख, आनंद प्रत्येक भावना त्यांनी आपल्या गाण्यांतून अचूक उलगडली.
अष्टपैलू गायनशैली
अरिजितच्या गाण्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो कोणत्याही शैलीत सहज गाऊ शकतो. घुंगरूसारख्या पार्टी साँगपासून ते ‘अगर तुम साथ हो’सारख्या भावपूर्ण गीतांपर्यंत, ‘देवा देवा’सारख्या भक्तिगीतांपासून ते ‘लेहरा दो’सारख्या देशभक्तिपर गाण्यांपर्यंत प्रत्येक शैली त्याने आपल्या खास अंदाजात सादर केली आहे. त्याने हिंदी, बंगाली, मराठी, तामिळ, तेलगू अशा अनेक भाषांमध्ये गायन केले आहे आणि प्रत्येक भाषेतील शब्दोच्चार व शैली समजून घेत गायले आहे. आज डिेींळषू, र्धेीर्ढीलश सारख्या जागतिक प्लॅटफॉर्म्सवर अरिजित हा सर्वाधिक ऐकला जाणारा भारतीय गायक आहे. त्याच्या गाण्यांना अब्जावधी व्ह्यूज मिळतात. भारताबाहेरही दुबई, लंडन, टोरांटो, ऑस्ट्रेलिया येथे त्याच्या लाईव्ह कॉन्सर्ट्सना प्रचंड गर्दी होते.
साधेपणा : यशामागे शांत वृत्ती
इतक्या यशानंतरही अरिजित एक साधं, खासगी आयुष्य जगणारा व्यक्ती आहे. तो फारसा पुरस्कार सोहाळ्यांना जात नाही, ना तो सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. तो म्हणतो, माझे संगीतच माझ्या वतीने बोलेल आणि खरेच त्याच्या संगीतानेच त्याने सर्वांशी नाते जोडले आहे.
2014 मध्ये त्याने त्याची बालपणीची मैत्रीण कोयल रॉयशी विवाह केला. सध्या तो आपल्या मुलांबरोबर कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे. प्रसिद्धीपासून, लोकांच्या नजरेपासून दूर तो आपले खासगी जीवन जगतो आहे.
दानशूर
अरिजित केवळ गायक नाही तर एक संवेदनशील, जागरुक नागरिक, समाजसेवकदेखील आहे. त्यांनी मुर्शिदाबादमध्ये एक सामाजिक संस्था स्थापन केली आहे जी शिक्षण, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रासाठी काम करणार्या संस्थांना मदत करते. करोनाकाळात त्यांनी स्थानिक रुग्णालयांना मदत केली, ऑक्सिजन, बेड्स उपलब्ध करून दिले आणि हे सर्व कोणताही गाजावाजा न करता. त्याच्यासाठी दान ही एक खासगी गोष्ट आहे, प्रसिद्धीसाठी नव्हे.
25 एप्रिल हा अरिजित नावाच्या गायकाचा नुसता वाढदिवस नसून त्याच्या आवाजाचा एक उत्सव साजरा करणे आहे. असा आवाज ज्याने एका पिढीच्या भावविश्वाचे प्रतिनिधित्व केले आहे. प्रेम, विरह, दुःख, आनंद , कुठलीही भावना असो अरिजितच्या आवाजाने ती साकार केली आहे. त्याचा आवाज भावनांचे एक प्रतिबिंब आहे. अरिजितला त्याच्या वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. त्याचा सांगीतिक प्रवास असाच पुढे पुढे जात राहो.